संवाद – गुरुनाथ तेंडुलकर
काळ रात्रीची आणि समुद्र खवळलेला. त्यात आणखी भरीला भर म्हणून तुफानी पाऊस. अशा प्रतिकूल परिस्थितीतही एक भलीमोठी बोट पाणी कापत पुढे चालली होती. वरून कोसळणाऱ्या पावसाचा मारा आणि खवळलेल्या सागरातून उसळणाऱ्या अक्राळ-विक्राळ राक्षसी लाटांमुळे बोटीला तडाखे बसत होते. प्रत्येक हेलकाव्याबरोबर बोटीवरच्या माणसांची मनेदेखील देलायमान होत होती. अशाही परिस्थितीत एक माणूस मात्र अगदी शांत होता. बोटीला तडाखे बसूनही त्याचे चित्त विचलित झाले नव्हते.
तो होता त्या बोटीचा अनुभवी कप्तान. त्याचे हात सुकाणुवर स्थिर होते. अशा अनेक वादळ वाऱ्यातील बोट सुखरुप किनाऱ्याला लावण्याचा आजवरचा अनुभव त्याच्या गाठीशी होता. एक हात सुकाणुवर आणि दुसऱ्या हाताने डोळ्यांना लावलेल्या दुर्बिणीतून पाहत तो बोट हाकीत होता. मिट्ट काळोखात काहीही दिसत नव्हते. पण तेवढ्यातच त्याला दुर्बिणीतून प्रकाशाचा एक लहानसा ठिपका दिसला. अंधुकसा, मिणमिणता…
एखादे छोटसे जहाज असावे बहुधा. याच बोटीच्या दिशेने येत होते. त्या छोट्या जहाजाला इशारा देण्यासाठी कप्तानाने लागलीच आपल्या बोटीवरचे सर्व दिवे लावले. रेडिओवरून संदेश देणार इतक्यात समोरूनच संदेश आला, ‘सर आपली बोट वीस अंशाने उजवीकडे वळवा’.
आता मात्र कप्तानाच्या चेहऱ्यावर नाराजीची एक सूक्ष्मशी आठी उमटली. त्याने उलट निरोप धाडला, ‘मी माझे जहाज वळवणार नाही. तूच वीस अंशाने डावीकडे वळ हवं तर’.
मिनिटभरात पुन्हा रेडिओ संदेश आला . ‘सर, प्लीज, जहाज वीस अंशाने उजवीकडे वळवा’.
आता मात्र कॅप्टन चिडला. इवलासा मिणमिणता दिवा घेऊन फिरणारी ही होडी मला अक्कल शिकवते. मी नाही वळणार. कॅप्टनने मग्रूरीने रेडिओ संदेश धाडला, ‘मी सेकंड ऍडमिरल आहे. तू कोण?’
‘सर, मी साधा खलाशी आहे. पण तरीही तुम्हीच बोट वळवा’.
कॅप्टनचा पारा आता उकळू लागला होता. ‘मी सेकंड ऍडमिरल जॉर्ज डिक्सन, ही युद्धनौका आहे. बाजूला हो नाहीतर उडवून लावीन’.
पलीकडून पुन्हा संदेश आला. ‘सर, मान्य… आपण युद्धनौकेवरचे कप्तान आणि मी साधा खलाशी. पण तरीही जहाज तुम्हालाच वळवावी लागेल, कारण मी वळू शकत नाही… मी… मी दीपस्तंभावरून बोलतोय. सर, जहाज वळवा नाहीतर खडकावर आदळाल…’
नेव्हीतून सेवानिवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याच्या आत्मचरित्रातील ही एक सत्यकथा.
ही कथा जीवनाच्या संदर्भात बरेच काही सांगून जाते. आपण सर्वसामान्य माणसे देखील त्या कप्तानासारखेच असेच अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन इतरांनी दिलेल्या अनेक उपयुक्त सुचनांकडे कानाडोळा करतो. आणि परिणाम…
अगदी अलिकडचीच गोष्ट…
एका नामांकित कंपनीच्या चेअरमनपदी विराजमान असलेला एक संगणक तज्ज्ञ हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रात्री झोपेतच गेला. त्याला त्याच्या फॅमिली डॉक्टरने महिन्याभरापूर्वीच सूचना केली होती. ‘थोडी धावपळ कमी करून जरा विश्रांती घ्या.’
डॉक्टरांनी दिलेला विश्रांतीचा सल्ला डावलून तो उद्योगपती कामे करीतच होता. सभा, संमेलने, मिटिंग, कॉन्फरंन्सेस अन् बिझनेस पार्ट्या. विश्रांती नाहीच. वेळी अवेळी खाणे, अनेकदा नको ते खाणे या सर्वांचा
परिणाम म्हणजे…
स्वतःला अत्यंत बिझी ठेवणाऱ्या त्या बुद्धिमान संगणक तज्ज्ञाचा तरुण वयात झालेला अकाली मृत्यू…
अशा प्रकारची कैक उदाहरणे आपल्याला आपल्या आजूबाजूला पहायला मिळतात.
‘परिक्षा जवळ आलीय. टि.व्ही. बंद करून जरा अभ्यास कर रे.’ हा सल्ला न जुमानल्यामुळे नापास झालेला विद्यार्थी…
शाळेची, महाविद्यालयाची सहल गेली असता रात्रीच्या वेळी उगाचच अनोळखी ठिकाणी फिरू नका. ‘हा सल्ला न मानल्यामुळे विंचूदंशाला किंवा सर्पदंशाला बळी
पडलेला तरुण’…
‘जुगार खेळून कुणी श्रीमंत होत नाही रे.’ हा सल्ला ठोकरल्यामुळे कफल्लक झालेला माणूस…
‘सिगारेट ओढणे आरोग्यास अपायकारक आहे.’ या वैधानिक इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून सिगारेटच्या सेवनामुळे कॅन्सरच्या रोगाने ग्रासलेला रुग्ण…
‘गुंड मवाल्यांशी मैत्री करू नकोस रे’. ‘हा वडीलधाऱ्यांचा सल्ला धुडकावल्यामुळे पुढे गोत्यात येऊन पोलिसांनी पकडलेला चांगल्या घराण्यातील तरुण मुलगा’…
‘पोहण्यास मनाई आहे.’ या पाटीकडे तुच्छतेने पाहून पाण्यात उतरलेली आणि भोवऱ्यात सापडून शेवटी बुडून मृत्यूमुखी पडलेली तरुण माणसे…
‘त्या मुलाबरोबर मैत्री करू नकोस गं तो चांगला नाहीये.‘हा सल्ला धुडकारून तरुण वयात
फसलेली मुलगी’…
अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला आजूबाजूला दिसतात.
ही सर्व मंडळी स्वतःबद्दल अती आत्मविश्वास आणि दुसऱ्याबद्दल तुच्छता या दुहेरी वागणुकीमुळे अडचणीत येतात नी शेवटी त्यांच्यावर पश्चात्तापाची पाळी येते.
सुरुवातीस सांगितलेल्या जहाजाच्या कॅप्टनला सूचना देणारा दीपस्तंभ आपल्यालाही आपल्या आयुष्यात पावलोपावली आढळतो.
कधी हा दीपस्तंभ डॉक्टराच्या रुपाने भेटतो, तर कधी आईवडिलांच्या रुपाने.
कधी हे दीपस्तंभ वडिलधाऱ्या मंडळीचे रुप घेतात, तर कधी जवळच्या मित्राच्या रुपाने समोर येतात.
शालेय जीवनातील शिक्षक आणि महाविद्यालयीन जीवनातील प्राध्यापक हे देखील एक प्रकारचे चालते बोलते दीपस्तंभच.
कधी-कधी एखादा अनोळखी माणूस देखील… ‘त्या रस्त्याने जाऊ नका दादा. या रस्त्याने जा. हा रस्ता जरा लांबचा असला तरी चांगला आहे. त्या रस्त्यावर बरेच खड्डे आहेत.’ अशी विनंती वजा सूचना देतो.
तर कधी ‘पुढे धोकादायक वळण आहे. वाहने सावकाश हाका’. ‘अशी सूचना देणारी निर्जीव पाटी हा देखील एक प्रकारचा दीपस्तंभच’.
असे अनेक दीपस्तंभ आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर असतात. आपण त्यांच्या सूचनांकडे डोळसपणे पहायची सवय लावली पाहिजे.