टर्निंग पॉइंट- युवराज अवसरमल
बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे ट्रेलर आणि प्रोमोज संकलित करून भावनिकदृष्ट्या अनुनाद कथाकथनाचा अनुभव असणारा एक लेखक व दिग्दर्शक आहे, त्याचे नाव आहे निलेश नाईक. त्याच्या प्रथमच दिग्दर्शनाने स्पर्श झालेला ‘द्विधा’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
निलेशचे शालेय शिक्षण विरार येथील आगाशी येथे झाले. त्यानंतर वर्तक कॉलेजमधून त्याने विज्ञान शाखेमधून पदवी घेतली. सृजनशीलतेची आवड असल्याने त्याने संकलनाचा मार्ग धरला. अंधेरीतील बिग बी इन्स्टिट्यूटमधून संकलनाचे धडे गिरविले. त्यानंतर त्याची संकलनाची गाडी सुस्साट वेगाने धावू लागली. निंबस संस्थेमध्ये त्याने काम केले. स्टार प्लस वाहिनीवरील मालिकेचे त्याने प्रोमो बनविले. त्याला प्रतिष्ठित प्रोमॅक्स अवॉर्ड मिळाला. न्यूयॉर्क येथे गोल्ड अवॉर्ड मिळाला. देवदास चित्रपटाचा स्टार प्लस वाहिनीसाठी प्रोमो बनविला. २००५ साली निर्माता, दिग्दर्शक संजय लीला भन्साळीच्या ब्लॅक चित्रपटाचा प्रोमो बनविला. नंतर त्याने सोनी वाहिनी जॉईन केली. त्या वाहिनीसाठी त्याने काही बॉलिवूड चित्रपटाचे प्रोमो बनविले. दिग्दर्शक अनुभव सिन्हाच्या दस चित्रपटाचा ट्रेलर त्याने बनविला. सावरीया, माय नेम इज खान, रावण या चित्रपटाचा ट्रेलर बनविला.
आता त्याचा बाप-लेकीच्या भावविश्वावर आधारित ‘द्विधा’ हा चित्रपट येणार आहे. या मुलीला आई नसते त्यामुळे तिचे तिच्या वडिलांशी घट्ट ऋणानुबंध तयार झालेले असतात. तिला भूतकाळ किंवा भविष्यकाळ निवडायचा असतो. या चित्रपटामध्ये तिचा संघर्ष पहायला मिळेल. या चित्रपटामध्ये मनोहर ही जी व्यक्तिरेखा दिग्दर्शकाला हवी होती, ती त्यांना अभिनेते सतीश पुळेकरमध्ये दिसली. त्यांना चित्रपटाचे कथानक सांगितल्यानंतर त्यांची भूमिका सतीशजींना खूप आवडली. ही माझी सर्वात चांगली भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मानसी कुलकर्णीसोबत या अगोदर त्याने जाहिरातीसाठी काम केले होते. त्यामुळे तिच्या सोबत त्याची ओळख होती. या चित्रपटातील मुलीच्या भूमिकेसाठी ती योग्य वाटल्याने तिची निवड करण्यात आली. तिने साकारलेल्या भूमिकेबद्दल दिग्दर्शक समाधानी असल्याचे कळले. चित्रपटाचे दिग्दर्शन करणे हे त्याचे स्वप्न होते व ते या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण झाले आहे. या चित्रपटातील वडील व मुलींच्या नात्यातील भावनिक प्रवास प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा त्याने विश्वास व्यक्त केला.
हृदयस्पर्शी संगीत आणि कॅनव्हासवर रंगवलेल्या चित्रांसारखी दिसणारी दृश्ये प्रेक्षकांमध्ये उत्कंठा निर्माण करीत आहे. वडील आणि मुलीमधील चिरस्थायी प्रेम व हळवे संबंध लवकरच प्रेक्षकांना पहायला मिळेल असा आशावाद त्याने व्यक्त केला. निलेशला त्याच्या आगामी ‘द्विधा’ चित्रपटासाठी हार्दिक शुभेच्छा!