पुणे : महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या पुण्यातील माजी नगरसेवकाच्या खून प्रकरणात पोलिसांनी १३ आरोपींना अटक केली आहे. खुनाच्या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींनी ताम्हिणी घाटात आपला तळ ठोकला होता. मात्र, पोलिसांनी ताम्हिणी घाटातून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
यापूर्वी हत्या झालेल्या वनराज आंदेकरांच्या बहिणींना पोलसांनी अटक केली होती. त्यानंतर, मंगळवारी जेवण्यासाठी हे सगळे जण ताम्हिणी घाट परिसरात थांबले होते, जेवण झाल्यानंतर तामिनी घाटातून पुढे मार्गस्थ होण्याच्या आधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे, पोलिसांनी याप्रकरणात गंभीरतेने लक्ष घालून पुण्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जोमाने प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. या आरोपींच्या अटकेसाठी पुणे पोलिसांनी अनेक पथके नेमून शोधासाठी रवाना केली होती.
पुण्यातील नाना पेठेत १४ ते १५ हल्लेखोरांनी दुचाकीवर येऊन चौकात मित्रासोबत उभे असलेले वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला केला. यावेळी, थेट वनराज यांच्या अंगावर धावून जात आरोपींनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. काहीजण कोयता घेऊन त्यांच्या अंगावर गेले. वनराज आंदेकर यांना पाच राऊंडपैकी एक देखील गोळी लागली नाही. मात्र, गोळीबारानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. सदर घटनेनंतर वनराज आंदेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सोमनाथ गायकवाड हा कारागृहातून एप्रिल २०२४ मध्ये जामिनावर बाहेर आला. आंदेकर टोळीत आणि त्याच्यामध्ये धुसफूस सुरू होती. सोमनाथ गायकवाडला भीती होती की, आंदेकर टोळी आपला गेम करणार. त्यामुळे आपल्याला जिवंत राहायचे तर आंदेकर टोळीचा मुख्य माणूसच संपवण्याचे त्याने ठरवले. अखेर रविवारी रात्री संधी मिळताच सोमनाथच्या पंटरांनी वनराज आंदेकरांचा गेम केला.