
मला आई देते रोज एकच लाडू ताईला लाडू दोन वर दुधाचा गडू
आईने आणली मला वही फक्त एक ताईला मात्र आणल्या वह्या सुंदर अनेक
आई म्हणते पुरे एकच पेरू तुला चार पेरू मोठे मात्र देते ती ताईला
आईने खेळायला मला आणली मोटार भारी ताईला आणल्या चक्क पाच नव्या मोटारी
आई म्हणते गळ्यात माझ्या एकही नको माळ ताईला मात्र म्हणते तू चार माळा घाल
आई म्हणते मला ताई तुझ्यापेक्षा मोठी जास्त तिला देण्यात कसली आलीय खोटी
एक अनेक यावरून वाद नसतोच घरी खरं सांगू का तुम्हाला ताई जगात भारी !
काव्यकोडी - एकनाथ आव्हाड
१) कंदांची, पानांची, देठांचीसुद्धा भाजी पानांच्या वड्या खाण्यात सारेच आहेत राजी
पानांवर पाणी याच्या थांबत नाही बरं सांगा या पानांचं नाव काय खरं?
२) पीठ, मैदा, रवा, याचा करतात तयार याच्यापासून पक्वान्नही बनवतात फार
हिरव्या लोंब्या शेकून हुरडा याचा खातात चपातीच्या पिठासाठी गिरणीत काय नेतात?
३) कांद्याच्या सोबतीला नेहमीच असतो फराळाच्या पदार्थांत मिरवताना दिसतो
याला खाऊन माणसं होई गोलमगोल डोक्यात कोण भरलं की चिडून जातो तोल?
उत्तर -
१) अळू २) गहू ३) बटाटा