रायगड पोलिसांचा दावा
रायगड : गणेशोत्सवाला अवघे काहीच दिवस शिल्लक उरले असताना अनेक चाकरमानी बाप्पाच्या आगमनासाठी गावी जातात. त्यातच यावेळी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी गणेशभक्तांचा ‘वाहतूककोंडी व खड्डे मुक्त’ प्रवास होईल, असा दावा रायगड पोलिसांनी केला आहे. त्यासोबत वाहतूककोंडी टाळण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार असून गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी विविध सोयी देखील उपलब्ध केल्या जाणार असल्याची माहिती, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. तसेच गतवर्षी वाहतूककोंडीवर नजर ठेवण्नण्यासाठी दोन ड्रोन कॅमेरे होते. यंदा त्यांची संख्या वाढविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
अवजड वाहनांना बंदी
गणेशोत्सव काळात ५ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते ८ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत आणि ११ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते १३ सप्टेंबर ११ वाजेपर्यंत, तसेच १७ सप्टेंबरला रात्री ८ वाजल्यापसून ते १८ सप्टेंबर रोजी रात्री ४ वाजेपर्यंत १६ टन व त्यापेक्षा अधिक अवजड वाहनांना बंदी राहील.
गणेश भक्तांसाठी सुविधा
केंद्रे खारपाडा, खारपाले, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, महाड, महाड एमआयडीसी, पोलादपूर येथे सुविधा केंद्रे तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये चहापान कक्ष, वैद्यकीय कक्ष, फोटो गॅलरी, पोलिस मदत केंद्र, बालक आहार कक्ष, वाहनतळ, वाहन दुरुस्ती कक्ष तयार केले जाणार आहेत.
फलक नसल्यास कारवाई
रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्ग हद्दीतील अनेक ठिकाणी दुभाजक आहेत. मात्र, या ठिकाणी सूचना फलक लावले नसल्याने वाहनचालक यांना अडथळा निर्माण होतो. अनेकदा अपघातही होत आहेत. गणपतीपूर्वी दुभाजक ठिकाणी सूचना फलक लावलेत का? याची प्रांताधिकाऱ्यांनी पाहणी करावी. यामध्ये कुचराई झाली आणि अपघात झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी स्पष्ट केले.