फिरता फिरता- मेघना साने
मराठी भाषा आणि मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या परदेशातील संस्थांना महाराष्ट्र शासनाच्या ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या माध्यमातून एका छत्राखाली आणणे व परस्पर समन्वयातून त्यांच्या उपक्रमांना शासन स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देणे यासाठी ‘आंतरराष्ट्रीय मराठी मंचा’ची स्थापना करण्यात आली आहे. या मंचाचे समन्वयक प्रत्येक देशात आहेत. आफ्रिकेतील केनिया या देशाचे अंतर्देशीय उपसमन्वयक राहुल उरुणकर यांच्याशी संवाद साधून मी तेथील महाराष्ट्र मंडळाच्या हालचाली जाणून घेतल्या. राहुल उरुणकर यांनी २०१३ मध्ये नैरोबीच्या महाराष्ट्र मंडळाचे सेक्रेटरी म्हणून काम केले होते. तर २०१६-१७ मध्ये ते त्या महाराष्ट्र मंडळाचे चेअरमन होते. त्यांनी महाराष्ट्र मंडळातर्फे तेथे मराठी सण उत्सव कसे साजरे होतात हे अभिमानाने सांगितले.
नैरोबीतील महाराष्ट्र मंडळ हे आफ्रिकेतील सर्वात जुने महाराष्ट्र मंडळ म्हणता येईल. याची स्थापना १९४५ साली, जेव्हा ब्रिटिश हायकमिशनर केनियात आले तेव्हाच झाली. हायकमिशनर (पंत) यांनी महाराष्ट्र मंडळासाठी जागादेखील दिली आणि आता ती वस्तू दिमाखात उभी आहे. केनिया खेरीज आफ्रिकेत अनेक महाराष्ट्र मंडळे आहेत. त्यातील केनियासह आठ महाराष्ट्र मंडळांशी राहुल स्वतः संपर्कात आहेत. ती म्हणजे नायजेरिया, घाना, झामा, टांझानिया, युगांडा, मॉरिशस आणि साऊथ आफ्रिका.
केनियाच्या नैरोबीच्या महाराष्ट्र मंडळात दहीहंडी साजरी होते बरे का! फार उंच नाही, तरी मुलांसाठी दहा फुटांवरच ती बांधली जाते. पुरुषांसाठी वेगळी दहीहंडी आणि स्त्रियांसाठी वेगळी दहीहंडी असते. अशा जन्माष्टमी उत्सवातील तीन दहीहंड्या फुटतात. गुढीपाडव्याला तर गुढी उभारण्याची स्पर्धाच असते. मराठी संस्कृती जतन करून, पारंपारिक पोशाख घालून सुंदर गुढी कोण उभारेल त्याला मंडळातर्फे बक्षीस दिले जाते. एवढेच काय, नैरोबीत वटसावित्रीची पूजादेखील स्त्रिया करतात. तेथे भारतीय देवळांमध्ये शनिवार, रविवार जाण्याची पद्धत असतेच. मराठी कुटुंबांच्या एकमेकांशी भेटी होतात. देवळात वडाचे झाड लावलेले आहे. त्याची छोटीशी फांदी घेऊन स्त्रिया वटसावित्रीला पूजा करतात.
“महाराष्ट्र मंडळाच्या सभासदांचा सर्व सणांच्या बाबतीत उत्साह असतो. पण जास्तीत जास्त गर्दी होते ती गणेशोत्सवाला.” उरुणकर सांगत होते. “दरवर्षी गणपतीची मूर्ती महाराष्ट्रातून आणली जाते. एक साउथ इंडियन फॅमिली दरवर्षी ही मूर्ती आम्हाला डोनेट करते.”
केनियामध्ये गणेशाची मूर्ती जहाजाने, कधी कंटेनरमधून, तर कधी विमानाने येते. गणेश मूर्तीची स्थापना करण्यापूर्वी तेथे आरास केलेली असते. मूर्ती ठेवण्यासाठी प्रथम एक महाल सुशोभित केला जातो. त्यासाठी सर्व स्वयंसेवक खपतात. उत्सवाची सुरुवात रोज आरतीनेच होते. त्यानंतर मुलांचे, मोठ्यांचे कार्यक्रम, नृत्य, नाटिका इत्यादी कार्यक्रम सादर केले जातात. त्यासाठी मुलांच्या तालमी तर महिनाभर आधीच सुरू असतात. महाराष्ट्रीयन माणसांखेरीज नैरोबीत इतर भारतीय भाषिकही असतात. ते सुद्धा दर्शनाला येतात. गुजराती, पंजाबी एवढेच नव्हे, तर आफ्रिकन लोकदेखील येतात. दर दिवशी हजार-बाराशे लोकांची उपस्थिती असते आणि सर्वांसाठी महाराष्ट्रीय पद्धतीचे जेवण बनविले जाते. आचारी बोलावून कांदा, लसूणविरहित स्वयंपाक केला जातो. प्रसाद तयार करायला मराठी गृहिणी पुढे सरसावतात. एका वर्षी तर गृहिणींनी तीन हजार मोदक तयार केले होते. आफ्रिकेत विशेषत: केनियामध्ये महाराष्ट्रीय फूड फेस्टिवलदेखील होतो. त्यात महाराष्ट्रातील नामवंत पदार्थांचे स्टॉल लागतात. वडापाव, भजी, मस्तानी असे विविध पदार्थ, तसेच कोकणी फिश करी वगैरे असे वैविध्य पाहायला मिळते. राहुल सांगत होते, “महाराष्ट्रीय फूडची एवढी क्रेझ आहे की, गेल्या वर्षी प्रदर्शनाच्या बाहेर एक किलोमीटरची रांग लागलेली होती.” केनियातील हॉटेल्समध्येदेखील महाराष्ट्रीय पदार्थ मिळतात. वेगवेगळे मसाले घालून त्यांची चव अगदी युनिक बनवलेली असते.”
नायजेरियातील लेगॉसमध्ये पंचवीस वर्षे राहत असलेले अजित साने, बीना साने यांनी महाराष्ट्र मंडळ, लेगॉसच्या कार्यकारी कमिटीत काम केले होते. आता ते दोघे भारतात आले आहेत. बीना सांगत होत्या,“गणेशोत्सवात आम्ही मंडळासाठी गणेशमूर्ती महाराष्ट्रातून आणत होतोच. पण तेथील एका नायजेरियन कलाकाराने गणेशमूर्ती बनविण्याचे कसब आत्मसात केले आणि तो मुर्त्या तयार करू लागला. मूर्तीला रंगही तोच देऊ लागला. मग त्याला प्रोत्साहन म्हणून ती मूर्तीदेखील आम्ही मंडपात ठेवू लागलो.” त्यांनी आणखी काही आठवणी सांगितल्या. लेगॉसमध्ये जेवण कमिटीत असलेल्या बायका प्रसादाचे पदार्थ करत असत. पण पुढे काही वर्षांनी स्थानिक नायजेरियन मंडळींनीही महाराष्ट्रीयन स्वयंपाक मोठ्या प्रमाणात करण्याची तयारी केली. एका नायजेरियन माणसाने हिंदू धर्म स्वीकारून देवळात पुजारी म्हणून काम केले आणि मंत्रोच्चारांसह तो पूजा सांगत असे.
मराठी माणूस म्हटला की, रंगभूमीवरील नाटक पाहिल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. केनियामध्ये मराठी नाटकाला वीस-पंचवीस वर्षांची तरी परंपरा आहे. यातील नैरोबी महाराष्ट्र मंडळाच्या नाटकांचे व्हिडिओ फेसबुकवर पाहायला मिळतात. नाटकासाठी दोन-दोन महिने या मंडळींची तालीम चालते. नोकरी करून आल्यावर सुद्धा लोक तालमीसाठी वेळ देतात. नाटकाची त्यांना पॅशनच असते. आपले मराठी साहित्य, गाणी, नाटके पुढील पिढीला देता यावी याची आफ्रिकेतील मराठी माणसांना तळमळ असते. म्हणून २०१७ मध्ये राहुल उरुणकर यांनी मराठी शाळा सुरू केली व आता राज्य विकास मराठी संस्थेच्या पाठिंब्याने ती सुरळीत सुरू आहे. स्थानिक सुशिक्षित मराठी स्त्रिया तेथे शिक्षिका म्हणून काम करत आहेत. दर शनिवारी मुले मराठी भाषा शिकायला येतात. आफ्रिकेत मराठी भाषा आणि संस्कृती जपण्याचा तेथील मराठी नागरिकांनी विडा उचललेला आहे.