अन्नपदार्थ तपासणी, भेसळीवर प्रश्नचिन्ह
मुंबई : गणेश चतुर्थी हा प्रमुख सण म्हणून गणला जाताे, येत्या ७ सप्टेंबर रोजी गणेशाेत्सावाला सुरूवात हाेणार असून १७ सप्टेंबर रोजी गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनाने समाप्त होईल. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला दरवर्षी साजरा केला जाणारा हा सण भारतभरातील भक्तांसाठी एक महत्त्वाची घटना आहे. या उत्सवात घरोघरी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करून त्यांची भक्तिभावाने पूजा केली जाते. हा सण आणखीन गोड व्हावा म्हणून खाद्यपदार्थांमध्ये गोडीच्या पदार्थांचा जास्त समावेश केला जातो.
दरम्यान गणेशोत्सवामध्ये मावा, मिठाई आणि प्रसादाच्या पदार्थांमधून कोणतीही विषबाधा होऊ नये, या पदार्थांची गुणवत्ता चांगली राहावी, यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) माध्यमातून दरवर्षी विशेष मोहीम राबवली जाते. यंदा मात्र गणेशोत्सव चार दिवसांवर आला असताना ‘एफडीए’ने अशी कोणतीही मोहीम सुरू केलेली नाही. प्रसाद, मावा, मिठाईची गुणवत्ताचाचणी कोण तपासणार, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
उत्सवाच्या काळामध्ये गोड पदार्थ, मिठाया, प्रसादाचे पदार्थ, पेढे, मावा, दुग्धजन्य पदार्थ यांची कोट्यवधींची उलाढाल होत असते. त्यामुळे या पदार्थांची गुणवत्ता, योग्यतो दर्जा तपासणे अतिशय महत्त्वाचे असते. यापूर्वी गणेशोत्सवाच्या किमान पंधरा ते वीस दिवस आधी ही मोहीम सुरू होऊन ती नाताळपर्यंत चालत असते. परंतू यंदा ‘एफडीए’कडून गुणवत्ता चाचणी मोहिमेची अद्याप सुरुवातच झालेली नाही. त्यामुळे भेसळयुक्त पदार्थ बनवणाऱ्यांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षांपासून ‘एफडीए’ने दुग्धजन्य पदार्थ कधी तयार केला आहे, त्यात कोणते घटक वापरले आहेत, हे पदार्थ कसे साठवले जातात, त्याची मुदत कधी संपते, याची माहिती विक्रेत्यांना देणे बंधनकारक केले आहे. ‘एफडीए’ राबवत असलेल्या मोहिमेच्या वेळी या बाबींची काटेकोर पालन केले जाते का, याची पडताळणी केली जाते. अन्यथा, संबधित दुकानदारावर कारवाई करण्यात येते. यंदा या निकषांचे योग्यत्याप्रकारे पालन केले जाणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही प्रसाद आणि मिठाई तयार करताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी, कोणते निकष पाळावे, याचे मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. मात्र, मंडळांना अशा कोणत्याही प्रकारच्या सूचना अद्याप आलेल्या नाहीत.
दरम्यान, यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाकडे विचारणा केली असता, लवकरच तपासणी मोहीम सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.