माध्यमांतरांची गरज अनिवार्य आहे...!

  131

भालचंद्र कुबल- पाचवा वेद


हल्लीच नव्या पिढीचा दिग्दर्शक अभिजित झुंजाररावचा एका समाज माध्यमावरील माध्यमांतरावरील पोस्ट वाचली आणि आजच्या लिखाणाला विषय मिळाला. खरतर या आधी बऱ्याच अभ्यासकांनी या विषयावर आपले मत प्रदर्शन, विवेचन आणि पृथ्थकरण केलेले आहे. एका माध्यमातील आशयाचे दुसऱ्या माध्यमात रूपांतरण, म्हणजे माध्यमांतर हे ढोबळमनाने आपण मान्य केलेलेच आहे. परंतु त्या आशयातील नेमकेपण हरवले किंवा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाताना (परकाया प्रवेश करताना) कुठला तरी एक मुद्दा राहून गेला तर, ते रूपांतरण विकृतावस्थेकडे जाते. जसा, एखाद्या हॉररपटातल्या पुरुषाचा आत्मा जेव्हा स्त्रीच्या शरीरात प्रवेश केल्यावर त्या स्त्रीचे पुरुषी आवाजातील बोलणे जसे हॉरीबल, हॉरीफाईंग तथा हॉरर वाटते, माध्यमांतराचे देखील तसेच असते. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाणे म्हणजे ओंजळीतून पाणी नेण्यासारखे आहे. त्यातला आशय जर सादरीकरणाच्या प्रवासात ओंजळीतल्या पाण्यासारखा निसटून गेला तर, बाकी शून्यच उरणार आणि; म्हणून मग माध्यमांतर फसल्याचे आपण नेहमी म्हणत असतो. नाटक हेच एक असे माध्यम आहे जे कविता, कथा, कादंबरी, ललितलेख अशा कितीतरी साहित्य प्रकारांचे माध्यमांतर सहज प्रक्रियेतून घडवून आणू शकते. नाटकाची अंतिम फलश्रुती ही सादरीकरणात असल्याने त्यास मिश्रस्वरुपी प्रादर्शिक कला म्हटले जाते. ते या माध्यमाच्या गुणधर्मामुळे. नाट्यकलेमुळे एका माध्यमातील ‘आत्मसंवाद’ हा माध्यमांतराने ‘जनसंवाद’ होतो.


थोडक्यात संवाद साधण्याचा डिव्हाइस बदलला की, घडून येते ते माध्यमांतर. कवितेचे नाटकात, कथेचे नाटकात, कादंबरीचे नाटकात किंवा ललित लेखनाचे दृक-श्रवणात रुपांतरण म्हणजे माध्यमांतर. अर्थात हीच संज्ञा चित्रपटासारख्या अथवा टेलीव्हिजनसारख्या माध्यमाबाबतही लागू पडते. मात्र नाटक माध्यमास दृष्यात्मक सादरीकरणाच्या मर्यादा आहेत. चित्रपट किंवा टेलीव्हिजनसारखी व्हिज्युअल डेप्थ या माध्यमास नाही. त्यामुळे जास्तीत जास्त गृहितकांवरील विधाने नटाद्वारे प्रेक्षकांना व्हिज्युअलाइज करायला लावण्याचे सामर्थ्य माध्यमांतरात असते. तुमच्या मेंदूला सतर्क, जागरुक आणि क्रियाशील ठेवण्याचे कार्य नाटक हे माध्यम चित्रपट किंवा टेलीव्हिजनपेक्षा अधिक प्रभावीरित्या करते, असे संशोधन सांगते. कुठल्याही टू डायमेन्शनल (द्विमित) घटकास अथवा संहितेस थ्री डायमेन्शनल (त्रिमित) स्वरुप प्राप्त करुन देण्याच्या प्रक्रियेत अक्षर वाड:मयातील मूलभूत घटक लक्षात घेणे जरुरीचे आहे. डॉ. सतीश पावडे यांच्या संशोधनानुसार संहिता या टू डायमेन्शल रचनेचे, विषय, आशय, कथावस्तू, संवाद, पात्रांची चरित्र रचना, देशकाल आणि संघर्ष हे घटकच माध्यमांतरावरील प्रवासात लक्षात घ्यावे लागतात. ‘फ्रॉम पेज टू स्टेज’ प्रक्रियेत संहितेतील नाट्यबीजापासून सुरू झालेली प्रक्रिया दिग्दर्शकांच्या रंगचेतनेपर्यंत प्रवास करते. नव्या माध्यमातील अभिव्यक्ती आणि रचनेतील आशय समृद्धपणे पोचविण्यास दिग्दर्शक कारणीभूत ठरतो कारण माध्यमांतरातील तो प्रमुखदुवा असतो.


नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या “सुवर्णकलश” एकांकिका स्पर्धेत “वेदना सातारकर? हजर सर...!” ही एकांकिका बघण्याचा योग आला. प्रशांत मोरे यांच्या दीर्घ कवितेचे नाट्यरुपांतर हे माध्यमांतरच होते. तरुणाईला भावणारी, तरुणाईच्या भावविश्वात फेरफटका मारुन येणारी प्रेमकविता जशी वाचायला, वाचून दाखवायला आवडते तशीच ती पाहायलाही आवडतेच. अल्लड वयातील निखालस, सोज्वळ, आरस्पानी प्रेमभाव व्यक्त करणारी कविता कुठेही दृष्यात्मक न होता, प्रसंग न घडता, विशेष म्हणजे कुठलेही नाट्य अधोरेखित न करता उलगडत जाणारा भाव-भावनांचा आविष्कार म्हणजेच कवितेच नाटकात झालेले माध्यमांतर होय.


या माध्यमांतराचा इतिहास किंवा आधीचे संदर्भ खर तर शोधायला हवेत. एकांकिका या नाट्यप्रकाराचा माझा अभ्यास अगदीच अल्प, म्हणजे गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांचा आहे. माझ्या बघण्यात आलेली आणि प्रयोगदृष्ट्या परिणामकारक ठरलेली एकांकिका होती १९७८/७९ साली डी. जे. रुपारेल महाविद्यालयाने सादर केलेली भालचंद्र झा दिग्दर्शित “चित्रकथी”. ही एकांकिका देखील मनोहर वाकोडे यांच्या ‘एक होता एको महार’ या कवितेवर आधारित होती. कोकणातल्या चित्रकथी या लोककलेचा आकृतीबंध या एकांकिकेसाठी प्रथमच वापरला गेला.


मुळात नाट्यप्रसंगांनी खचाखच भरलेली ही एकांकिका केवळ पाच प्रयोग होऊन सुद्धा प्रचंड चर्चिली गेली होती. त्यानंतर अनेक कवितांची नाट्यरुपांतरे येऊन गेली. प्रदीप राणे आणि अर्चना केळकर देशमुख यांनी नारायण सुर्वे यांच्या कवितांवर, धर्मवीर भारतींच्या कवितांवर, किशोर कदमांनी केलेली बालकवींच्या “औदुंबर” या कवितेवरील एकांकिका अशी शेकडो उदाहरणे देता येतील. कवितेतून नाट्यरुप मांडण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नाटक. या माध्यमाचे प्रारुपच काव्यमय होते. अगदी मराठी भाषेतील पहिले नाटक “श्री लक्ष्मीनारायण कल्याण नाटक” संहितेनुरुप काव्यच आहे. त्यामुळे नाटक आणि काव्य अखेरपर्यंत परस्परानुरुप हातात हात घालूनच वावरणार. हा माझ्यासह अन्य नाट्याभ्यासकांचा दावा आहे.


नवी पिढी जुने मराठी साहित्य वाचू लागली आहे. जुने ते सोने या उक्तीनुसार सोन्यासारख्या आऊटडेटेड म्हणून टेलीव्हिजन माध्यमाने दुर्लक्षित केलेल्या मराठी साहित्यातील निरनिराळे वाड:मय प्रकार माध्यमांतराच्या रुपाने सादर होऊ लागले आहेत. थोडक्यात येणाऱ्या पुढील काळात माध्यमांतरायोगे नाटक आणि सिनेमातून अनेक वाड:मयीन साहित्यकृती दिसू लागतील याबाबत मात्र सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्यास हरकत नाही.

Comments
Add Comment

माऊली...!

मनभावन : आसावरी जोशी साऱ्या महाराष्ट्राचे माऊलीपण अंगोपांग मिरवत गेल्या २८ युगांपासून विठ्ठल पंढरीच्या विटेवर

प्रयोगशील रंगकर्मीचा नाबाद प्रयोग क्रमांक ८०...

राजरंग : राज चिंचणकर  प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर रंगकर्मी विविध प्रयोग करतच असतात; पण त्याही पलीकडे

आता फक्त निवडक भूमिका करणार

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  अशोक शिंदे हे मनोरंजन सृष्टीत गेल्या चाळीस वर्षांपासून कार्यरत आहेत. नाटक, मालिका,

शुभाशीर्वाद अवकाशाचे...

मनभावन : आसावरी जोशी अवकाश म्हणजे एक निर्वात पोकळी... लहानपणापासून भूगोलाच्या तासाला घोकून पाठ केलेली माहिती.

लुप्त झालेला नाट्य खजिना : भांगवाडी थिएटर

भालचंद्र कुबल : पाचवा वेद सध्या राजकीय वारे शिक्षणाच्या दिशेने वाहणाऱ्या हिंदी भाषेच्या झग्यात शिरलेत.

कलावंताला जेव्हा ‘डॉक्टराश्रय’ मिळतो...

राजरंग : राज चिंचणकर ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भिडे हे रंगभूमीवर ‘मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हे नाट्य सादर करत असतात.