गणेशोत्सवानिमित्त (Ganeshotsav 2024) सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे, पण गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi 2024) एक दिवस आधी हरतालिका तृतीया (Hartalika Tritiya) साजरी केली जाते. हिंदू धर्मात हरतालिकेच्या व्रताला विशेष स्थान आहे. स्त्रिया या दिवशी त्यांच्या पतीला दीर्घ आयुष्य, त्यांचे आनंदी आयुष्य आणि आरोग्यासाठी निर्जळ उपवास करतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हरतालिका उपवास केला जातो. यंदा हरतालिका ६ सप्टेंबरला २०२४ ला येत आहे. हरतालिका तृतीया साजरी करण्यामागे पौराणिक आख्यायिका अशी आहे की, देवी पार्वतीने सर्वात आधी भगवान शंकरासाठी हरतालिकेचं व्रत केलं होतं. हरतालिका हा दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेला शब्द आहे. एक हरत आणि दुसरं आलिका. यामध्ये हरत चा अर्थ होतो अपहरण आणि आलिका चा अर्थ होतो मैत्रीण. हे दोन शब्द एकत्र येऊन हरतालिका हा शब्द तयार झाला आहे.
आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी हरतालिका तृतीया हा सण साजरा केला जातो. हरतालिका तृतीयेला देवी पार्वती, भगवान शिव आणि त्यांच्या कुटुंबाची पूजा केली जाते. या दिवशी महिला निर्जळी उपवास करतात. हे व्रत करवा चौथ आणि छठ पूजे इतकचं कठीण आहे. काही महिला हरतालिकेच्या दिवशी अन्नासोबत पाण्याचे सेवन करत नाहीत. मात्र निर्जळ व्रत केल्याने आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. अशात स्त्रियांनी पाण्याशिवाय उपवास करण्यापूर्वी हरतालिका तीजच्या मुहूर्तावर काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात, ज्यामुळे त्यांना सणाच्या काळात आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू नये.
दही किंवा नारळ पाणी पिऊन उपवास करा
उपवास करण्याआधी दही खावे किंवा नारळ पाणी प्यावे. शरीरातील पाण्याची कमतरता नारळ पाणी पूर्ण करते आणि दही खाल्ल्याने जास्त तहान लागत नाही. पाण्याशिवाय उपवास करण्यापूर्वी दही किंवा नारळपाणीच सेवन केल्याने उपवासात तहान कमी होते.
सूर्यप्रकाश टाळा
दमट उष्णतेमुळे आणि सूर्यप्रकाशामुळे शरीराचे डिहायड्रेशन होऊ लागते आणि खूप तहान लागते. उपवास करताना तुम्ही तुमची तहान नियंत्रणात ठेवता, पण शरीराला पाण्याची गरज जास्तीत-जास्त भासते, ती पूर्ण न केल्यास चक्कर येणे, डोकेदुखी, पित्त होणे, मळमळणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.अशा समस्या टाळण्यासाठी सूर्यप्रकाश आणि उष्णता टाळण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला जास्त तहान लागणार नाही आणि तुमच्या शरीराला घाम कमी येतो आणि पाण्याची गरज कमी जाणवते.
शारीरिक हालचाली कमी करा
उपवासादरम्यान शारीरिक हालचालींमुळे थकवा जाणवतो. शरीरातील थकवा कमी करण्यासाठी शरीर पाणी मागते. जर तुम्ही उपवासात पाणी पिऊ शकत नसाल तर शारीरिक हालचाली कमी करा. खूप कष्टाचे किंवा थकवणारे काम करू नका. विश्रांती घ्या जेणेकरुन तुमचे शरीर उत्साही राहील आणि तुम्हाला कमी तहान लागेल.
आंघोळ करा
उपवास करताना तहान लागली असेल, गरम आणि थकवा जाणवत असेल तर तुम्ही कोमट पाण्याने आंघोळ करू शकता. आंघोळ केल्याने शरीराला थंडावा लागतो आणि तहान कमी लागते.
भगवान शंकरासाठी देवी पार्वतीने केलं होतं व्रत
हरतालिकेची एक पौराणिक कथा आहे. यानुसार, पार्वतीच्या मैत्रिणी तिचं अपहरण करून तिला जंगलात घेऊन गेल्या होत्या. पार्वतीच्या इच्छेव्यतिरिक्त भगवान विष्णु यांनी तिच्याशी विवाह करू नये म्हणून तिच्या मैत्रिणी तिला जंगलात घेऊन जातात. तिथे देवी पार्वतीने भगवान शंकराची आराधना केली आणि भाद्रपद शुल्क तृतीयेच्या दिवशी मातीचं शिवलिंग तयार करून त्याची पुजा केली. पार्वतीच्या तपस्येने प्रसन्न होऊन भगवान शंकराने देवी पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला.