जबलपूर-हैदराबाद फ्लाईटला मिळाली होती बॉम्बची धमकी
नागपूर : मध्य प्रदेशातील जबलपूरहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. यानंतर या विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
या संदर्भात इंडिगो एअरलाइन्सने जारी केलेल्या निवेदनानुसार, हैदराबाद-जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटने (6E 7308) रविवारी सकाळी 8 वाजता जबलपूरच्या डुमना विमानतळावरून हैदराबादसाठी उड्डाण केले. दरम्यान, विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे विमान वळवून सकाळी ९.२५ वाजता नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले.
लँडिंगच्या वेळी विमानात ६२ प्रवासी होते. विमान नागपुरात उतरल्यावर सर्व प्रवाशांना खाली उतरवून विमानाची सुरक्षा तपासणी करण्यात आली. यावेळी तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. परिणामी हे विमान पुन्हा हैदराबादला रवाना झाले. दरम्यान या विमानातील प्रवाशांना नागपूर विमानतळावर चहा-नाश्ता देण्यात आल्याचे इंडिगोतर्फे सांगण्यात आले.