मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली
मुंबई : सध्या धरणक्षेत्रात सतत रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे. सात धरणांपैकी विहार आणि तुळशी तलाव १०० टक्के भरले आहेत. तर अन्य धरणे ९५ टक्केपेक्षा जास्त भरली आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडल्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात पुन्हा वाढ झाल्याचे महानगर पालिकेने नुकत्याच दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने जोर पकडला आहे. काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रातही विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांमधील पाणीसाठ्यात पुन्हा वाढ झाली आहे.
आतापर्यंत सातही धरणांमध्ये ९७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे २० जुलैला तुळशी तलाव आणि २४ जुलैला तानसा तलाव भरला होता. २४ जुलैच्या मध्यरात्री विहार धरण, तर मोडक सागर धरणही याच दिवशी ओसंडून वाहू लागले. धरणे भरू लागल्याने मुंबई महापालिकेने १० टक्के पाणीकपात २९ जुलैपासून मागे घेतली होती. तर ठाणे शहर, भिवंडी आणि नगर बाह्य विभागातील ग्रामपंचायतींनाही मुंबई महापालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील कपात मागे घेतली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. आता हीच क्षमता १४ लाख २ हजार ९९९ दशलक्ष लिटर एवढी झाली असून ९७ टक्के धरणे भरली आहेत २०२३ मध्ये याच कालावधीत ९० टक्के धरणे भरली होती.
तर २०२२ मध्ये ९८ टक्के पाणीसाठा होता. १ जुलै ते २५ जुलै या कालावधीत सात धरणातील पाणीसाठ्यात ६१ टक्क्यांनी वाढ झाली होती. ५ ऑगस्टनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने या धरणातील पाणीसाठ्यात फारशी वाढ झालेली नव्हती. त्यामुळे ९३ टक्के पाणीसाठा होता. मात्र गेल्या काही दिवसांत पुन्हा पाऊस आल्याने हा साठा ९७ टक्के पोहोचला आहे त्यामुळे मुंबईकरांच्या वाट्याला पाणी हे योग्यप्रमाणात येईल.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा
अप्पर वैतरणा – ९७.४८ टक्के
मोडक सागर – ९८.९९ टक्के
तानसा – ९८.३७ टक्के
मध्य वैतरणा – ९८.६६ टक्के
भातसा – ९५.८७ टक्के
विहार – १०० टक्के
तुलसी – १०० टक्के