नागपूर : आम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलो नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्माला आलेलो आहोत. आम्हीही गरिबी पाहिली आहे. त्यामुळे या योजनेची गरज का आहे, हे आम्हाला कळते. १,५०० रुपयांचे मोल आम्हाला ठाऊक आहे. जशी जशी तुम्ही आम्हाला ताकद द्याल, महायुतीला पाठिंबा देत जाल, तसे तसे आम्ही तिघे भाऊ ओवाळणीची रक्कम वाढवत नेऊ. अभी तो ये सिर्फ ट्रेलर है, पुरी पिक्चर अभी बाकी है, आगे आगे देखो होता है क्या.. असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर घणाघात करत लाडक्या बहिणींशी संवाद साधला.
नागपूरच्या रेशिमबाग मैदानावर राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंसह इतर महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम होतो आहे. या कार्यक्रमात नागपूरसह विदर्भातून हजारोंच्या संख्येने महिलांची मोठी गर्दी उसळल्याचे बघायला मिळाले आहे.
महायुतीच्या वतीने आयोजित लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कार्यक्रम उसळलेल्या गर्दीवरुन एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहीणींचे आभार मानत भाष्य केलं. विमानतळावरून येताना खूप ट्रॅफिक होते, महिलांची मोठी गर्दी उसळली होती. मला इथे पोहोचायला माझ्या बहिणींमुळेच उशीर झाला असल्याचेही ते म्हणाले. पहिल्या टप्प्यात १ कोटी ७ लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. आज ५२ लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा केले असून उर्वरित महिलांच्या खात्यातही लवकरच पैसे जमा होतील.
नारी शक्ती इतिहास बदलती है
आज विरोधकांच्या पोटात दुखत आहे, यांची नियत समजून घ्या.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम सुरु आहे. महिला विकसित झाल्याशिवाय भारत पुढे जाणार नाही. तोट्यात असलेली एसटी महिलांना ५० टक्के सवलत देताच फायद्यात आली. मुलींना फी भरायला पैसे नाहीत असे सांगू नका, आम्ही फी भरू, बिजली चमकती है, नारी शक्ती गरजती है, तो इतिहास बदलती है, असे फडणवीस म्हणाले.
नोव्हेंबरमध्ये महायुतीला आशिर्वाद द्या
लाडकी बहीण योजनेची विरोधकांनी चेष्टा केली. टिंगल टवाळी केली. तुम्हाला कुणी अडवलं होते. तुम्ही का नाही आणली योजना. ही योजना पुढे चालू ठेवायची असेल तर नोव्हेंबरला महाराष्ट्रात निवडणुका आहेत, महायुती म्हणून कमळ, धनुष्य, घडयाळ घेऊन आम्ही उभे राहणार आहोत. तुम्ही आशिर्वाद द्या. पुढे पाच वर्ष ही योजना व्यवस्थित चालविली जाईल. कुणी माईचा लाल येऊ देत ही योजना बंद पडू देणार नाही, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.