मुंबई: अजिंक्य रहाणे बऱ्याच वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. मात्र त्याने शतक ठोकत पुन्हा एकदा भारतीय संघाचा दरवाजा ठोठावला आहे. रहाणेने काऊंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन टू २०२४ चमध्ये लेस्टेशरसाठी शतक ठोकले. रहाणेने १९२ चेंडूंचा सामना करताना १०२ धावा केल्या. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर लेस्टेशर संघाला ३०० धावांचा जवळ पोहोचता आले.
रहाणेने भारत-बांग्लादेश कसोटी मालिकेच्या आधी शतक ठोकले. त्याने टीम इंडियामध्ये पुनरागमनच्या आशा पुन्हा बळावल्या आहेत.
खरंतर, काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये लेस्टेशर आणि ग्लेमॉर्गन यांच्यात कार्डिफमध्ये सामना खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान लेस्टेशरच्या दुसऱ्या खेळीदरम्यान रहाणे चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी आला. त्याने १९२ चेंडूत १०२ धावा केल्या. रहाणेने या खेळीत १३ चौकार आणि १ षटकार ठोकला. तो या शतकानंतर ट्रेंड करू लागला. रहाणेबाबत अनेक पोस्ट एक्सवर करण्यात आले.
रहाणेने जुलै २०२३मध्ये शेवटची कसोटी टीम इंडियासाठी खेळली होती. या सामन्यानंतर तो टीम इंडियात अद्याप परतलेला नाही. आता भारत आणि बांग्लादेश यांच्यात १९ सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळवली जाईल. या मालिकेसाठी रहाणेला संधी दिली जाऊ शकते. त्याचे टीम इंडियामधील कामगिरी चांगली राहिली आहे. त्याने ८५ कसोटी सामन्यात ५०७७ धावा केल्या. या दरम्यान १२ शतके आणि २६ अर्धशतके ठोकलीत.