कथा – प्रा. देवबा पाटील
एके दिवशी घरात चालता-फिरता तिच्या उजव्या हाताचा कोपरा दरवाजाच्या मुठीला लागला व तिला किंचितसा विद्युत धक्का लागल्यासारखे जाणवले.
‘‘हिवाळ्याच्या दिवसांत आपणास कधी-कधी दरवाजाच्या मुठीचाही अचानक धक्का (शॉक) कसा काय बसतो गं आई?’’ जयश्रीने विचारले.
‘‘हे सर्व स्थितीज विद्युतमुळे होत असते. प्रत्येक वस्तूंमध्ये अगदी अत्यल्प प्रमाणात तरी स्थितीज विद्युत असतेच की, जिच्यामुळे त्या वस्तूवर अत्यल्पशा: विद्युतभार असतो. आपल्या शरीरातही स्थितीज विद्युत असते. आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीत जवळपास ९० मिलीव्होल्ट एवढा अल्प विद्युतदाब असतो. जेव्हा आपल्या शरीराच्या अति संवेदनशील मज्जातंतू असलेल्या पेशींच्या भागाचा कोणत्याही वस्तूला किंवा दरवाजाच्या मुठीला अथवा एखादेवेळी भिंतीच्या कोपऱ्याला अचानक झटक्यात स्पर्श होतो,
तेव्हा त्या अनपेक्षित झटक्याच्या स्पर्शामुळे आणि त्या वस्तूवरील विद्युतप्रभारामुळे शरीराच्या तेथील पेशींतील विद्युतभार बदलतो. त्यामुळे आपणास तेथे सौम्य विद्युतधक्का बसतो नि तो झटका तेथील संवेदनशील मज्जातंतूंमार्फत त्या ठिकाणच्या मज्जाकेंद्राद्वारे आपणास त्वरित जाणवतो. ही क्रिया आपणास विशेषत: हिवाळ्याच्या दिवसात व त्यातही हाताच्या कोपऱ्यांच्या बाबतीत जास्त अनुभवास येते.’’ आईने सांगितले.
‘‘आई, आपण चालतांना आपले हात आपोआप कसे काय हलतात गं?’’ जयश्रीने विचारले.
‘‘हो सांगते,’’ ‘‘म्हणत आईने पोळ्या करण्यासाठी रांधण्याच्या परातीत कणीक मळण्यास घेतली आणि सांगण्यास सुरुवात केली, हात हलणे ही एक आपोआप होणारी अनैच्छिक क्रिया आहे. आपण चालत असताना आपला तोल सांभाळतो तो या एकप्रकारच्या अनैच्छिक क्रियेच्या मदतीनेच. आपला तोल सांभाळला जातो तो स्वयंचलित स्वरुपाचा असतो. त्यामुळे आपण त्याचा विचार करत नसतानासुद्धा अजाणतेपणी आपला तोल आपोआप सांभाळला जातो. आपणास सर्व हालचाली व्यवस्थित करता याव्यात यासाठी निसर्गाने आपले हात व पाय आपल्या शरीराच्या धडाला विशिष्ट पद्धतीने, योग्य रीतीने जोडलेले असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण जेव्हा उभे राहतो, चालतो तेव्हा प्रत्येकवेळी आपला तोल नीट सांभाळला गेला पाहिजे. अन्यथा लहान बालकांसारखे आपण वारंवार धपकन खाली पडत जाऊ. म्हणून चालताना, धावताना प्रत्येकवेळी आपला तोल नीट सावरण्यासाठी आपल्या पायांची दिशा, पायांमधील अंतर, पायांची गती व धडाची स्थिती यांना अनुरूप आपल्या हातांच्या हालचाली आपोआप होत असतात. म्हणून आपण चालतांना मागेपुढे असे आपले हात आपोआप हलतात व धावताना कोपरात वाकून थोडे वेगाने हालतात.’’
‘‘आई, हात हलण्याच्या क्रियेवरून माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे ती म्हणजे आपण सहसा केव्हाही उजव्या हातानेच कोणतेही काम करतो; परंतु काहीजण डावखोरी कशी काय असतात?’’
आई म्हणाली, ‘‘कुणीही हातांनी कोणतेही काम करताना कुणाचाही सामान्यत: उजवा हातच आपोआप पुढे येतो. त्याचे कारण असे की, आपल्या मेंदूचेही उजवा आणि डावा असे दोन भाग असतात. शरीर विज्ञानाच्या दृष्टीने शरीराच्या उजव्या भागावर मेंदूच्या डाव्या भागाचे नियंत्रण असते व शरीराच्या डाव्या भागावर मेंदूच्या उजव्या भागाचे नियंत्रण असते. सहसा मेंदूचा डावा भाग हा जास्त प्रमाणात कार्यक्षम असतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचा उजवा हात हा जास्त कार्यकुशल असतो; परंतु ज्या व्यक्तींच्या मेंदूचा उजवा भाग हा जास्त कार्यक्षम असतो. त्यांचा डावा हात हा अधिक कृतिशील असतो. त्यामुळे कोणतेही काम करताना त्यांचा डावा हात आपोआप पुढे येतो म्हणून त्यांना डावखोरे किंवा डाखोरे म्हणतात.’’
‘‘आई मी आता माझा अभ्यास करते. आपण आता उद्या बोलू.’’ असे म्हणत जयश्री आपल्या अभ्यासाला आपल्या
खोलीत निघून गेली.