Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीपंतप्रधानांनी ३ रेल्वे गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा

पंतप्रधानांनी ३ रेल्वे गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा

आभासी पद्धतीने केला वंदे भारत गाड्यांचा शुभारंभ

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, शनिवारी ३ वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. ‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारत या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाची जाणीव करून देत अत्याधुनिक वंदे भारत एक्सप्रेस, मेरठ-लखनौ, मदुराई-बेंगळुरू आणि चेन्नई-नागरकोइल या ३ मार्गांवर संपर्क सुविधा सुधारेल. तसेच या रेल्वे गाड्यांमुळे उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये संपर्क सुविधा वाढणार आहे.

दृकश्राव्य माध्यमातून आभासी पद्धतीने या गाड्यांचा शुभारंभ केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मदुराई-बेंगळुरू, चेन्नई-नागरकोइल आणि मेरठ-लखनौ या ३ वंदे भारत रेल्वे गाड्यांमुळे उत्तर ते दक्षिण भारताच्या विकासाच्या प्रवासात एक नवीन अध्याय लिहिला जात आहे, देशातील वंदे भारत गाड्यांचे आधुनिकीकरण आणि विस्तार करून देश विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे.

या गाड्यांमुळे देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये तसेच ऐतिहासिक शहरांमध्ये संपर्क सुविधा स्थापित झाली आहे. “मंदिरांचे शहर मदुराई आता आयटी सिटी बेंगळुरूशी जोडले गेले आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.

या गाड्या केवळ सुलभ संपर्क सुविधा उपलब्ध करुन देणार नाहीत तर, विशेषत: शनिवार आणि रविवार किंवा सणाच्या कालावधीतही यात्रेकरूंसाठी देखील खूप फायदेशीर ठरतील, असेही ते म्हणाले.

चेन्नई-नागरकोइल मार्गामुळे विद्यार्थी, शेतकरी आणि आयटी व्यावसायिकांना मोठा फायदा होईल. वंदे भारत गाड्यांशी जोडल्या गेलेल्या पर्यटनस्थळी पर्यटनात झालेल्या वाढीची नोंद पंतप्रधानांनी घेतली. या प्रदेशातील व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींतही वाढ झाल्याचे दिसून येत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. तीन नवीन वंदे भारत रेल्वे गाड्यांद्दल पंतप्रधानांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

“वंदे भारत म्हणजे भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचे नवे प्रतिक असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. प्रत्येक शहरात आणि प्रत्येक मार्गावर वंदे भारताची मागणी होत असल्याचे सांगत, अतिवेगवान रेल्वेगाड्यांच्या आगमनामुळे लोकांमध्ये त्यांचा व्यवसाय, रोजगार आणि स्वप्ने पूर्ण करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

“आज देशभरात १०२ वंदे भारत रेल्वे सेवा सुरू आहेत आणि आतापर्यंत ३ कोटींपेक्षा जास्त लोकांनी या ट्रेनमधून प्रवास केला आहे”, अशी माहिती त्यांनी दिली. हे आकडे केवळ वंदे भारत ट्रेनच्या यशाचे उदाहरण नसून भारताच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतीक आहेत, असे ते म्हणाले.

आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधा हा विकसित भारताच्या दूरदृष्टीचा मजबूत आधारस्तंभ असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या क्षेत्रात जलद गतीने होणाऱ्या प्रगतीची रूपरेषा विशद करताना पंतप्रधानांनी रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण, नवीन गाड्या चालवणे आणि नवीन मार्गांचे बांधकाम यांचा उल्लेख केला. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २.५ लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त निधीची तरतूद करण्यात आली असून, सरकारची पूर्वीची प्रतिमा बदलण्यासाठी सरकार भारतीय रेल्वेला उच्च तंत्रज्ञान सेवांशी जोडत असल्याची माहिती त्यांनी दिली.

विस्तार योजनांबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, वंदे भारतसोबत अमृत भारत ट्रेनचाही विस्तार केला जात आहे. ते पुढे म्हणाले की, वंदे भारतच्या स्लीपर आवृत्तीला लवकरच हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. लोकांच्या सुविधेसाठी नमो भारत ट्रेन चालवल्या जात आहेत आणि शहरांमधील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी लवकरच वंदे मेट्रोजही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -