आनंदवारीचे पुनश्च: हरीओम...!

राजरंग- राज चिंचणकर


महाराष्ट्राला संत महात्म्यांची थोर परंपरा लाभलेली आहे. त्यांच्या लिखित व मौखिक शब्दकळांद्वारे आत्मिक आणि व्यावहारिक प्रबोधन समाजात घडत आलेले आहे. ‘पंढरीची वारी’ हा तर महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवाच आहे. या वारीत जो चालतो, त्याला आयुष्याचे मर्म उलगडते; असे म्हटले जाते. पंढरीच्या या वारीची मोहिनी कलाक्षेत्रातही अनेकांना पडली आणि या मंडळींनी ही वारी रंगमंचावर व पडद्यावरही दृगोच्चर केली. याच मांदियाळीत ‘विठू माऊली’ या नाट्याने आता रंगमंचावर फेर धरला आहे. या नाटकाच्या शीर्षकातच विठू माऊलीचे अस्तित्व असल्याने, त्यासदृश्य कथासूत्र या नाट्यात आहेच; परंतु त्यासोबतच वर्तमानाचे संदर्भ घेत ही वारी वास्तवात उतरली आहे.


एकीकडे या नाटकातून पंढरीच्या वारीचे पारंपरिक महत्त्व विशद केले जात असतानाच, आजच्या युवावर्गालाही या आनंदवारीत थेट समाविष्ट करून घेण्यात आले आहे. हा असा अनोखा संगम घडवण्याचे श्रेय या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक व निर्माते संदीप विचारे यांना द्यावे लागेल.या नाटकाची संकल्पना मुळात त्यांना सुचली कशी, याविषयी त्यांच्याशी संवाद साधला असता, “पंढरीची वारी ही महाराष्ट्राला लाभलेली सांस्कृतिक श्रीमंती आहे”, अशा शब्दांत ते संवादाची नांदी करतात. “आजच्या तरुणाईला सोबत घेऊन ही वारी अधिक वर्धिष्णू होण्यासाठी विठू माऊलीच्या आणि मायबाप रसिकांच्या चरणी केलेला आमचा हा अल्पसा प्रयत्न आहे. कोणतीही वारकरी परंपरा घरी नसताना; केवळ फोटोग्राफीच्या निमित्ताने दहा-बारा वर्षापूर्वी मी वारी अनुभवली होती. मग दरवर्षी कधी दिवेघाटात, कधी वाखरीत, कधी जेजुरीत, तर कधी नीरा तीरी मी वारी अनुभवण्यासाठी जाऊ लागलो.



गेल्यावर्षी अकलूज जवळ माऊली आणि त्यांचे बंधू सोपानकाका, यांची बंधूभेट हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने अनुभवली. कोरोनाच्या काळात हे नाटक मला सुचले. हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत आम्ही सादर केले; तेव्हा परीक्षकांनी याचे व्यावसायिक नाट्यरूपांतर करा, असे सांगितले. दोन वर्षांपूर्वी आषाढी एकादशीला याचा पहिला प्रयोग आम्ही सादर केला. त्यानंतर गणेशोत्सवात आणि इतर ठिकाणी सात-आठ प्रयोग केले. यंदा पुन्हा नवीन कलाकार घेऊन तालीम सुरू केली आणि आमच्या चाळीस वारकऱ्यांच्या सोबतीने आता श्री शिवाजी मंदिरमध्ये नाटकाचा पुनश्च: हरी ओम केला”, अशी भूमिका या नाटकाबद्दल बोलताना संदीप विचारे मांडतात.



एकूणच पंढरीच्या वारीविषयी भावना व्यक्त करताना ते सांगतात, “विठू माऊलीची ही वारी म्हणजे आपला जीवनप्रवासच आहे. कधी सुखाचे उभे गोल रिंगण; तर कधी दिवेघाटासारखा चढ. पण पुन्हा वाखरीसारखा निवांत विसावा; तर कधी आनंदाचे निरा स्नान; असे आपल्या जीवनातील सुखदुःखांचे टप्पे, पडाव पार करत पंढरीकडे मार्गक्रमण करायचे. चंद्रभागेच्या स्नानाने आणि विठू माऊलीच्या दर्शनाने मिळणारी शांती, आनंद हेच जीवनप्रवासाचे सूत्र म्हणून ठरवले की सर्वकाही जमते. मग हा जीवनप्रवासच एक आनंदवारी
बनून जातो”.

Comments
Add Comment

मी आणि ‘घासीराम कोतवाल’

भालचंद्र कुबल : पाचवा वेद घासीराम पुराण इतक्या लवकर आवरतं घेता येईल असं काही वाटत नाही. पण मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक

झेंडे प्लॅटर...!

आसावरी जोशी : मनभावन आपला देश, महाराष्ट्र, मुंबई ... या तिन्हींशी निगडित प्रत्येक चांगली गोष्ट आमच्या घरासाठी

ती आई होती म्हणून...

पितृपक्षाला प्रारंभ झाला की, सर्वांना आपापल्या पूर्वजांची आवर्जून आठवण येते. हे स्वाभाविकच असले, तरी आपल्या

कोकणच्या मातीची मिठ्ठास भ्रमंती...

राजरंग : राज चिंचणकर कोकणचा प्रदेश, तिथला निसर्ग, तिथली माणसे या सगळ्यांत गोडवा ठासून भरलेला आहे. अशा प्रकारची

मी आणि घासीराम कोतवाल

भालचंद्र कुबल : पाचवा वेद घासीराम नव्याने उभे करायचे म्हणजे नेमके काय करायचे याबाबत माझ्या डोक्यात काही

पुढच्या वर्षी लवकर या!

आसावरी जोशी : मनभावन श्यामची आई पुस्तकात आईच्या तोंडी एक वाक्य आहे. अगदी सहज मनास भिडणारे. देवाच्या घरून येणारे