भिवंडी : तालुक्यातील पडघा पोलीस ठाणे हद्दीतील एक धक्कादायक घटना (Bhiwandi Crime) समोर आली आहे. एका पंचवीस वर्षीय युवकाचा पोलिसांच्या ताब्यात असताना रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी मुलीच्या घरच्यांवर व पोलिसांवर मुलाच्या मृत्यू प्रकरणी दोषी असल्याचा आरोप केले आहे.
नेमके प्रकरण काय?
सविस्तर घटना भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्यातील पाच्छापूर याठिकाणी घडली आहे. मृत युवक अनिकेत जाधव (२४) याचे वाशिंद येथील नात्यातील अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. प्रेमातून त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला व अनेक दिवसांपासून ते मध्य प्रदेश या ठिकाणी राहत होते. पोलिसांना याची माहिती मिळताच वाशिंद पोलिसांनी मध्य प्रदेशातील पोलिसांच्या मदतीने त्या दोघांना शोधून काढले. त्यानंतर मुलीच्या नातेवाईक दोघांनाही मध्यप्रदेशमधून महाराष्ट्रात आणत होते. परंतु महाराष्ट्रात येत असताना अनिकेत याचा राजधानी एक्सप्रेसमधून पडून मृत्यू झाला.
या अपघातानंतर अनिकेत याचा मृत्यू पोलिसांनी आणि मुलीच्या घरच्यांनीच केल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे. कारण पोलिसांच्या ताब्यात असताना सुद्धा अनिकेचा रेल्वे अपघातात मृत्यू होणे संशयास्पद असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी अनिकेच्या कुटुंबीयांनी केली आहे. याबाबत सखोल चौकशी न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपाइंचे किरण चन्ने यांनी दिला आहे. दरम्यान, या घटनेविषयी पोलिसांची प्रतिक्रिया विचारले असता पोलिसांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे.