मुंबई : दरवर्षी जून ते ऑगस्ट महिन्यांच्या दरम्यान मुंबई-गेट वे ते मांडवा (Gateway To Mandwa) ही जलवाहतूक (Water Transport) सेवा बंद केली जाते. या महिन्यांच्या कालावधीत जोरदार पावसाचा अंदाज असल्यामुळे जलवाहतूक कंपन्यांकडून हा निर्णय घेण्यात येतो. यंदाही जून आणि ऑगस्ट महिन्यात गेट वे ते मांडवा ही जलवाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. मात्र आता पाऊस ओसरला असल्यामुळे कंपन्यांनीही सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिने ही सेवा बंद होती. मात्र आता सेवा सुरू झाल्यापासून गणेशोत्सवासाठी कोकणात विशेषतः अलिबाग मुरुड तालुक्यात येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवात अलिबागला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तीन महिने बंद असलेली मुंबई-गेट वे ते मांडवा ही जलवाहतूक सेवा आजपासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. हवामानाचा अंदाज घेवून मेरीटाईम बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. तसेच हवामानाचा अंदाज घेऊन दिवसाला एक ते दोन फेऱ्या होणार आहेत, असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, गणपती बाप्पाचे आगमन ७ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे अलिबागहून मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांना जलवाहतूक सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे. प्रवाशांना अलिबाग ते मुंबई असा रस्तेमार्गे पार करायला जास्त वेळ लागत होता. तसेच रोरो सेवेचे तिकिटाचे दरही अधिक असल्यामुळे सर्वसामान्यांना ते परवडत नव्हते. मात्र आता मांडवा- गेटवे सेवा सुरू झाल्याने नागरिकांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.