Thursday, March 27, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनमी तुळस तुझ्या अंगणाची...!

मी तुळस तुझ्या अंगणाची…!

माेरपीस – पूजा काळे

बऱ्याचं दिवसांपासूनची मनाची रूखरूख संपता संपत नव्हती. काय लागून राहिलयं…? काय होतयं…? का होतयं…? या मनाचे त्या मनाला कळेनासे झालेले. कशातचं सूर लागत नव्हता. साचलयं तरी काय या खेपेस. का एवढे नैराश्याचे ढग जमा झालेत. यावर उतारा म्हणून, शमन होणं गरजेचं वाटत होतं. स्वत:ला दटावत हातात पेन घेतलं. काहीतरी लिहायला हवं, ज्याने बरं वाटेलं. बस्स् ठरलं…!! घेतलं लिहायला आणि अल्पावधीत शोध संपला. अरे ह्या, तर आठवणी ज्यांनी ऊत माजवलाय आत आत. माहेरच्या रम्य आठवणी अलवार वर आल्या होत्या.

बघूनिया संसार, सुखावले माता-पिता अनंताघरी.
लेक म्हणती तुळशीसं
दरवळ माहेर सासरदारी.

या ओळीपाशी येऊन थांबले होते मी. शोधता शोधता गवसली होती एक कुलूपकिल्ली. शिवाय लागून आलेल्या जन्माष्ठमी, दहिकाला उत्सवाची नांदी मनात घर करून होतीच. पाना-फुलांच्या सहवासात जगायला लावणारा किमयागार श्रावण. बेलपत्र, तुळशीपत्ररूपी सोहळा लवकरच येऊ घातला होता..

तळकोकणातील राजापूरसारख्या निसर्गरम्य गावात माझं बालपण गेलं. कोकणच्या वाटेवर निघताना जुनं ते सोनं सापडण्याची किमया, लालमातीचा नयनरम्य मुखडा आपल्या गतस्मृती चेतवतो. येताना वाटेत शाळा दिसली होती. सकाळी लवकर उठून, पाठीवर दप्तर घेऊन वाटा तुडवत शाळा गाठणं म्हणजे नुसती धमाल असायची. पहिली घंटा होण्याच्या आधी वर्गात शिरायचं हा नेहमीचाचं शिरस्ता. आता मागे वळून पाहताना लांब वाटेवरच्या जागेशी मी थबकते, जराशी विसावते त्या वळणावर.

आज मुंबईहून थांबत थांबत केलेला प्रवास बरंच काही देऊन गेला होता. गाडीवर चढलेला लालरंग मनाची भावूक-आतूर अवस्था दर्शवत होता. हाॅर्न ऐकून वसंतराव म्हणजे माझा भाऊ वसंता, धावत आला. अंगणात पाऊल ठेवताच, प्रवासाचा क्षीण कुठच्या कुठं मावळला. गाडीतून अनवाणीच उतरत येणाऱ्या आम्हा अस्मादिकांना मातीचा गंध, माहेरचा मखमली आरस्पानी स्पर्श, वाऱ्याची लय, पानांची सळसळ, तेजोमय सोनेरी तिरीप चैतन्याचा सांगावा देऊन गेला. विहिरीतल्या थंडगार पाण्याच्या अमृत घोटाचे एक-दोन ग्लास रिचवत, आम्ही आसनस्थ झालो. अहो स्थिरावले. मी सुखावले.

स्वयंपाकघरातून येणाऱ्या पुऱ्यांच्या घमघमाटाने मुलांच्या पोटातील अग्नी भडकला. क्षणाचीही उसंत नव्हती मुलांना. दंगा-मस्ती, आरडाओरड करत सुसाट होती. मला मात्र चौसोपी वाड्याच्या सगळ्या खोल्या खुणावत होत्या. अजूनही तू आमची आहेस आणि आम्हीही तुझेचं आहोत याची ओळख दावत चिरे हासत होते मला पाहून. काय गंमत आहे ना…!! आपल्याचं घरात नव्याने टाकलेल्या पावलांचे संदर्भ मात्र जुनेच असतात. कौलारू घरातल्या चिरेबंदी आठवणी घरभर वावरत होत्या. आज सासर-माहेरचा खेळ दंगणार होता. हे घर, हे आवार, ही झाडं, वेली, फुले, परसबाग, तुळस, घरातील प्रत्येक वस्तू आणि आपली वास्तू बोलत होती. या साऱ्यांची मी असिम लाडकी. साऱ्यांना मी वेळीच भेटले नाही, तर रुसतील बरं…! झाडं मान टाकतील, वेली हिरमुसतील. हाताने, मायेने गोंजारणं हवं असतं त्यांना. मी अशी वर्षभराने येणारी. कोणीतरी हक्काचं लागतं त्यांनाही. माझ्या येण्याने पाहा जलतुषारांनी सचैल झालेला प्राजक्ता टपटप ओसंडेल. गुलाबाला लाली चढेल, मधुमालती गोंड्यापरी झुलेल. चाफा डोळे मिचकावेल. मकरंद प्राशन केलेला भ्रमर सुखावेल. पाखरं किलबिलतीलं, फुलपाखरं भिरभिरतीलं. रंग उधळण्यास आसुसलेली असेल दारातली रांगोळी. मी या सगळ्यांना दुरूनच न्याहाळते. पायावर पाणी घेऊन वसंत वहिनीला गळाभेट देऊन मी अंगण गाठते आईच्या आठवणरूपी कुशीसाठी.

समोरच्या तुळशी वृंदावनातली तुळस आजही नेहमी सारखीचं बहरलीयं. बाबांनी मंगलोरहून मागवून आणलेल्या रंगीत वृंदावनात अशी काही सजली आहे की, अंगणाची शोभा जास्त खुललीय. मला पाहताच कृष्णवर्णीय मंजिऱ्या अधिक गडद भासत आहेत. आमच्या घरच्या तुळशीचं आगमन घराला घरपण बहाल करणारं ठरलं होतं. तिच्याभोवती फिरताना, पिंगा घालताना, लपाछपीचा खेळ खेळताना आईने घातलेले धपाटे आठवले. सकाळच्या पारी तुळशीभोवती पाणी घालत, फेऱ्या मारणारी आई म्हणजे घरची वैभवलक्ष्मी, जिच्यावर या घराचे वासे उभे होते. कर्त्या पुरुषामागची गंधाळलेली सशक्त ऊर्जा जी सजलेली, रुजलेली पाहिली होती आम्ही त्या काळी. केवळ आईच्या आग्रहाखातर औषधी आणि देवाला प्रिय असलेल्या मूठभर मंजिऱ्या बाबा घेऊन आले होते गोव्याहून. आई छानशी हसली होती त्यावर. हा एकच हट्ट असावा आईचा जो बाबांनी बरोबर जाणला होता. पुरवला होता. तुळस जोम धरू लागली. रूजता रूजता आईच्या मायेने सजली.

पापड, लोणची, मसाले, आंबापोळी, फणसपोळी, कुरडया, हिच्या शेजारी विसावायच्या. माय माऊली अन् तुळस भावली म्हणावं इतकं, हे नातं रूजलं होतं. लग्नसमारंभ, सोहळे, सणवार, मंगलकार्य काही म्हणू नका…! पोट धरून हसावं, मुळुमुळू रडावं, तिच्याशी बोलून घ्यावं. तिनं ऐकावं मनीचं हितगुज आणि ज्येष्ठांसारखा मौलिक बाळकडूचा सल्ला द्यावा आईला. सुखदुःख दोघीही सहत होत्या. एक भर उन्हात, तुफानी पावसात. तर दुसरी नात्यात, कुटुंबाच्या मांगल्यांत ते ही अफाट सहनशक्तीच्या चौकटीत राहून.

तुळस वृंदावनी डोलणारी, देव्हाऱ्यातल्या ज्योतीसम मंद मंद तेवणारी. आई कधी दमली नाही, तुळस पण कधी शमली नाही.

आई लवकर सोडून गेली, पण बाईपण तुळशीपाशी सांडून गेली. स्मरणाची वात पेटता पेटवताना तुळस फुलत राहिली मंजिऱ्यात नव्या जाणिवेसह. हिरवळीत वाढायचं, बहरायचं कुंकवाचं उसनं वाणं तुळसाबाईला देऊन गेली आई. आईची प्रकर्षाने आठवण येताना तुळसाबायवर हात फिरवत होते मी. आईच्या सुखद भासाचा सहवास गाठीशी बांधत होते. यावेळी मनाशी पक्कं होतं की, यातल्या काही मोजक्या मंजिऱ्या सोबत न्यायच्या शहराकडे. संस्काराची, त्यागाची, चैतन्याची, परिश्रमाची, पाठराखण करण्याकरिता. कारण आता मलाही लावायचा होता एक दीप कुटुंबाला पुढे नेण्याचा. सहचारिणी बनून सहकार्याचा. मी बसून टपोऱ्या मंजिऱ्या खुडत होते तुळशीच्या. आई चराचरातून पाहत होती मला. कंकणाने बांधले सासर माहेराचे धागे, सासर सुखावताना माहेरामागे मन लागे. माझ्या माहेरी अंगणा वृंदावन शोभतसे, कृष्णा वाहून घ्यावया तुळसाबाई सजतसे. आता तुळसाबाय ही तयार होती मुंबई व्हाया राजापूर मार्ग गाठायला. वहिनी दुरूनचं माझ्याकडे पाहत होती. जणू काय माझी मायचं मला आशीर्वाद देण्यास उभी असावी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -