कथा – रमेश तांबे
नेहमीप्रमाणे मी सायंकाळी शिवाजी पार्कला फेरफटका मारायला गेलो होतो. माझे चालणे पूर्ण करून मी कट्ट्यावर निवांत बसलो. तितक्यात एक सात-आठ वर्षांचा काळा सावळा पोरगा माझ्यासमोर येऊन उभा राहिला. “काका भूक लागलीय. पैसे द्या ना!” असे तोंडाजवळ हात घेत बोलू लागला. त्या पोराची नजर माझ्या हृदयाला भिडली. त्याच्याबद्दल मला दया वाटली. रस्त्याच्या पलीकडेच एक छोटेसे दुकान होते. तिथे मी लगेच गेलो. दोन-चार बिस्किटांचे पुडे घेतले. एक पाण्याची बाटली घेतली आणि परत त्या मुलाजवळ आलो. हातातली पिशवी त्याला देत म्हणालो, ही घे बिस्किटे, इथे बस आणि खा पोटभर!
पण काय आश्चर्य त्या मुलाने ती बिस्किटांची पिशवी घ्यायला नकार दिला. मी त्याला थोड्या चढ्या आवाजातच त्याला म्हणालो, “अरे तुला भूक लागली ना मग का खात नाही बिस्किटे? यात चांगली क्रीमची बिस्किटेसुद्धा आहेत.” पण माझ्या बोलण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. तो तेच म्हणत राहिला. “भूक लागलीय पैसे द्या ना.” मला कळेना या मुलाला भूक लागली आहे मग खाऊ का घेत नाही? त्याला म्हटले तुला बिस्किटे आवडत नाहीत का? मग तुला वडापाव देऊ का? तरी तो “भूक लागली आहे पैसे द्या ना” असाच म्हणत होता. म्हणताना चेहऱ्यावरचे हावभाव इतके की दुसऱ्याच्या डोळ्यांत लगेच पाणी यावे.
मग मीही म्हटले, “खायला हवे तर घे. पण पैसे देणार नाही.” पण तो मुलगाही काही हटायला तयार नव्हता. मी तिथून उठलो आणि चालू लागलो. तो मुलगाही माझ्या मागे निघाला. थोड्या अंतरावर जाताच मुलगा म्हणाला, “काका खूप भूक लागलीय ती पिशवी द्या ना मला!” आता मात्र मला रागच आला. “अरे मघापासून तुला किती वेळा म्हटले बिस्किटे खा, तर तुझे एकच पैसे द्या पैसे द्या आणि मग आता का मागतोय ती खाऊची पिशवी? आता का नको तुला पैसे?” तो मुलगा काकुळतीला येऊन म्हणाला, “काका खरंच मला भूक लागली आहे. पण आम्हाला खाऊ घ्यायचा नाही फक्त पैसेच घ्यायचे अशी धमकी दिलीय आमच्या मावशीने!” त्या मुलाचे बोलणे ऐकून मला कळेना कसली धमकी आणि कोण ही मावशी!
मुलगा पुढे बोलू लागला. “काका आम्ही तिकडे मानखुर्दच्या झोपडपट्टीत राहतो. पंधरा-वीस मुले-मुली आहोत आम्ही. आमची एक मावशी आम्हाला सांभाळते. तीच घेऊन येते आम्हाला येथे. दिवसभर भीक मागायला लावते. तिला फक्त पैसे हवे असतात. भूक लागली तरी आम्हाला खायला मिळत नाही.” असे म्हणून तो मुलगा रडू लागला. माझ्या मनात विचारचक्र सुरू झाले. म्हणजे मुलांना पळवून भीक मागायला लावणारी टोळी आहे ही! लोकांच्या सहृदयतेचा, असहाय्य मुलांच्या परिस्थितीचा फायदा घेणारी! आता या मुलाला घेऊन आपण पोलिसात गेले पाहिजे. मावशीपर्यंत पोहोचायला हवे असा डिटेक्टिव्ह विचार माझ्या मनात आला.
मग एका कोपऱ्यात बसून त्याने सगळी बिस्किटे खाल्ली. पण आश्चर्य असे की, त्याने सगळी बिस्किटे खाऊन संपवली. गटागटा पाणी प्यायला आणि चक्क धूम ठोकली! तिरासारखा पळत सुटला. मी मागून हाका मारतोय. पण तो थांबलाच नाही. गर्दीत कुठे गायब झाला काहीच कळले नाही. मी विचार करू लागलो. त्याला नक्कीच माझ्यापेक्षा मावशी जवळची वाटली असणार. नाही तरी मी काय करणार होतो. पोलिसात जाऊन मावशीला अटक करू शकलो असतो. पण त्या मुलाचे मी काय केले असते? या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते आणि त्या मुलाजवळही ते नव्हते. त्यामुळेच तो भूक भागताच परत मावशीच्या टोळीत सामील झाला. कदाचित तेच आयुष्य त्याला अधिक सुरक्षित वाटत असावे. म्हणूनच त्याने मावशीची निवड केली असावी!