दिनू खरे गरीबच असतो; परंतु सिनेसृष्टीच्या मूलभूत नियमांप्रमाणे त्याची प्रेयसी मालू मात्र श्रीमंत बापाची मुलगी असते! मग काय, या उमद्या, इतर बाबतीत परस्परांना अनुरूप असलेल्या, एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमिकांचे लग्न वधू पित्याच्या अनुमतीने पार पडण्याची शक्यता कमीच!
सिनेसृष्टीच्या पूर्वीच्या दुसऱ्या एका उपनियमाप्रमाणे दिनू आणि मालू लग्न करण्यासाठी पळून जायचा निर्णय घेतात. एक बोगस रेल्वे पास वापरून दोघे पळून जातातही! पण तत्कालीन दक्ष रेल्वे अधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे पकडले जातात. तुरुंगात दोघांना वेगवेगळ्या कोठडीत ठेवले जाते आणि तिथेच मराठी सिनेमातले एकेकाळी खूप लोकप्रिय झालेले गंमतशीर गाणे आपल्याला ऐकायला मिळते-
‘मधू इथे अन् चंद्र तिथे, झुरतो अंधारात,
झुरतो अंधारात, अजब ही मधुचंद्राची रात.’
सिनेमाचे नावच होते ‘मधुचंद्र.’ ‘मधू-वसंत चित्र’तर्फे १९६७ साली प्रकाशित झालेल्या या सिनेमाचे दिग्दर्शक होते राजदत्त! प्रमुख भूमिकेत होते काशिनाथ घाणेकर, उमा भेंडे, श्रीकांत मोघे, राजा पंडित, बर्ची बहादर, नाना पळशीकर, राजा परांजपे आणि मास्तर सचिन. ‘मधुचंद्र’ची दोन वैशिष्ट्ये म्हणजे तो राजदत्त यांचा पाहिलाच चित्रपट होता आणि आधी केवळ नाट्यकलावंत असलेले काशिनाथ घाणेकर या सिनेमामुळे चमकले आणि मोठे चित्रपट अभिनेते म्हणून उदयास आले.
गदिमांनी ‘मधुचंद्र’साठी एकापेक्षा एक सुंदर गाणी दिली. त्यात होती –
“हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी, दिसशी तू, दिसशी तू, दिसशी तू, नवतरुणी काश्मिरी”,
“मधू इथे अन् चंद्र तिथे झुरतो अंधारात, झुरतो अंधारात, अजब ही मधुचंद्राची रात”,
“मला समजले तुला समजले” आणि “झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा.” अशी गाणी.
गदिमा म्हणजे एक चमत्कारच होता. अभिजात, गोड मराठीत अगणित अलंकारांनी सजलेली हजारो गाणी लिहिणारा हा गीतकार दुसरीकडे अस्सल ग्रामीण मराठीत ठसकेबाज लावण्याही लिहायचा आणि गीत रामायाणासारखे महाकाव्यही सहज कागदावर उतरवायचा. मधुचंद्रमधील ‘हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी’ हे गाणे गदिमांच्या कल्पनाशक्तीचा, उपमा अलंकारावरील त्यांच्या हुकुमतीचा, अवघ्या चार शब्दांत श्रोत्याला रोमँटिक मूडमध्ये नेण्याऱ्या जादूई लेखणीचा पुरावाच होते.
संगीतकार एन. दत्ता यांनी या गाण्याचा मूड लक्षात घेऊन त्यासाठी जबरदस्त ठेका निवडला होता. त्यावर पुन्हा या रोमँटिक गाण्यासाठी महेंद्र कपूर यांची निवड करून तर, ‘दुधात साखर’ऐवजी जणू ‘वाईनमध्ये मध’ टाकले!
गाण्याआधी उमा आपल्याला मधुचंद्रासाठी चांगल्या ठिकाणी जायला न मिळाल्याबद्दल दिनूकडे तक्रार करत असते. तेव्हा काशिनाथ घाणेकर म्हणतात, ‘मालू, कशाला हवे लंडन आणि पॅरिस, अग प्रेमाचं माणूस बरोबर असलं ना की, मुंबईचा धोबी तलावसुद्धा काश्मीरच्या ‘दाल सरोवरा’सारखा सुंदर वाटायला लागतो! आणि पाठोपाठ हे गाणे सुरू होते. त्यात गदिमांनी दिलेल्या उपमा भारीच होत्या. समोरच्या ओढ्याला पाहून ते म्हणतात, ‘बघ निळसर पाणी झेलमचे झुळझुळे’, वाळलेल्या गवताचाही उद्धार करून ते म्हणतात, ‘हे गवत नव्हे गे पिवळे केशरमळे’ गदिमांच्या या शब्दांनी सह्याद्रीच्या डोंगरावरील वाळलेले गवतसुद्धा खूश झाले असेल!
उदास, निराश मनाला उभारी देणारे एक दुसरे गाणे मधुचंद्रमध्ये होते. पुन्हा महेंद्र कपूर यांच्याच दमदार पहाडी आवाजात! मनात उत्साहाच्या, कलंदरपणाच्या, लहरी उमटवणारे चेतनादायी शब्द होते –
‘झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा,
फुलला पाहा सभोती आनंद जीवनाचा.’
माणसाचे मन निराश असताना, कधीकधी अगदी तत्कालिक अडचणींनीसुद्धा उदास होऊन जाते. त्याला जगण्याचा सगळा व्यवहार व्यर्थ वाटू लागतो. जगात सगळीकडे अर्थशून्यताच दिसू लागते. वसंत कानेटकरांच्या ‘मत्स्यगंधा’मधील नाट्यपदासारखे ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा, धर्म न्याय नीती सार खेळ कल्पनेचा’ असेच वाटू लागते.
अशावेळी अनेकदा एखाद्या जवळच्या व्यक्तीने नुसते दोन प्रेमाच्या शब्दांनी विचारले, ऐकून घेतले, तरी बरे वाटते. समोरचा जटिल प्रश्न सुटला नसता, तसाच ‘आ’ वासून उभा असतो, बाहेरच्या जगात काहीही बदल झाला नसता, तरीही उगीचच काहीतरी बदल घडेल अशी आशा वाटू लागते. गेलेला उत्साह परत येतो. गदिमांच्या या गाण्यातील शब्द तसेच होते. एखाद्या कलंदर, बिनधास्त मित्राने दिलासा द्यावा आणि आपला आत्मविश्वास हळूहळू पुन्हा परतू लागावा तसे हे गाणे ऐकल्यावर वाटते.
गीतकाराचे जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक, आशावादी, उत्साही दृष्टिकोन स्वीकारण्याचे पहिल्याच ओळीतील आवाहन, श्रोत्यांच्या मनाला थेट भिडते.
पुढे गीतकार वास्तवाशी भिडण्याचा सल्ला देताना म्हणतो, ‘परिस्थिती प्रतिकूल आहे. वातावरण तापले आहे, जणू नियतीचा सूर्य आकाशातून आग ओकू लागला आहे. आता कसे काय बाहेर जावे, परिस्थितीशी कसा संघर्ष करावा?’ अशा विचारांचे कल्लोळ मनात उठूच देऊ नकोस. तू चिंता सोडून येणाऱ्या प्रत्येक क्षणात नवे सुख शोध. आनंदाने त्याचा आस्वाद घे. आताचा निराशेमुळे वाटणारा मनाचा दुबळेपणा झटकून टाक.’
‘होईल ताप काही मध्यान्हीच्या उन्हाचा,
अविचार सोड असला कोल्हाळ कल्पनांचा.
आस्वाद घे सुखाने येत्या नव्या क्षणाचा,
झटकून टाका जीवा दुबळेपणा मनाचा.’
मग गदिमा एकेक प्रतीक वापरून सुंदर संदेश देतात. त्यांची उदाहरणे बायबलमधील चित्रमय भाषेची आठवण करून देतात. एकदा प्रभू येशूने त्याच्या प्रवचनात म्हटले होते, ‘…आणि तुम्ही वस्त्राविषयी का काळजी करता? रानातील फुले पाहा, ती कशी वाढतात? ती कष्ट करत नाहीत, सूत कातत नाहीत, तरी देव त्यांना किती सुंदर पोशाख घालतो. श्रीमंत शलमोन राजादेखील या रानफुलाप्रमाणे कधी सजू शकला नव्हता.’
गदिमा आपल्या गीतात विचारतात, ‘फूल तर उन्हाने सुकून जाणार असते. त्याचे आयुष्यच फक्त एक दिवसाचे असते! तरीही ते हसत जगावर सुगंधाचा वर्षाव करतेच ना?’
‘पुष्पास वाटते का भय ऊन पावसाचे,
आयुष्य त्यास आहे एकाच ना दिसायचे.
हसुनी करी परि ते वर्षाव सौरभचा,
झटकून टाक जीवा…’
कालचा दिवस वाईट गेला म्हणून उद्याचा वाईटच जाईल, असे का समजतोस. मनात उगाच निराशेला थारा देऊ नकोस. जीवनाचा आनंद घे. आजूबाजूच्या लोकांवर प्रेम कर, इतरांसाठी जीवाला जीव द्यायला शिक. तसे जगणेच सार्थ आहे. आपल्याला मिळालेले बहुमोल शरीर आजच आहे. ते नश्वर आहे. त्याच्या सहाय्याने जीवनाचा आस्वाद घे. मनातले मळभ काढून टाक.
‘का कालचा, उद्याला देसी उगा हवाला,
द्यावाच वाटतो ना मग जीव दे जीवाला.
अव्हेर काय करिसी अनमोल या तनाचा’
बालकवींनीसुद्धा एकदा स्वत:लाच विचारले होते, ‘कोठून येते कशी कळेना उदासीनता ही हृदयाला?’ तसे काही झाले की, अशी निराशा संपवून मनाला ताजेतवाने करणारी, हळुवारपणे गोंजारणारी जुनी गाणी ऐकायलाच हवीत ना?
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…