मुंबई उच्च न्यायालयाने पोलीस प्रशासनाला चांगलेच झापले
१ ऑक्टोबरला होणार आगामी सुनावणी
मुंबई : बदलापूरच्या शाळेमध्ये दोन साडेतीन वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघड झाल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. पण या प्रकरणातील आरोपी शिक्षण संस्थाचालकासह मुख्याध्यापक अद्याप फरारच आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर पॉक्सो अंतर्गत याप्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाने दाखल करुन घेतलेल्या सुमोटो याचिकेवर मंगळवारी सुनावणी पार पडली. यातील आरोपी फरारच असल्याने उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत पोलीस प्रशासनाला चांगलेच झापले.
बदलापूर चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी सफाई कर्मचारी अक्षय शिंदे हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्यासोबतच या प्रकरणात कल्याण जिल्हा सत्र न्यायालय आदेशानुसार शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल, सचिव तुषार आपटे व मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊन सहा दिवस उलटले आहेत.
बदलापूर प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयाने दाखल करून घेतलेल्या सुमोटो याचिकेवर न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली. यानंतर आता याविषयावरील पुढील सुनावणी १ ऑक्टोबरला होणार आहे. यावेळी फरार आरोपी अद्याप न सापडणे ही खेदाची बाब असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. केस डायरीत बदलापूर पोलिसांनी दाखवलेल्या निष्काळजीपणाबाबतही न्यायालयाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ‘बेटा पढाओ, बेटी बचाओ’, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे, अशा शब्दांत न्यायालयाने या प्रकरणावर टिप्पणी केली. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत राज्यस्तरीय समिती स्थापन करून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या एकंदरीत सुरक्षेबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने सरकारला दिले आहेत. या समितीत निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव अथवा डॉ. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्यासह निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. मीरा बोरवणकर यांच्या नावांचा विचार करण्याची प्रशासनाला सूचना न्यायालयाने केली.
कोतवाल आणि आपटे हे पोलिसांसमक्ष पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. एकीकडे आंदोलन कर्त्यांवर पोलिस प्रशासन, रेल्वे पोलिसांनी गुन्हे दाखल करत आंदोलकांना अटकही केली गेली. मात्र, या तिघांना पोलिसांनी अद्याप अटक केली नसल्याने बदलापूरात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.