रामकृष्ण परमहंस यांचे नाव आधुनिक भारतीय धर्मप्रबोधनात घेतले जाते. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण परमहंस यांना आपले गुरू मानले. तसेच कवियित्री बहिणाबाईंचे काव्य म्हणजे मराठी साहित्यामध्ये ज्ञानाचे भांडारच जणू. अशा महान लोकांच्या ‘उर्जा वलयातून’ आपल्याला प्रेरणा घेण्यासारखे खूप काही आहे.
ओंजळ – पल्लवी अष्टेकर
रामकृष्ण परमहंस
रामकृष्ण परमहंस यांचे नाव आधुनिक भारतीय धर्मप्रबोधनात घेतले जाते. त्यांचा जन्म पश्चिम बंगालमध्ये १७ फेब्रुवारी १८३६ मध्ये एका गरीब कुटुंबात हुगळी जिल्ह्यातील कामारकुपुर या खेड्यात झाला. त्यांच्या मातेचे नाव चंद्रादेवी व वडिलांचे नाव खुदीराम चट्टोपाध्याय. श्री रामकृष्ण यांचे मूळ नाव गदाधर असे होते. त्यांचा मातीच्या मूर्ती बनविण्यात हातखंडा होता. संगीत व काव्य त्यांना मनापासून आवडे. स्वरचित भजने व स्तोत्रे गाण्यात त्यांना विलक्षण गोडी वाटत असे.
शालेय शिक्षणाची रामकृष्ण यांना विशेष आवड नव्हती. साधूंच्या मठात जाऊन भक्तिगीते रचण्याचा व पुराणांतील कथा, गाण्यांचा त्यांना छंद लागला. आपली मातृभाषा बंगाली ते वाचू शकत असत. गावातील पुराणिकांकडून, तीर्थयात्री, संन्यासी यांच्याकडून कथा ऐकून लहान वयातच त्यांची ओळख पुराण, रामायण, महाभारत व भागवत इ. ग्रंथांशी झाली.
रामकृष्ण यांच्या वडिलांचे १८४३ मध्ये निधन झाले. वडिलांचे फार लवकर निधन होण्याचा खोलवर परिणाम त्यांच्या मनावर झाले. त्यांचे थोरले भाऊ रामकुमार हे कलकत्त्याच्या उत्तरेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या दक्षिणेश्वरातील कालीमातेचे पुजारी होते. त्यांच्या जवळ सतरा वर्षे वयाचे रामकृष्ण राहायला गेले.
रामकुमार यांच्या निधनानंतर रामकृष्ण हेच कालीमातेच्या मंदिरात पुजारी बनून राहू लागले. त्यांची कालीमातेवर अपार श्रद्धा होती. १८५६ मध्ये त्यांचे बंधू रामकुमार यांची जागा रामकृष्णांनी घेतली. कालीमातेच्या मंदिराच्या वायव्य कोपऱ्यात त्यांना एक खोली देण्यात आली. येथेच त्यांनी जीवनाचा बहुतांश काळ घालविला.
शुद्धी, पावित्र्य, श्रद्धा, नि:स्वार्थता यामुळे ग्रांथिक ज्ञानाला व पांडित्याला महत्त्व आणि सौंदर्य प्राप्त होते असे रामकृष्णांचे म्हणणे होते.
रामकृष्णांचा विवाह सारदामणी या रामचंद्र मुखोपाध्याय यांच्या मुलीशी झाला. त्यांनीही अध्यात्म मार्गाचा अवलंब केला.
रामकृष्णांना ‘तोतापुरी’ नावाच्या अव्दैत साधनेतील या गुरूंनी निर्विकल्प समाधीचा अनुभव घेण्याचा मार्ग दाखविला. या मार्गाने रामकृष्णांनी निर्विकल्प समाधी प्राप्त केली.
‘परमहंस’ म्हणजे मानस योगी. तो सतत ईश चिंतनात मग्न असतो. तो त्रिगुणातीत असतो. परमहंसाची अनेक लक्षणे रामकृष्णांना अभिप्रेत होती. त्यामुळे ‘तोतापुरी’ यांनी रामकृष्णांना परमोच्च कोटींचा संन्यासी म्हणून ‘परमहंस ‘ही उपाधी प्रदान केली.
आध्यात्मिक साधनेतून घेतलेला साक्षात अनुभव हा त्यांच्या विचारांचा एकमेव आधार होता.
रामकृष्णांना भेटायला नुकतेच देवभक्त येत नसत, तर तत्त्वज्ञ व विचारवंतदेखील येत असत. केशवचंद्र सेन, महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर, स्वामी दयानंद सरस्वती, ईश्वरचंद्र विद्यासागर यासारखे समाजसुधारकही येत असत. आपल्याकडे येणाऱ्या लोकांशी ते आपल्या निखळ अनुभवांचे कथन करीत. रामकृष्णांच्या सखोल ज्ञानाचा, अनुभवांचा व प्रतिभेचा प्रभाव लोकांना जाणवू लागला. अशा युवकांमध्ये नरेंद्र दत्त या धीट तरुणाचा समावेश होता. त्याने रामकृष्णांना अनेकदा विश्वासंबंधी निर्भयतेने, परखडपणे, वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रश्न विचारले आणि रामकृष्णांनी ते सक्षमरीत्या सोडविले. नरेंद्र दत्त ऊर्फ स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण परमहंस यांना आपले गुरू मानले. १८८१ मध्ये रामकृष्ण परमहंस यांनी नरेंद्रला आध्यात्मदीक्षा दिली व त्यानंतर नरेंद्र हे स्वामी विवेकानंद या नावाने ओळखले जाऊ लागले.
रामकृष्ण परमहंस मानत की, “परमेश्वराची संपूर्ण सत्ता अविनाशी, असीम, अनादी, निर्गुण, निराकार अन् सर्वव्यापी आहे. त्यासमवेतच बदलणारे हे जग फसवे, खोटे, असत्य व मिथ्या नाही, तर या जगात प्रभूचे वास्तव्य असल्यामुळे तेही सत्य (पण अंशतः) आहे” असे ते मानत.
‘संन्यास’ हा प्रत्येक व्यक्तीला आचरता येणार नाही याची रामकृष्ण परमहंसांना पूर्णतः जाणीव होती. कारण प्रत्येक व्यक्तीला स्वतःची उपजत प्रवृत्ती, स्वतःचा उपजत स्वभाव, प्रवृत्ती, शारीरिक व मानसिक क्षमता, आवडी-निवडी यांच्या मर्यादा पडतात. मात्र सदाचरण, विवेक, सारासार बुद्धी यातून नैतिक शुद्धता स्वीकारता येते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रामकृष्ण परमहंस. शेवटी कर्करोगाने त्यांचा मृत्यू झाला.
स्वामी विवेकानंद हा आदर्श त्यांनी जगाला दिला. स्वामी विवेकानंदांनी ‘रामकृष्ण मठ’ व ‘रामकृष्ण मिशन’ची स्थापना केली.
कवियित्री बहिणाबाई चौधरी
कवियित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म १८८० मध्ये झाला. त्यांचे माहेर जळगावपासून दोन कि. मी. अंतरावर असलेले ‘असोदे’ हे गाव. कवियित्री बहिणाबाईंना तीन भाऊ व तीन बहिणी होत्या. जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला. घरात एकत्र कुटुंब, शेतजमीन, जनावर असा सारा पसारा होता. बहिणाबाई स्वभावाने प्रेमळ होत्या. त्या सर्वांना जीव लावत. त्याकाळी घरच्या स्त्रियांना सतत कष्टाची कामे करावी लागायची. नणंदा, जावा, दीर, त्यांची मुले, गडीमाणसं अशा सर्वांशी बहिणाबाई प्रेमाने वागत.
कवियित्री बहिणाबाईंना दोन पुत्र व एक कन्या होती. त्यांचे पती नथुजी लवकर देवाघरी गेले. तेव्हा त्यांचा धाकटा मुलगा सोपान फक्त तीन वर्षांचा होता. कवियित्री बहिणाबाई आयुष्यभर निरक्षर राहिल्या,परंतु त्या ज्या काव्यरचना गायच्या, त्या शेजार-पाजारच्या लोकांनी लिहिल्या. त्यातील काही नष्ट झाल्या, तर काही शिल्लक राहिल्या. यातून त्यांची प्रतिभा दिसून येते.
संकटे तर बहिणाबाईंच्या आयुष्याचा भाग बनून राहिली होती. दुष्काळानंतर आलेल्या प्लेगच्या साथीत त्यांचा मोठा मुलगा ओंकार सापडला. तो वाचला, पण अपंग झाला. कवियित्री बहिणाबाई यांच्याकडे निसर्गदत्त प्रतिभा होती. शेतकाम व घरकाम करता-करता त्या उत्स्फूर्तपणे ‘लेवा गणबोली’ तील ओव्या व कविता रचून गात असत. पोटासाठी काम करताना त्यांना कोणतेही काम हलके नाही असे वाटायचे. बहिणाबाईंची मुले लहान असताना त्यांना तलाव खुदाईच्या कामावर खडी फोडायला जावे लागत असे. कामे करता करता त्यांच्या तोंडातून ओव्या बाहेर पडत असत. कवियित्री बहिणाबाईंचे काव्य म्हणजे मराठी साहित्यामध्ये ज्ञानाचे भांडार आहे. सर्व प्रकारच्या काव्यरचना त्यांच्या साहित्यातून साकारल्या गेल्या. स्री, शेती, आत्म, आध्यात्म, कूट रचना, सामाजिक, विनोदी, जीवनभाष्य अशा विविध पैलू मधील त्यांच्या रचना मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत. त्या वाचून अचंबित व्हायला होते.
उदा. आध्यात्मविषयक:
बिना कपाशीनं उले
त्याले बोंड म्हनून नाही
हरी नामाईना बोलले
त्याले तोंड म्हनून
उदा. निसर्गविषयक:
अरे खोप्यामधी खोपा,
सुगरणीचा चांगला.
देखा पिलासाठी तिनं,
झोका झाडाले टांगला.
कवियित्री बहिणाबाईंना भजन, कीर्तन यांची खूप आवड होती. अशिक्षित, अडाणी बहिणाबाईंच्या मनगटात समाज प्रबोधनाची अफाट ताकद होती. हल्ली वेगवेगळ्या विद्यापीठातून त्यांचे काव्य अभ्यासले जात आहे. त्यांच्या काव्यातून अहिराणी भाषेतील गोडवा, व्यवहार, जीवनविषयक तत्वज्ञान आपोआपच मिळते. तीन डिसेंबर १९५१ मध्ये बहिणाबाईंनी या जगाचा निरोप घेतला. आपल्या काव्यरूपाने त्या अजरामर आहेत. अशा महान लोकांच्या ‘उर्जा वलयातून’ आपल्याला प्रेरणा घेण्यासारखे खूप काही आहे.