क्राइम – अॅड. रिया करंजकर
भारताची परंपरा आणि संस्कृती ही पूर्ण जगाला माहीत आहे की, भारतामध्ये संयुक्त कुटुंब व्यवस्था आहे. या कुटुंबामध्ये आई-वडील, सासू-सासरे, दीर-नंदा-जावा अशी एकत्र कुटुंबपद्धती अजूनही भारतातल्या काही भागांमध्ये चालू आहे. पण जसजसे भारतामध्ये आधुनिकीकरण आले तसेच हे संयुक्त कुटुंब विभक्त होऊ लागले. शहराकडे विभक्त कुटुंबपद्धती पाहायला मिळते. या विभक्त कुटुंबामध्ये वयोवृद्ध आई-वडील एकटेच राहताना दिसतात आणि त्यांची मुले वेगळी राहताना पाहायला मिळतात, तर काही ठिकाणी त्यांची मुले आई-वडिलांना वृद्धाश्रमामध्ये रवानगी करतात.
राधाबाई या आता ६५ वर्षांच्या महिला आहेत. काहीच वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा श्रीकांतचे लग्न करून दिले. श्रीकांतला एक मुलगा झाल्यानंतर त्याची पत्नी आजारामध्ये गेली. म्हणून राधाबाईंनी काही वर्षे गेल्यानंतर श्रीकांत आणि त्याच्या मुलाचे कसे होईल या विचाराने त्याचा दुसरा विवाह करून दिला. दुसरा विवाह झाल्यानंतर काही दिवसांत श्रीकांतने पत्नीच्या सांगण्यावरून आपल्या आईला आणि पहिल्या पत्नीचा मुलगा राजला घराबाहेर काढले. राधाबाई राजला घेऊन आपल्या दुसऱ्या मुलाकडे राहायला गेल्या. श्रीकांतने ज्या घरातून आपल्या आईला बाहेर काढले ते घर राधाबाई यांच्या नावावर होते. राधाबाईंना वाटले की, आपल्या मुलाचे आणि सुनेचे भांडण मिटले की, श्रीकांत आपल्या पहिल्या मुलाला परत यायला सांगेल या आशेवर राधाबाई होत्या. राजला ते घर देण्याची राधाबाईंची इच्छा होती. पण श्रीकांत त्या मुलाला आणि आईला घरात काही येऊ देत नव्हता. म्हणून राधाबाईंनी आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिकांच्या निर्वाह आणि कल्याणकारी अधिनियम २००७ च्या आधारे तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली. याच्यामध्ये त्यांचे कागदपत्र बघून आणि त्यांच्यावर खरोखरच अन्याय झालेल्या आहे यावर निर्णय घेऊन राधाबाईंच्या बाजूने निर्णय लागला. कारण ते खरोखरच राधाबाई यांचे घर होते आणि राधाबाईंना वृद्धापकाळात घराचा आधार हवा होता. त्यांच्या मुलाने त्यांना घरातून बाहेर काढले होते. श्रीकांत अनेक प्रकारे ते घर आपले आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आणि पुरावे सादर करत होता. पण राधाबाईंकडे जुने पुरावे असल्यामुळे राधाबाईंच्या बाजूने निर्णय लागला. म्हणून श्री कल्याणी कलेक्टर ऑफिसला अपील केले. याही ठिकाणी राधाबाईंच्या बाजूनेच निर्णय लागला. ती ऑर्डर घेऊन राधाबाई आणि त्यांचा नातू राज पोलीस स्टेशनमध्ये गेले. पोलिसांकडे तक्रार दाखल करतातच आम्हाला अजून यावर कोणता आदेश देण्यात आलेला नसल्यामुळे त्यांना घर खाली करा असे सांगू शकत नाही. काही दिवसांतच राधाबाईंना हायकोर्टात अपील केल्याची नोटीस मिळाली. श्रीकांत तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या ठिकाणी केस हरला होता तरी तो अपीलसाठी हायकोर्टमध्ये गेला. एका वयोवृद्ध आईला घरातून बाहेर काढून तिच्या मेहनतीचे घर तिच्या मुलाने हिसकावले होते. एवढेच नाही तर दुसऱ्या पत्नीच्या नादाला लागून आपल्या पहिल्या पत्नीच्या मुलालाही घरातून बाहेर काढले होते. एक वयोवृद्ध महिला आपल्या हक्कासाठी लढा देत होती. त्याचबरोबर आपल्या नातवाला ही न्याय द्यायचा तंतोतंत प्रयत्न करत होती. श्रीकांतने आपल्या जन्मदात्या आईचा तर विचार केला नाही पण जन्म दिलेल्या मुलाचाही त्यांनी विचार केला नाही.
एक एक पैसा जमवून राधाबाईंनी हे घर विकत घेतले होते. तिच्या कष्टाचे हे घर होते आणि तिच्याच मुलाने त्या घरातून तिला बाहेर काढले होते. ही गोष्ट कष्टापेक्षा वेदनादायी होती. राधाबाई आपल्या मुलाला कायदेशीर लढा देऊन अद्दल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
वयोवृद्ध आई-वडील तरुण असताना कष्ट करून एक एक पैसा जमवून घर घेतात आणि मुले मोठी झाल्यावर याच आई-वडिलांना अडगळीच्या ठिकाणी ठेऊन देतात. आज आपल्या येथील वयोवृद्धांची अवस्था फार बिकट झालेली आहे. राधाबाईंचा आपल्या मुलाविरुद्ध असलेला लढा खरंच इतर वयोवृद्धांना प्रेरणादायी आहे.
(सत्यघटनेवर आधारित)