जम्मू : माता वैष्णो देवी यात्रेदरम्यान एक दुर्घटना घडल्याचं समोर आलंय. वैष्णो देवी यात्रा मार्गावर भूस्खलन झालं असून, एका भाविकाचा मृत्यू झाला आहे, तर एक भाविक गंभीर जखमी झाला आहे. या भूस्खलनाचा व्हिडीओही समोर आला आहे. दुर्घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर हाती घेण्यात आलं आहे. जखमी झालेल्या भाविकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचं प्रशासनाने सांगितलय.
प्रशासनाने केला मार्ग बंद
भूस्खलन झाल्याच्या घटनेनंतर यात्रा मार्गात प्रशासनाने भाविकांना काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. ही दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाने ये-जा बंद केली असून, मार्गावरील मलबा तातडीने उचलण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
भूस्खलन झाल्याने कोसळले छत
या दुर्घटनेचा व्हिडीओ समोर आला असून, यात वैष्णो देवी मार्गावर मातीचा ढीग पडल्याचं दिसत आहे. दरड मार्गावरील छतावर कोसळली. त्यामुळे छताचेही मोठे नुकसान झाले आहे. व्हिडीओमध्ये मार्ग बंद झाल्याचे दिसत आहे.