निसर्गवेद – डॉ. महालक्ष्मी वानखेडकर
अद्भुत, सृजनशील मूर्तिमंत रूपातील गूढ अशा परमेश्वरी कलाकृती अॅमेझॉन वर्षावनात पाहायला मिळतात. ॲमेझॉन वर्षावनामध्ये अगदी छतापासून ते अंडर स्टोरी, वन, नदी, दलदल, अशा सर्व ठिकाणी राहणाऱ्या आश्चर्यकारक, वैविध्यपूर्ण, आकर्षक, शक्तिशाली, रंगीबेरंगी, ज्ञात अज्ञात, गूढ अशा पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. अंदाजे ३,८०० पेक्षा जास्त प्रजाती या अॅमेझॉनमध्ये असाव्यात असा अंदाज आहे. ॲमेझॉनमध्ये असे असंख्य प्राणी, पक्षी, कीटक या जीवसृष्टीमध्ये आहेत. निसर्गाशी मिळते-जुळते जे आपण पाहू सुद्धा शकत नाहीत म्हणूनच आपल्यासाठी अनेक जीव अजून अनभिज्ञच आहेत. या लेखातून आपण आज ॲमेझॉनमधील वर्षावनातील पक्ष्यांच्या राज्यात जाऊया.
येथे अनेक प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. जसे ब्लू जेओन बिल, फ्लेमिंगो, ए ग्रेट सुगरण, बदक, टुकन, किंगफिशर, बगळे, गरूड, घारी, पोपट, चिमण्या, मकाव, गिधाडे. यामध्ये केशर फिंच, सूर्यपक्षी, सन पार्किट, स्वर्गीय ट्रँगल, आराकारी, स्पेक्टॅकल घुबड, स्कार्लेट मकाव, मोट मोट, स्फिंक्स – एस – गुआन, कॉलर हॉक, विविध प्रकारच्या घारी, राखाडी डोक्याचा पोपट, सोनेरी डोक्याची मैनाकिन, राखाडी डोक्याचा पतंग, गिधाडे, जाबीरू सारस, स्केल क्रिस्टेड पिग्मी, क्रिस्टेड ओरोपेंडोला, पफ बर्ड्स, क्वेट्झल अशा अनेक प्रकारचे अनेक पक्षी येथे आहेत. काही ज्ञात तर काही अज्ञात. येथील प्रजाती आणि उत्क्रांती विषयी वैज्ञानिकांचे अनेक तर्कवितर्क आहेत. फ्लोअर म्हणजे जमिनीपासून ते वर्षा वनातील छतापर्यंत जेवढे कीटक, सरपटणारे प्राणी आहेत, ते सर्वच या पक्ष्यांचा आहार आहेत. शिवाय फळ, फुले, मध, मासे हे तर आहेच आहे; म्हणजे परिपूर्ण जंगल म्हणजेच या पक्ष्यांचे खरे घर.
यापूर्वीच्या लेखात आपणमकाव, टुकन, हमिंग बर्ड, किंगफिशर, क्वेट्झल यांची माहिती घेतलेली आहे. मकाव निळा, पिवळा, स्कार्लेट लाल भडक मकाव अशा अनेक मकाऊच्या प्रजाती आहेत. सगळ्यात मोठे रंगीबेरंगी सुंदर असे पोपट जे अॅमेझॉनमध्ये खूप आढळतात. हायसिंथ मकाव हा निळ्याभोर रंगाचा मोठा पोपट. तीन फुटांची लांबी असणारा हा विशालकाय पोपट. यांची चोच पूर्णपणे काळी आणि चोचीच्या मागचा भाग पिवळ्या पट्ट्याचा, डोळे सुंदरशा पिवळ्या पानासारखे आणि त्यात निळा भोर डोळ्यांचा ठिपका जणू काही पानावर निळा पाण्याचा थेंबच पडला आहे असे त्याचे एकंदरीत आकर्षक स्वरूप आहे. हा या विश्वातील दुर्मिळ पक्षी आहे. जो ॲमेझॉन मध्येच आढळतो. येथे पिवळ्या, राखाडी तोंडाच्या इंद्रधनू पोपटांचे विविध प्रकार या जंगलात आहेत.
हार्पी गरूड जगातील सर्वात मोठे गरुड जे नजरेस पडणे म्हणजे फारच दुर्मीळ. हार्पी गरूड हा समुद्र गरुडासारखाच प्रथम स्थानावर आहे. हा दक्षिण आणि मध्य अमेरिकेत आढळतो. जगातील सर्वात वेगवान असा हा गरूड याचे पंख राखाडी आणि काळपट असतात. याची शरीराची लांबी चोचीपासून ते शेपटापर्यंत तीन फुटांची असते. पंख ७.५ इतक्या लांबीचे असतात. हे जास्त उंच उडत नाहीत. नराचे वजन ५.९ किलो तर मादीचे वजन ७.४ किलोपर्यंत असू शकते. हार्पी गरुडाची दृष्टी खूपच तीक्ष्ण असल्यामुळे २०० मीटरवरून तो २ सें.मी. पेक्षाही कमी आकाराची कोणतीही गोष्ट पाहू शकतो. हा इतका विशालकाय आणि शक्तिशाली आहे की, सात किलो वजनाच्या स्लॉथलासुद्धा उचलून याला नेताना पाहिले आहे. एखाद्या अस्वलाच्या पंजासारखे याचे पंजे खूपच प्रभावशाली आणि मजबूत असतात. आपल्या शिकारीची हाडे हे त्वरित चिरडतात. गंमत म्हणजे कावळा या गरुडाला अजिबातच घाबरत नाही आणि हा सुद्धा कावळ्याला काही करत नाही. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा हार्पी गरुडाच्या पिल्लांना पुरेसे अन्न न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यूसुद्धा होतो. कारण वृक्षतोडीमुळे तेथील वन्य प्राण्यांची संख्या कमी होत आहे. गोल्डन हेडेड मॅनकीन. पिवळ्या डोक्याची आणि काळ्याभोर रंगाची गोंडस चिमणी. जेमतेम तीन इंचाची. यांच्या जवळजवळ ६० प्रजाती आहेत. छोटीशी नाजूक शेपटी, डोक्यावर सोनेरी टोपी, पूर्ण काळे शरीर, गुलाबी पाय आणि पिवळी चोच अशी ही मैनाकिन चिमणी.
“कॉक ऑफ द रॉक” थोडासा विचित्र दिसणारा. लाल, काळ्या रंगाच्या संगमाचा, ज्याच्या डोक्यावर अर्ध वर्तुळाकार तांबूस पिसे अगदी चोचीपर्यंत आलेली दिसतात. त्यामुळे त्याची चोच दिसतच नाही. त्या केशरी अर्धचंद्र मुकुटाची लालसर किनार असल्यामुळे तो मुकुट स्पष्टपणे उठून दिसतो. झाडांच्या ढोलीत राहणारी गडद लाल मादी आणि केशरी रंगाचा नर एखाद्या गुबगुबीत लाल फुटबॉल सारखा हा कॉक ऑफ द रॉक.
पिवळ्या डोक्याचा “कैराकरा” हा घारीच्या जमातीतला असून अतिशय राजबिंडा दिसतो. १८ इंच लांबीचा पिवळसर, भुरकट रंगाचा. प्राण्यांच्या शरीरावरील टिक्स सुद्धा हे पक्षी खातात. चिरीबिक्वेट्स इमराल्ड हा हमिंगबर्डच्या प्रजातीतील आहे. तर “क्रीमजन टोपॅज” हा जेमतेम नऊ इंचाचा, चमचमता, छटा बदलणारा. रंगीत असला तरी त्याच्यावरील लाल रंगाच्या छटेमुळे हिरवा रंग सुद्धा तांब्यासारखा दिसतो. तोंड काळपट रंगाचे, लांबट चोच असणारा, चोचीच्या खालच्या बाजूला गळ्याकडे सोनेरी हिरवट रंगाचे छटायुक्त असे चमचमते पंख, लांब शेपूट, फुलांतील मध घेण्यासाठी चोचीतून काढलेली लांब जीभ, लांब शेपटीकडील दोन पंख नेहमी गुणाकाराच्या आकारात वळलेले. हा खूप सुंदर गातो. अशा या नाजूक, सुंदर, आकर्षक,चमचमत्या रेशमी पक्ष्यांची सोय त्याचे संरक्षण व्हावे म्हणून त्या अद्भुत शक्तीने नैसर्गिकरित्या छतामध्ये राहण्याची केली असावी.
कीटक आणि वाळवी खाणारा “ब्लॅक बँडेड वूड पिकर” ११ इंचाच्या सुतार पक्ष्यांच्या प्रजातीतील. याची पार्श्वभूमी पिवळ्या रंगाची असून तपकिरी, काळपट पंख असतात. तसेच दुसरी प्रजाती लाल मान व डोके पंख विरहित असल्यामुळे लाल मानेचा सुतार पक्षी असे याला म्हटले जाते. याची काळ्या रंगाच्या पंखांची पाठ ज्याच्या अंतर्गत तपकिरी पंख असतात. तर ट्रोगान हा कबुतरासारखा दिसणारा, राखाडी रंगाचे शरीर आणि तांबड्या पोटाचा असतो.
हिरव्यागार चमकदार, रेशमी पंखांचा “विशिष्ट एंटबर्ड” ही लुप्तप्राय प्रजाती आहे. पिवळ्या पंखांचा सोनेरी मुकुटाचा एक मैनाकिन १९५७ मध्ये या वर्षा वनातील ब्राझीलच्या बाजूला दिसला होता. त्यानंतर २००२ पर्यंत तो कधीच नजरेला पडला नाही. चेस्टनट बेलिड गुआन, लाल सिस्किन, ब्राझिलियन मर्गासन हा काळाभोर पाणपक्षी, काही स्वर्गीय पक्षी, हायसिंथ मकाऊ, हार्पी ईगल, जबीरू करकोचा, अरारीप मनकिन, काकापो, ब्लॅक फेस हाॅक अशा अनेक प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती लुप्तप्राय झाल्या आहेत, तर काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. कोण जाणे किती जीव नामशेष झाले असतील. मुंग्या, कीटक, लार्वा ते मोठमोठे मृत प्राणी खाण्यापर्यंत निसर्गाच्या सर्व स्वच्छतेचं संतुलन करणारे, या विश्वातील वनस्पती शास्त्र समजून घेणारे हे पक्षी. जर हेच असे पक्षी नामशेष होत राहिले,ड तर या प्रकृतीचे संतुलन कोण करणार?