ताई आमची भारी - कविता आणि काव्यकोडी

  95

मला आई देते
रोज एकच लाडू
ताईला लाडू दोन
वर दुधाचा गडू


आईने आणली मला
वही फक्त एक
ताईला मात्र आणल्या
वह्या सुंदर अनेक


आई म्हणते पुरे
एकच पेरू तुला
चार पेरू मोठे मात्र
देते ती ताईला


आईने खेळायला मला
आणली मोटार भारी
ताईला आणल्या चक्क
पाच नव्या मोटारी


आई म्हणते गळ्यात
माझ्या एकही नको माळ
ताईला मात्र म्हणते
तू चार माळा घाल


आई म्हणते मला
ताई तुझ्यापेक्षा मोठी
जास्त तिला देण्यात
कसली आलीय खोटी


एक अनेक यावरून
वाद नसतोच घरी
खरं सांगू का तुम्हाला
ताई जगात भारी !



काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) कंदांची, पानांची,
देठांचीसुद्धा भाजी
पानांच्या वड्या खाण्यात
सारेच आहेत राजी


पानांवर पाणी याच्या
थांबत नाही बरं
सांगा या पानांचं
नाव काय खरं?


२) पीठ, मैदा, रवा,
याचा करतात तयार
याच्यापासून पक्वान्नही
बनवतात फार


हिरव्या लोंब्या शेकून
हुरडा याचा खातात
चपातीच्या पिठासाठी
गिरणीत काय नेतात?


३) कांद्याच्या सोबतीला
नेहमीच असतो
फराळाच्या पदार्थांत
मिरवताना दिसतो


याला खाऊन माणसं
होई गोलमगोल
डोक्यात कोण भरलं की
चिडून जातो तोल?



उत्तर -


१) अळू
२) गहू
३) बटाटा

Comments
Add Comment

पाऊस

कथा : रमेश तांबे एकदा काय झाले काळ्याकुट्ट ढगांनी आकाश भरून आले वारा सुटला सोसाट्याचा उडवत पाचोळा

झोप

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ शरीर तसेच मनाच्या विश्रांतीची ‘झोप’ ही नैसर्गिक अवस्था असते. झोप आपल्या शरीराला

उपयुक्तता व सौंदर्य एकाच नाण्याच्या दोन बाजू

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर आजच्या जगात आपल्याला काय आढळते. माणसे ही सौंदर्याच्या मागे लागलेली

स्व-जाणीव

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर जोमनुष्य स्वतःला व स्वतःच्या शक्तीला ओळखतो त्याला जीवनात सर्व काही

तुझ्या हाताच्या चवीचं...

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ बाबा सरकारी नोकरीत सुपरिटेंडंट होते. त्यामुळे त्यांची नियुक्ती महाराष्ट्रात

हत्ती

कथा : रमेश तांबे एक होता हत्ती त्याच्या अंगात फार मस्ती इकडे तिकडे धावायचा पायाखाली येईल त्याला चिरडायचा. हत्ती