Saturday, March 15, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलकृत्रिम पाऊस

कृत्रिम पाऊस

प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ

युरोपच्या सहलीला जाण्याचा निर्णय घेण्यामध्ये बराच उशीर झाला होता. तोपर्यंत सर्वांची विमानाची तिकिटे आरक्षित झालेली होती. दोन-तीन मार्गाने सर्व युरोपपर्यंत पोहोचणार होते. माझ्यासमोर तिन्ही पर्याय ठेवण्यात आले होते. सवयीप्रमाणे ‘जास्तीची मेजॉरिटी’ या चांगल्या पर्यायाची, माझ्या मानसिकतेनुसार मी निवड केली. इतर दोन पर्यायांनुसार आदल्या दिवशी पोहोचण्याची मुभा होती. त्यामुळे एक अधिकचा दिवस हाती लागत होता. शिवाय विमानाच्या दीर्घ प्रवासानंतर पुढच्या पंधरा दिवसांच्या सहलीसाठी शारीरिक तयारीच्या दृष्टीनेही पूर्ण विश्रांतीही मिळत होती. मी जो पर्याय निवडला त्यानुसार दहा-बारा तासांचा प्रवास करून विमानतळावरूनच सरळ पर्यटनासाठी निघणार होतो. असो.

आम्ही पॅरिसला पोहोचलो. पण आमच्या गटातील काही पर्यटक जे आदल्या दिवशी पोहोचणार होते ते पोहोचलेच नाहीत, हे लक्षात आले. युरोपला पोहोचल्याच्या आनंदात या गोष्टीकडे थोडे दुर्लक्षही झाले. कारण ती माणसे ओळखीचीही नव्हती. दिवसभर जगविख्यात आयफेल टॉवर अनुभवत होतो. दुसऱ्या विश्वात पोहोचलो होतो. दुसरा दिवस उगवला. तरीही ही मंडळी पोहोचली नव्हती. ती कधी पोहोचणार याची दूरदूरपर्यंत कोणीच खात्री देऊ शकत नव्हते. युरोपला फिरताना जाणीवपूर्वक कोणतेही मोबाईल ट्रॅव्हल सीमकार्ड घेतले नव्हते जेणेकरून सहलीसाठी पूर्ण वेळ देता यावा. सर्वजण बोलत होते त्या गोष्टी कानावर पडत होत्या. तो दिवसही तसाच गेला. ही मंडळी पोहोचलीच नाही. तिसऱ्या दिवशी आम्हाला ‘पॅरिस’ सोडून युरोपमधील पुढच्या राष्ट्रात म्हणजे बेल्जियमला जायचे होते. अचानक फोन आला की, मंडळी विमानतळावर उतरली. सर्वांनाच भेटून काय झाले ते जाणून घेण्याची!

ही मंडळी दुबईमार्गे पॅरिसला पोहोचणार होती. यांचे विमान पॅरिसला पोहोचले आणि पॅरिसला फार मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला. अवेळी आणि भयानक असा तो कृत्रिम पाऊस होता. आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. दुबईत जागोजागी पूर आलेला होता. त्यामुळे विमानतळापर्यंतची कोणतीही सेवा बंद ठेवण्यात आली. अशा आणीबाणीच्या प्रसंगी दुबई विमानतळावरील हजारोंच्या संख्येने अडकलेल्या सर्व प्रवाशांना ७५००० हून अधिक खाद्यपदार्थांचे पुडे वितरित करून, खाण्या-पिण्याची मोफत,चांगली व्यवस्था करून देण्यात आली, ही काय ती जमेची बाजू! बाकी तिकडची स्वच्छतागृहे असो किंवा विमानतळाचा परिसर अत्यंत स्वच्छ ठेवण्यात आलेला होता, परंतु प्रवाशांच्या पुढच्या प्रवासाचे काय, हा गहन प्रश्न होता. यानिमित्ताने ‘कृत्रिम पाऊस’ याविषयी गुगलवर एका वृत्तपत्रात डॉ. जीवन प्रकाश कुलकर्णी यांची याविषयीची माहिती वाचायला मिळाली.

कृत्रिम पाऊस पाडण्याची पूर्णपणे वैज्ञानिक पद्धत म्हणजे प्रत्यक्ष विमानातून उष्णढगांच्या पायथ्याशी जाऊन जेथे उर्ध्व स्रोत आहेत. तेथे रासायनिक नरसळ्या फोडून मिठाची फवारणी करणे किंवा शीत मेघात गोठण बिंदूच्यावर जाऊन सिल्वर आयोडाइडच्या रसायनाची नळकांडी फोडणे. यासाठी ढगांची निरीक्षणे रडारने केली जातात. ढगांचे आकारमान, असलेला मेघ बिंदूंचा साठा, ढगांची उंची यावरून कुठल्या प्रकारचे ‘मेघबीजन’ करायचे आहे ते ठरवले जाते. त्याप्रमाणे वैमानिक त्या ढगांत जाऊन नळकांडी फोडून मेघबिजन करतात. त्यायोगे त्या ढगांत थांबलेली नैसर्गिकरीत्या पाऊस पडण्याची प्रक्रिया उत्तेजित करतात. याच प्रकारे दुबईत पाऊस पाडण्याचा प्रयत्न झाला. हे करत असताना साधारण दोन वर्षांत जेवढा पाऊस पडू शकतो तेवढा सहा तासांत पडला म्हणजे १४० मिमी ते १६० मिमी इतका पाऊस पडला, तर जास्त वैज्ञानिक खोलात न जाता मी इतकेच सांगू शकेल की, हजारो पर्यटकांचे प्रचंड प्रमाणात हाल झाले. विमानतळावर झोपण्याची सुविधा काही उपलब्ध होऊ शकली नाही. कधी आपण नियोजित स्थळी पोहोचू, या विचाराने मानसिक तणाव निर्माण झाला तो वेगळाच.

इथे समस्या संपली नाही. ही मंडळी तशीच असंख्य पर्यटक विमानातून उतरले, पण त्यांचे सामान काही नियोजित स्थळी उतरू शकले नाही. त्यामुळे सामानाविनाच परदेशात पाऊल ठेवावे लागले. आल्यादिवशी त्यांना अंतर्वस्त्रांपासून ते गरम कपड्यांपर्यंत सर्व विकत घ्यावे लागले. त्यानंतरची सर्वात मोठी समस्या म्हणजे बीपी, शुगर व तत्सम आजाराच्या गोळ्या, डोळ्यांचे ड्रॉप्स इ. वस्तू, ज्या आपल्या बॅगेत असतात त्या काही मिळू शकल्या नाहीत. पॅरिसमधील मेडिकलवाल्यांनी भारतातल्या डॉक्टरांच्या प्रेस्क्रिप्शनवरून औषध देण्याचे नाकारले. पॅरिसमधल्या डॉक्टरांना भेटणे शक्य नव्हते; कारण वीकेंडला ते काम करत नाहीत. आधीच तीन दिवस त्यांनी गोळ्या-औषधे खाल्ली नव्हती. त्यात आणखी एक दिवस गेला. आमच्या गटातील काहींकडे असलेल्या बीपी- शुगरच्या गोळ्या त्यांना देण्यात आल्या; परंतु प्रत्येकाकडे किती अधिकचा साठा असणार?

अशा तऱ्हेने या कृत्रिम पावसाने,
माणसाचे नैसर्गिक जगणे, भयावहरीत्या कृत्रिम करून टाकले!
काळ सोकावलाय आणि काळ बदललायसुद्धा! या प्रसंगाच्या निमित्ताने एवढेच सांगावेसे वाटते, पावसाळ्याचे दिवस नसतानाही ‘कृत्रिम पाऊस’ पडू शकतो, याचीही नोंद ज्ञानात भर घालणारी ठरली!

pratibha.saraph@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -