भाजपा नेते खासदार नारायण राणे यांचा प्रहार
मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) आगलावे, या वयात काडी आणि पेट्रोल घेऊन फिरतात तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कोण आहे? त्याची लायकी आहे का पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावर बोलण्याची? अशा शब्दात भाजपाचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवारांवरही जोरदार प्रहार केला.
उद्धव ठाकरे यांच्यात काय दम आहे माहितीये, कधी कोणाच्या कानाखाली पण नाही मारली. काय धमकी देताय आणि गेट आऊट… अरे तू काय धमकी देतोय? तू मुख्यमंत्री असताना जनतेनेच तुला गेट आऊट केले, असे वक्तव्य करत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केला.
नारायण राणे पुढे असेही म्हणाले, पुढच्या निवडणुकीची वाट पाहताय, मुख्यमंत्री मलाच करा… सत्ता कशी येणार? आम्ही सत्ता द्यायला नाही बसलो, आम्ही सत्तेत आहोत आणि राहणार… तुमचं काय काम? काय केलं अडीच वर्षात? फक्त दोन दिवस मंत्रालयात.. असा मेंगळट मुख्यमंत्री आम्हाला नको. काहीच येत नाही अन् काय कळत नाही. मग काय झक मारायला आलास मुख्यमंत्री बनायला, असे म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर जिव्हारी लागणारी टीका केली.
शरद पवारांचे वय ८३ झाले तरी त्यांना स्वतःच्या जातीला न्याय देता आला नाही, ते आता लावालाव्या करत फिरत आहेत, असेही राणे म्हणाले. रविवारी महाविकास आघाडीने राज्य सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन केले. त्याला नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले.
नारायण राणे म्हणाले की, शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडला तो माझ्या मतदारसंघात आहे म्हणून मी आज पत्रकार परिषद घेत आहे. तो पुतळा पडला हे दुर्दैवी. पण सामनामध्ये ज्या प्रकारची भाषा वापरण्यात आली तशी वापरू नये. मुख्यमंत्र्यांना गेट आऊट म्हणणारे उद्धव ठाकरे कोण आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना असे बोलतो, कोण आहेस तू?
उद्धव ठाकरेंवर टीका करताना नारायण राणे म्हणाले की, यांनी महाराष्ट्राची माफी मागितली नसती तर महाराष्ट्राने यांना संपवले असते असे उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदींना उद्देशून बोलले होते. त्यावर उद्धव तुझी लायकी नाही मोदींना बोलायची. तुझ्यासारखा भ्रष्ट माणूस मी बघितला नाही. एकदा एक काम करण्यासाठी याने बिल्डरकडून ३ लाख रुपये घेतले होते. आमच्या रवी शेंडगेकडून मिलिंद नार्वेकरने ३ लाख घेतले होते. कोविड महामारीत आदित्य ठाकरेने १५ टक्के कमिशन घेतले. त्यामुळे यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये. तू कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाही. प्रशासन नाही, कायदा माहीत नाही, काय होणार मुखमंत्री?
नारायण राणे म्हणाले की, आजही शरद पवार जाती-जातीमध्ये लावालावी करत आहेत. त्यांची प्रत्येक गोष्ट संशयास्पद आहे. पवारांनी शांततेचा संदेश दिला पाहिजे, पण ते काडी आणि पेट्रोल घेऊन फिरतात. पवार सत्तेत येणार म्हणतात, पण अजित पवार त्यांना सत्तेत येऊ देणार का?
पुतळा पडल्यानंतर त्यावर राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन तो पुन्हा उभारण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यावर राजकारण करत आहेत, असा आरोप नारायण राणे यांनी केला.
माझे पण इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहेत, असे म्हणत नारायण राणे म्हणाले की, मला पण एक फोन आला, शिव्या वगैरे घातल्या. मी त्याचा नंबर आणि पत्ता काढला. तर तो शरद पवार यांचा कार्यकर्ता निघाला. शरद पवार भडकवण्याचे राजकारण करत आहेत.
जयंत पाटलांनी तीन वेळा विनंती केली
राजकोट किल्यावरील घटनेसंबंधी बोलताना नारायण राणे म्हणाले की, राजकोटवर मी गेलो तेव्हा विजय वडेट्टीवार तिथे होते. त्याने येऊन हात वगैरे मिळवला. त्यानंतर हे कोण आले घोषणा देत? मी पोलिसांना सांगितले, हा आता आलाय मी त्याला जाऊ देणार नाही. मग जयंत पाटील आले सांगायला, दादा जाऊ दे. तिसऱ्यांदा जयंत पाटील आले आणि म्हणाले, दादा जाऊ दे. मी सांगितले इथून मान खाली घालून जायचे, वर करायची नाही. तेव्हा जाऊ देतो.