नवी दिल्ली: तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे. यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच वित्तहानीही मोठ्या प्रमाणात आहे. दोन्ही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस कोसळत आहे. यामुळे नद्या तुफान वाहत आहेत. तसेच हैदराबादसह विजयवाडा सारख्या शहरेही जलमय झाली आहेत.
स्थिती जाणून घेण्यासाठी तसेच बचाव कार्याच्या समन्वयासाठी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंक्षी ए रेवंत रेड्डी आणि एन चंद्राबाबू नायडू यांनी आपात्कालीन बैठक घेतली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनीही दोन्ही मुख्यमंत्र्यांशी बातचीत केली तसेच केंद्राकडून संपूर्ण मदत मिळण्याचे आश्वासन दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार दोन सप्टेंबरला सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मुसळधार पाऊस आणि अनेक ठिकाणी पटरीवर पाणी भरल्याने ९९ रेल्वे रद्द करण्यात आल्या.
पंतप्रधानांनी फोनवरून घेतली माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याशी बातचीत केली. तसेच या राज्यांतील स्थिती जाणून घेतली.त्यांनी या आव्हानाशी लढण्यासाठी केंद्राकडून हवी ती मदत मिळणार असल्याचे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले की राज्य सरकार सातत्याने लोकांना याबाबतीत मदत करत आहे. खम्मम जिल्ह्यात मोठे नुकसान झाल्याची माहिती यावेळी पंतप्रधानांना देण्यात आली.