Friday, March 21, 2025
Homeसाप्ताहिककोलाजकर्ता सवरता...

कर्ता सवरता…

हलकं फुलकं – राजश्री वटे

कर्ता… करविता… तो असतो… वरचा… जगाचा स्वामी!
पण कर्ता सवरता तो असतो… जो जबाबदारीने सर्व पेलून नेत असतो… आपल्या कुटुंबात, शेजारीपाजारी, आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती असतात ज्यांच्या खांद्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात… तशा जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्या असतात… पण काहीना जरा जास्तच असतात… लहानपणापासून… जसे शाळेत जायला लागतात मुलं… दफ्तराचं ओझं, अभ्यासाचा भार… सगळं संभाळत मोठे होतात… जबाबदारीचे स्वरूप बदलत जातं!!

आयुष्यातले चढ-उतार पेलायला खांदे भक्कम असायला पाहिजेत, दृश्य आणि अदृश्य अशा कर्तव्याची जबाबदारी त्यावर असते! सामाजिक, आर्थिक, प्रापंचिक अशा अनेक जबाबदाऱ्यांचे ओझे एखादी व्यक्ती आयुष्यभर वाहत असते… कधी तर ओझ्याने झुकून जातात हे खांदे… ज्यादिवशी जबाबदारीचे ओझे खांद्यावर येते ना, त्या दिवसापासून थकायचा अधिकार संपतो!!

खांदा मजबूत तर… बंदा मजबूत! हातावर पोट असणारे रोजचा प्रश्न सोडविण्यासाठी दुसऱ्याचे ओझे वाहत असतात… तेव्हा कुठे चार घास त्याच्या नशिबी येतात, संकटकाळी मदतीला, सांत्वनासाठी विश्वासाने कोणी जर खांद्यावर हात ठेवला तर फार आधार वाटतो खचलेल्या जीवाला… मग ते प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष! कुठल्याही कार्यात एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम केले तर कार्य पूर्णत्वास नेण्यास मदत होते, जबाबदारी वाटल्या जातात, त्याचे ओझे
वाटत नाही.

कधीतरी, कोणाच्या तरी खांद्यावर डोके ठेवून मोकळे व्हावे… मन हलके होते… तसेच… दुसऱ्याचे दुःख हलके करायला आपलाही खांदा पुढे करावा… विश्वासाने!!

मैत्रीमध्ये हात कायम एकमेकांच्या खांद्यावर विसावला असतो… खात्रीने! ज्याने खांद्यावर हात ठेवला अडचणीत, त्याचा नेहमी आदर करावा… पण… जरा जपून असावं लागतं कधी कधी… कारण दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवणारे महाभाग ही कमी नाहीत जगामध्ये!!

दृश्य जबाबदारी पेलणारा खांदा… बघू तर काय काय पेलू शकतो जबाबदारी व्यतिरिक्त…
स्त्रीच्या खांद्यावर पदर व पुरुषांच्या खांद्यावरचे उपरणे… त्या खांद्याची शान वाढवते… अर्थात जमाना बदल गया है… तरी खरं ते खरंच… स्त्रीच्या खांद्याची आणखी मोठी जबाबदारी… ती म्हणजे तिची पर्स! कायम खांद्यावर मिरवते तिच्या… स्त्रीचे सगळे विश्व त्यात सामावलेले असते… हा भार ती आवडीने संभाळते… हा झाला गमतीचा भाग!
व्यक्ती नेहमी हा विचार करते की, आपल्या जगण्याचा भार कोणाच्या खांद्यावर पडू नये… पण कधी असेही घडते… कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे… कटू आहे पण सत्य आहे.

शेवटचा प्रवास मात्र दुसऱ्याच्याच खांद्यावरून…
जबाबदारीतून मुक्त होण्याचा… “ पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा… दोष ना कुणाचा “…एकदा खांद्यांना आव्हान पेलण्याची सवय झाली की, पावले आपोआप संघर्ष करू लागतात!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -