Sunday, August 31, 2025

MiG 29 Crash : हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळून मोठा स्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली!

MiG 29 Crash : हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळून मोठा स्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली!

बाडमेर : राजस्थानच्या बारमेरमध्ये काल रात्री हवाई दलाचे मिग-२९ हे लढाऊ विमान कोसळले. विमान कोसळल्याची माहिती मिळताच नागाणा पोलिस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. सुदैवाने विमानाचा पायलट अपघातापूर्वी सुखरूप बाहेर पडला.

अपघातानंतर या लढाऊ विमानाला मोठी आग लागल्याने पोलिसांनी अग्निशमन दलाच्या पथकाला घटनास्थळी बोलावून घेतले. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून विमानाला लागलेली आग विझवली. या दुर्घटनेत पायलट सुरक्षित असल्याचे हवाई दलाकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. मिग-२९ हे लढाऊ विमान शेतात कोसळल्याने घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. ग्रामस्थांची गर्दी पाहून पोलिसांनी फायटर प्लेनला चारही बाजूंनी घेराव घातला असून कोणालाही घटनास्थळी जाऊ दिले जात नाही.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले असून, या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यात येणार आहे. अपघातानंतर परिसरात घबराटीचे वातावरण निश्चितच होते, मात्र वैमानिकाच्या शहाणपणामुळे मोठी दुर्घटना टळली असून कोणीही जखमी झाले नाही. या घटनेने पुन्हा एकदा हवाई दलाची तत्परता आणि वैमानिकांची कार्यक्षमता अधोरेखित केली आहे.

नेमके काय घडले?

भारतीय हवाई दलाने ट्विटरवर (एक्स) जारी केलेल्या संदेशात म्हटले आहे की, बाडमेर सेक्टरमध्ये रात्रीच्या नियमित प्रशिक्षण मोहिमे दरम्यान हवाई दलाच्या मिग-29 लढाऊ विमानात गंभीर तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे पायलटला बाहेर काढावे लागले. विमानातून पायलट सुरक्षित असून कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत.

Comments
Add Comment