अहिल्यादेवी एक अतिशय योग्य शासक, संघटक होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्यांचा राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला. हा एक स्वप्नवत काळ होता. या काळात कायद्याचे राज्य होते आणि त्यामुळे त्या काळात जनतेची भरभराट झाली. अहिल्यादेवी होळकरांना जीवनकालात तर सन्मान मिळालाच, पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संताचा दर्जा दिला.
तरंग – वैष्णवी भोगले
रणरागिणी तू पुण्याश्लोकी,
जपलास वारसा शिवरायांचा!
उतरूनी रणांगणी दाखवलीस,
शत्रूस ताकद तुझ्या निश्चयाचा!!
न्यायदानाची पुरस्कर्ते तू,
राग तुला अन्यायाचा
अहिल्यादेवी तू
अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा…
जेव्हा जेव्हा समाजामध्ये अन्याय, अत्याचार, अधर्म वाढत होता तेव्हा त्याला संपवणाऱ्या शक्तीने या जगात जन्म घेतला. ३१ मे १७२५ रोजी माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांच्या पोटी धनगर कुटुंबामध्ये एक कन्या जन्माला आली. या कन्येच्या तेजाने साक्षात सूर्यही लाजला. या कन्येचे नाव होते ‘अहिल्या’…हीच ती महिला जिने सत्तेचा मंत्र वापरून विकासाचे तंत्र हिंदुस्थानच्या मातीत राबविले. चूल आणि मूल या समाज व्यवस्थेला झुगारून देऊन एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन तब्बल २९ वर्षे त्यांनी आदर्श कारभार केला.
अहिल्याबाईंना लहानपणापासूनच तलवार चालविणे, भालाफेक, युद्ध लढणे या गोष्टींचे शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जात होते. त्याचवेळी त्याच्या व्यक्तिमत्त्व विकासाची सुरुवात झाली होती. वयाच्या अकराव्या वर्षी पराक्रमी सरदार मल्हारराव होळकरांचे पुत्र खंडेरावांशी त्यांचा विवाह झाला. अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनात मल्हाराव होळकर यांचे फार मोठे योगदान मिळाले. मल्हाररावांनी आपल्या ८ वर्षांच्या सुनेला अहिल्याबाईंना युद्ध कसे करायचे? युद्ध रणांगणामध्ये सुरू होतं तेव्हा तोफांच्या आवाजाला निधड्या छातीने सामोरे कसे जायचे? हे त्यांना मल्हाररावांनी शिकविले.
अहिल्याबाईंचे पती खंडेराव हे देखील पराक्रमी योद्धा होते. १७५४ मध्ये कुंभेरीच्या लढाईत त्यांना वीरमरण आले. नवरा मेल्यानंतर स्त्रीला सती जायची परंपरा त्याकाळी होती; परंतु मल्हाररावांच्या सांगण्यावरून अहिल्याबाई सती गेल्या नाहीत. पण सती जाण्याची जी अनिष्ट परंपरा होती ती अहिल्याबाईंनी लाथाडण्याचे काम केले.
अहिल्याबाई होळकरांनी राज्य कोणाची गुलामगिरी करून मिळवली नाही, तर तलवारीच्या पातीवर आणि मनगटाच्या जोरावर राज्य उभे केले. अहिल्याबाई यांच्या हयातीतच नवरा, मुलगा, सासरे, जावई यांचे निधन झाले. राज्यकारभार पाहण्यासाठी कोणी पुरुषच उरला नाही. अशावेळी एकट्या अहिल्या देवींनी राज्य कारभार करण्याचा निर्णय घेतला. याच संधीचा फायदा घेत ५०,००० फौज घेऊन अहिल्यादेवींच्या राज्यावर चालून आला; परंतु अहिल्याबाई न डगमगता त्यांनी स्त्रीयांची फौज निर्माण केली होती. राज्यातील स्त्रीयांना त्यांनी युद्धकलेचे प्रशिश्रण दिले होते; परंतु फक्त तलवार हातात घेऊन चालत नाही तर सोबत बुद्धिकौशल्यही लागते. म्हणूनच त्यांनी राघोबा पेशव्यांना पत्र लिहिले, ‘मी एकटी आहे, अबला आहे असे समजू नका. जेव्हा मी हातात तलवार आणि खांद्यावर भाला घेऊन मैदानात उतरेन तेव्हा तुम्हाला ते खूप जड जाईल.
आपली भेट लवकरच रणांगणात होईल; परंतु मी हरले तर मला कुणी नाव ठेवणार नाही; परंतु तुम्ही जर हरलात तर सारे जग तुम्हाला नाव ठेवेल की, तुम्ही एका महिलेकडून हरलात. त्यावेळी राघोबा पेशव्यांनी माघार पत्करली. शत्रूला रणात पराभूत करण्याआधी मनात पराभूत करायचे असते. कारण मनात पराभूत झालेला शत्रू रणात उभाच राहू शकत नाही. हे मानसशास्त्र त्यांना अवगत होते.
हा इतिहास होता अहिल्याबाईंच्या पराक्रमाचा, हा इतिहास होता अहिल्यादेवींच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा आणि हेच तेजस्वी रत्न इ.स. १९३५ साली अनंतात विलीन झाले.
पुरुष जातीचा बडगा छेदून केलीत तुम्ही समाजसेवा
भुकेल्या पोटी घास देऊनी, तृप्त केले तहानल्या जीवा
जात-धर्म विसरूनी दाखवला, मानव सेवेचा मार्ग नवा
‘अहिल्यादेवी आपल्या कार्याचा
निरंतर तेवत राहील दिवा’