भक्तांच्या हाकेला धावणारा श्री देव उपरलकर

Share

आंबोली मार्गावर सावंतवाडी शहराच्या पाच मिनिटांच्या अंतरावर वसलेल्या ३६५ खेडेगावांचा मालक व रक्षणकर्ता म्हणून श्री देव उपरलकर देवस्थानाकडे पाहिले जाते. श्री देव उपरलकर देवस्थानाची आख्यायिका जेवढी मोठी आहे त्यापेक्षाही हाकेला किंवा नवसाला पावणारा देव किंवा प्रसंगाला अदृशस्थितीत सहकार्य करणारा देव म्हणून ओळख आहे.

कोकणी बाणा – सतीश पाटणकर

सावंतवाडी संस्थान ३६५ खेडेगावांचा मालक व रक्षणकर्ता म्हणून श्री देव उपरलकर देवस्थानची ओळख आहे. आंबोली मार्गावर सावंतवाडी शहराच्या पाच मिनिटांच्या अंतरावर हे देवस्थान वसले असून सावंतवाडीवासीयांची या देवस्थानाविषयी अपार श्रद्धा आहे. भक्तगणात नवसाला पावणारा किंवा रक्षण करणारा देव म्हणूनच आजतागायत या देवस्थानची ओळख आहे. श्री देव उपरलकर देवस्थानची ओळख सर्वदूर असल्याने या मार्गाने जाणारे वाहनचालक वाहन थांबवून नतमस्तक होऊनच पुढे जातात.

सुंदरवाडी म्हणजेच आजची सावंतवाडी. हे शहरच मुळचे चराठा गावची वाडी असेच मानले जाते. सावंतवाडी संस्थानाच्या भोसले घराण्याने ओटवणे गावातून चराठा गावाच्या वाडीला म्हणजेच आजच्या सावंतवाडीला दरबार हलविला. नंतर हे शहर गेल्या ३५० वर्षांत अनेक नावाने ओळखले जाऊ लागले. त्यात सुंदरवाडी व सावंतवाडी या नावांचा उल्लेख मोठ्या अभिमानाने केला जातो. ३६५ खेडेगावांचा मालक म्हणून श्री देव उपरलकर देवस्थानाला ओळखले जाते. समोरचे दिसत आहे त्याला चाळा असे म्हणतात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, चाळा म्हणजे काय तर चाळा म्हणजे करणीबाधा, भूतबाधा घालवणारी एक शक्ती. अशी येथील लोकांची भावना आहे. करणीबाधा होऊ नये यासाठी या ठिकाणी कोंबा देण्याची प्रथा आहे. श्री उपरलकर देवस्थानाची आख्यायिका जेवढी मोठी आहे त्याहीपेक्षा नवसाला पावणारा देव म्हणून या देवस्थानाची ओळख आहे. त्यांच्यात शिवशंकराचा अंश असल्याची कथाही सांगितली जाते आणि त्यावर लोकांचा विश्वास आहे. या देवस्थानच्या श्रद्धेमुळे अनेक भाविकांचे रक्षण झाल्याच्या कथा आहेत. मोती तलावाकाठी राजधानी बसविण्याच्या वेळी चार सीमारक्षकांची नेमणूक राजघराण्याने केली. उपकरकर, माठेवाड्यातील दिंडीकर, सालईवाड्यातील काजरेकर आणि गरडीतील हेळेकर हे चार सीमारक्षक उपरलकर शंकराच्या आद्यदेवतांचा अंश मानले जातात.

श्री देव उपरलकर देवाकडे ३६५ खेड्यांतील चाळे सुपूर्द आहेत. ३६५ खेड्यांतून त्यावेळचे दांडेकर व प्रमुख गावकरी मंडळी बकरा अगर कोंबड्यांचा सांगड, एक नारळ व पानाचा विडा घेऊन वाजतगाजत येत. त्यावेळच्या राजांच्या हस्ते या देवकार्याचा सोहळा होत असे. प्राणीबळी देण्याची ही पद्धत बापूसाहेब महाराजांनी बंद केली, अशी एक माहिती दिली जाते. संस्थानांवर गनिमांचा हल्ला झाला. संस्थानची त्यांना प्रतिरोध करण्याची तयारी नव्हती. त्यावेळी तत्त्कालीन राजे आबासाहेब देवपूजेसाठी श्री देव पाटेकरांकडे बसले होते. सेनापती दळवी यांनी गनिमांच्या चढाईची हकीकत त्यांच्या कानी घातली. राजेसाहेबांनी दळवींच्या हातात नारळ दिला व उपरलकरांकडे गाऱ्हाणे घालून नारळ फोडण्यास सांगितला. सेनापतींनी तसे करताच गांधीलमाश्यांचे मोहोळच्या मोहोळ उठून त्यांनी शत्रूशी दाणादाण उडवून दिली. श्री देव उपरलकर देवाच्या कृपेने त्याकाळी सैन्य पळविण्यात खेमसावंत यशस्वी झाले. त्यावेळी ओटवणे येथे कौलप्रसाद घेतला. त्यावेळी श्री देव उपरलकर यांनी मी या संस्थानातून जाणार नाही असे सांगितले. तेव्हा संस्थानच्या ३६५ खेड्यांचा मालक म्हणून जबाबदारी उपरलकर देवाने घेतली, अशी आख्यायिका आहे.

सावंतवाडी संस्थानाच्या स्थापनेनंतरच्या २५ वर्षांच्या काळातील हे उपरलकर देवस्थान आहे. ३६५ खेडेगावांचे रक्षण करणाऱ्या शंकराचा शिवगण म्हणून मानल्या जाणाऱ्या उपरलकरास कोंबे देण्याची प्रथा आहे. या देवस्थानशेजारी एक तळी आहे म्हणजेच विहीर आहे. या देवस्थानच्या जवळ उपरलकर स्मशानभूमी आहे. तेथे मृत व्यक्तीस अग्नी दिल्यानंतर क्रियाकर्म या तळीजवळ केले जायचे. त्या काळात पाणी पिणे अवघड होते. म्हणून वनखात्यात नोकरीला असणारा आप्पा भेंडे यांनी ही तळी बांधली. त्याच शेजारी पत्नी काशीबाई स्मरणार्थ दिवाकर रामचंद्र भेंडे कट्टा पेंडूर शके १८१४ मध्ये तळी बांधल्याचा एका खांबावर उल्लेख आहे. सन १९९२ मध्ये प्रभाकर मसुरकर यांनी तळीचे दुरुस्तीचे काम केले.

श्री देव उपरलकर मूर्ती दत्तभक्त प्रभाकर मसुरकर यांच्या खर्चाने प्रसिद्ध मूर्तिकार दादा चव्हाण यांनी उभारली आहे. आज या देवस्थानाचे व्यवस्थापन देवस्थानाचे मानकरी विद्याधर नाईक शीतप आणि शुभम नाईक शीतप पाहतात. त्यांनी या देवस्थानाला देखणे रूप दिले आहे. या देवस्थानात दर रविवारी व बुधवारी सावंतवाडी शहरासह आजूबाजूच्या गावातील भक्तगण, त्यात महिला, पुरुष, मुलेही येतात. आज उपरलकराची श्रद्धा एवढी मोठी आहे, की राजकारणी मंडळी निवडणूक काळात नतमस्तक होण्यासाठी येथे येतात. श्री देव उपरलकर देवस्थानाची आख्यायिका जेवढी मोठी आहे त्यापेक्षाही हाकेला किंवा नवसाला पावणारा देव किंवा प्रसंगाला अदृश्य स्थितीत सहकार्य करणारा देव म्हणून ओळख आहे.

(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Recent Posts

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

36 minutes ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

1 hour ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…

2 hours ago

पहलगाममधील नरसंहार, हिंदू पर्यटकांना टार्गेट

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…

2 hours ago

SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…

3 hours ago

अटारी बंद, व्हिसा रद्द, सिंधू करार बासनात, पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…

3 hours ago