विशेष – भालचंद्र ठोंबरे
द्वापारयुगात शंभरासूर नावाचा एक महापराक्रमी दैत्य होता. श्रीकृष्णाच्या प्रथम पुत्राकडून त्याचा वध होईल असा त्याला शाप होता. त्यामुळे श्रीकृष्णाच्या प्रथम अपत्याच्या जन्माकडे तो लक्ष ठेऊन होता.
तारकासूर नावाच्या दैत्याचा वध शिवपुत्राच्या हातून होणार असे शिवाचेच तारकासुराला वरदान होते. त्या कारणासाठी शिव पार्वतीचा विवाह होणे आवश्यक होते. सतीच्या निधनानंतर शिव वैरागी होऊन ध्यानधारणेत असल्यामुळे त्यांची ध्यान ध्यारणाभंग करण्याची जबाबदारी कामदेवावर सोपवण्यात आली. कामदेवाने त्यांना मदन बाण मारून त्यांची धानधारणा भंग केली. मात्र त्यामुळे रुष्ट झालेल्या भगवान शंकराच्या क्रोधात काम देवाचा बळी गेला. भगवान शंकराने आपला तृतीय नेत्र उघडून कामदेवाला भस्म केले. कामदेवाला भस्म करताच रती अतिशय खिन्न व दु:खी झाली. तिने महादेवाची विनवणी केली. तेव्हा द्वापार युगातच श्रीकृष्ण रुक्मिणीचा पुत्र म्हणून काम देवाचा पुनर्जन्म होईल व त्या जन्मी तो प्रद्युम्न म्हणून असेल तर तू माया म्हणून त्याची वाट पाहशील असा भगवान शंकरांनी तिला वर दिला.
प्रद्युम्नचा जन्म झाल्यावर तो सात महिन्यांचा असताना शंभरासुराने त्याला पळवून नेले व सागरात फेकून दिले. सागरात त्याला एका मोठ्या माशाने गिळले. हा मासा कोळ्याच्या जाळ्यात सापडला. त्या कोळ्याने मासा शंभरासुराकडे आणून दिला. शंभरासुराने तो आपल्या मुदपाकखान्यात जमा केला. मासा कापताच त्यातून एक बालक निघालेले पाहताच त्या स्वयंपाकाने त्या बालकाला मायावतीकडे सोपविले. मायावती ही त्यावेळेला स्वयंपाकाचा प्रभार सांभाळीत असे. (एका आख्यायिकेनुसार शंकराने कामदेवाला भस्म केल्यानंतर रती विमनस्कपणे फिरत असताना शंभरासुराने तिला पकडून आपल्याकडे आणले) मायावतीने त्या लहान बालकाचा चांगला सांभाळ केला. नारदाकडून तिला हा कृष्णपुत्र असल्याचे कळताच हा आपला पूर्वजन्मीचा पती आहे हे लक्षात येऊन ती त्याचा पतीसारखाच सांभाळ करू लागली. रसायन व मायावी विद्येच्या साहाय्याने तिने प्रद्युम्नला लवकर मोठे केले. मायादेवीने प्रद्युम्नला जादू व मायावी युद्धाचे प्रशिक्षण दिले.
प्रद्युम्न मोठा झाल्यानंतर माता असूनही पत्नीप्रमाणे मायावतीचे वर्तन पाहून त्याला आश्चर्य वाटले. तेव्हा नारदाने प्रकट होऊन त्याला त्याच्या पुनर्जन्माचे रहस्य सांगितले. आपल्याला शंभरासुराने पळवून आणल्याचे सांगताच प्रद्मुम्नला राग आला. त्याने शंभरासुराशी युद्ध करण्याचे ठरविले व त्याला युद्धाचे आव्हान केले. शंभरासुराने प्रथम आपल्या शंभर पुत्रांना पाठविले. प्रद्युम्नने त्या सर्वांना ठार केले. तेव्हा शंभरासूर आपल्या सैन्यासह स्वतः लढण्यासाठी आला. त्यांने प्रद्युम्नसोबत बराच काळ मायावी युद्ध केले, मात्र प्रद्युम्नने त्या सर्वाला निष्प्रभ केले. शेवटी शंभरासुराने देवी पार्वतीकडून मिळालेल्या सुवर्णास्त्राचा वापर करण्याचे ठरवले. हे शस्त्र आपल्या लक्षाचा वेध घेण्यात नेहमीच यशस्वी ठरले. शंभरासुराने सुवर्णास्त्राचा वापर करण्याचे ठरविताच इंद्राने नारदाद्वारा सुवर्ण अस्त्राला निष्प्रभ करणारे वैष्णवास्त्र देऊन प्रद्युमनाकडे पाठविले. नारदाने प्रद्युम्नला हे अस्त्र देऊन त्याच्या यशासाठी पार्वती देवीची आराधना करण्यास सांगितले. प्रद्युम्नने त्याप्रमाणे पार्वती देवीची आराधना केली. देवी पार्वतीने प्रसन्न होऊन प्रद्युम्नला अभय दिले. त्यामुळे शंभरासुराने सुवर्णास्त्र सोडताच त्याचा हार बनून ते प्रद्युम्नच्या गळ्यात पडले हे पाहून आश्चर्य चकित झालेल्या शंभरासुराचा प्रद्युमनाने वैष्णवास्त्र चालवून वध केला.
नंतर प्रद्युम्न मायावतीसह द्वारकेला आले. श्रीकृष्णासारख्या चेहरा पट्टीच्या या युवकाला पाहून रुक्मिणीसह सर्वांना अत्यंत आश्चर्य वाटले. सर्वज्ञ भगवान श्रीकृष्णाला सर्वच गोष्टीची माहिती होती मात्र सर्व बाबींचा उलगडा योग्य वेळी व योग्य मार्गानेच व्हावा असे नियोजन असल्याने श्रीकृष्ण मौन होते. तेव्हा नारदांनी प्रकट होऊन सर्व उलगडा केला. आपल्या पुत्राला पाहून रुक्मीणीसह सर्वांना अत्यंत हर्ष झाला.