मुंबई: भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव दिलीप ट्रॉफी २०२४-२५चया पहिल्या टप्प्यातून बाहेर गेला आहे. त्याला बुची बाबू स्पर्धेत गेल्या आठवड्यात मुंबईसाठी खेळताना हाताला दुखापत झाली होती. दरम्यान, त्याला आता आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. तो फिटनेस प्रक्रियेतून जाण्यासाठी नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये उपस्थित आहे.
सूर्यकुमार यादवला गेल्या आठवड्यात टीएनसीए इलेव्हनसाठी खेळताना दुसऱ्या डावात बॅटिंग करता आली नव्हती. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो मैदानात फील्डिंगसाठीही आला नव्हता. त्यावेळेस मुंबई टीमच्या मॅनेजमेंटने त्याला अधिक गंभीर जखम न होण्यासाठी फिल्डिंग तसेच बॅटिंग करण्यास पाठवले नव्हते.
कसोटी संघात पुनरागमनाची आशा
सूर्यकुमार यादवने नुकतेच कसोटी संघात पुनरागमनाची आशा व्यक्त केली होती . गेल्या एका वर्षात तो एकही फर्स्ट क्लास सामना खेळलेला नाही आणि कसोटी संघात पुनरागमनाच्या इराद्यानेच त्याने बुची बाबू स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतला होता.
भारतीय संघाला पुढील ५ महिन्यांत १० कसोटी सामने खेळायचे आहेत. हे सर्व सामने महत्त्वाचे आहेत कारण हे जिंकून भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान पक्के करू शकतो. सूर्याशिवाय दिलीप ट्रॉफीमधून मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक यांच्यात रूपाने दोन गोलंदाज आजारी असल्याने दिलीप ट्रॉफीमधून बाहेर झाले आहे.