भारतातील वंदे भारत एक्सप्रेसच्या भरपूर यशानंतर सरकार आता वंदे भारत स्लीपर आणि वंदे मेट्रो ट्रेन सुरू करण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच बेंगळुरूमध्ये पहिल्या वंदे भारत स्लीपर प्रोटोटाइप ट्रेनचे अनावरण करण्यात आले आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल १ सप्टेंबर रोजी बेंगळुरू येथील BEML च्या रेल्वे संकुलात वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या पहिल्या मॉडेलची झलक दाखवली. त्यांनी सांगितलं की वंदे भारत स्लीपर ट्रेन येत्या ३ महिन्यांत म्हणजे डिसेंबरपर्यंत सुरू होणार आहे.
अश्विनी वैष्णव म्हणाले की कोचच्या निर्मितीचे काम पूर्ण झालं असून पुढील २ महिने ट्रेनची चाचणी सुरू राहणार आहे. त्यानंतर ही ट्रेन प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेन ८०० ते १२०० किलोमीटर अंतराचा प्रवास करण्यासाठी तयार करण्यात आली असल्याची माहितीही रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे . रात्री १० च्या सुमारास प्रवासी त्यात चढतील आणि सकाळी त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचतील.
या ट्रेनच्या भाड्याबाबत बोलताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, ही ट्रेन मध्यमवर्गीयांसाठी बनवण्यात आली आहे. त्याचे भाडे राजधानी इतकंच असणार आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये १६ डबे आहेत. यामध्ये ११ एसी थ्री-टायर, ४ एसी टू-टायर आणि १ एसी फर्स्ट क्लास कोचचा यामध्ये समावेश आहे आणि त्यात ८२३ बर्थ असतील.
या ट्रेनचा कमाल वेग ताशी १६० किमी असेल. वंदे भारत स्लीपर ट्रेनची गणना जगातील सर्वोत्तम ट्रेनमध्ये केली जाईल, असा दावा रेल्वेमंत्र्यांनी केला आहे. या स्लीपर ट्रेनमध्ये अनेक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.
ट्रेनचे डबे आणि टॉयलेट अपग्रेड करण्यात आले आहेत. सीट्समध्ये यूएसपी चार्जिंग आणि इंटिग्रेटेड रीडिंग लाइट आहेत. या ट्रेनमध्ये मेंटेनन्स कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिनही करण्यात आली आहे.