Thursday, March 20, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरश्रीकृष्ण जन्माष्टमी कार्यक्रम प्रगती प्रतिष्ठान जव्हार येथे मोठ्या उत्साहात संपन्न

श्रीकृष्ण जन्माष्टमी कार्यक्रम प्रगती प्रतिष्ठान जव्हार येथे मोठ्या उत्साहात संपन्न

जव्हार(मनोज कामडी)- सर्वांच्या उत्सुकतेचा विषय असलेला बहु प्रतिक्षित श्रीकृष्ण जन्माष्टमी कार्यक्रम प्रगती प्रतिष्ठान येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात सुश्राव्य असे हरे कृष्ण महामंत्राचे गायन करण्यात आले .सर्व भाविक भगवत नामात तल्लीन झाले होते. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा याचा कुठेतरी किंचितसा अनुभव भाविकांना आला.
यानंतर राधा कृष्ण विग्रहांचा पंचामृताने अभिषेक करण्यात आला. श्री विग्रहांचा बघायला दुर्मिळ असा अभिषेक सर्वांना योग्य व्यवस्थापन केलेले असल्याने विना अडथळा बघायला मिळाला. भाविकांना डोळ्याचे पारणे फिटले असे वाटले आणि काहींना आनंदाश्रू मात्र आवरता आले नाही.

बालक भक्तांनी कृष्ण लीलेवर आधारित अतिशय मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. बालकांच्या या सादरीकरणाने सर्वांची मने खेचून घेतली.हे सर्व कार्यक्रम भक्तिमय गीत आणि लिखाणावर आधारित असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले.
गोवर्धन कृषी क्षेत्र गलतरे,इस्कॉन येथील वरिष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रूप रघुनाथ प्रभु यांनी प्रवचन दिले. यातून अध्यात्म कशी काळाची गरज आहे,आपली सनातन संस्कृती आपण जपली पाहिजे आणि सांसारिक जीवनातही भक्ती करणे सुलभ यावर प्रभुजींनी फार मोलाचे मार्गदर्शन केले. भक्ती सर्वांना शक्य आहे आणि समाधानी जीवनासाठी अत्यावश्यक आहे याची जाणीव भाविकांना झाली.

विग्रहांची महा आरती करण्यात आली ,भाविकांनी प्रेमाने तयार करून आणलेले ५६ भोग अर्पण करण्यात आले आणि त्यांनतर सर्वांना जेवण प्रसाद वितरित करण्यात आला. जवळपास ३००० भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट व्यवस्थापन ,सोय आणि अध्यात्मिक दिव्य अनुभवासाठी भाविकांनी समाधान व्यक्त केले.
या सोहळ्यासाठी तमाम जव्हार वासियांचा हातभार लागला त्यासाठी इस्कॉन जव्हार व्यवस्थापनाकडून आभार व्यक्त केले.
मनात निर्माण झालेली भक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी नियमित सत्संगाची आवश्यकता आहे. या साठी इस्कॉन जव्हार तर्फे प्रत्येक गुरुवारी प्रगती प्रतिष्ठान येथे सायंकाळी ७ ते ९ या वेळेत सत्संग आयोजित केला जातो. सर्व जव्हार वासियांना या संधीचा लाभ घेण्यासाठी आवाहन आणि विनंती करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -