Friday, March 28, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरPM Modi : वाढवण बंदरामुळे पालघर परिसराचे आर्थिक चित्र बदलणार

PM Modi : वाढवण बंदरामुळे पालघर परिसराचे आर्थिक चित्र बदलणार

सुमारे ७६,२०० कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदराचा पायाभरणी व १५६३ कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय प्रकल्पांचे व योजनांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण व शुभारंभ

पालघर : देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासात मच्छिमार बांधवांचे मोठे योगदान आहे. वाढवण बंदर जगातील सर्वात खोल व मोठ्या बंदरांपैकी एक महत्त्वपूर्ण बंदर होणार आहे. या प्रकल्पामुळे या परिसराचे आर्थिक चित्र बदलणार आहे. आता हा परिसर रेल्वे व महामार्गांशीही जोडला जाणार असून यामुळे या परिसरात नवनवीन व्यापार सुरू होतील. या बंदराचा लाभ महाराष्ट्राबरोबरच या भागातील स्थानिकांना व त्यांच्या पुढील पिढ्यांना होणार आहे, असे प्रतिपादन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज येथे केले.

सुमारे ७६,२०० कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदराचा पायाभरणी समारंभ तसेच १५६३ कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय प्रकल्प व योजनांचे लोकार्पण व शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरमधील सिडको मैदानात आयोजित कार्यक्रमात झाले. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्ण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय बंदर विकास, जहाज व जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन राज्यमंत्री जॉर्ज कुरियन, केंद्रीय बंदर विकास, जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, बंदर विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार डॉ. हेमंत सावरा, आमदार श्रीनिवास वनगा, आमदार निरंजन डावखरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेश वाघ, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे आदी यावेळी उपस्थित होते.

मराठी भाषेतून संवाद साधत भाषणाची सुरुवात

सर्व लाडक्या बहिणी व भावांना तुमच्या या सेवकाचा नमस्कार, अशा शब्दांत मराठी भाषेतून संवाद साधत प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वंदन करून भाषणाची सुरूवात केली.
आजचा दिवस हा विकसित महाराष्ट्र विकसित भारत संकल्पनेसाठी महत्त्वाचा दिवस आहे. राज्याच्या विकास यात्रेतील हा एक ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगून श्री. मोदी म्हणाले की, महाराष्ट्राला एक समृद्ध व संसाधनयुक्त समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्र किनाऱ्यावरून आंतरराष्ट्रीय व्यापार होत असून यामुळे भविष्यातही मोठ्या संधी निर्माण होणार आहे. त्यामुळेच ७६,२०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाचा, देशातील सर्वात मोठे बंदर वाढवणमध्ये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील सर्वच बंदरामधून जेवढी कंटेनर वाहतूक होते, त्यापेक्षाही जास्त कंटेनर वाहतूक एकट्या वाढवण बंदरातून होणार आहे. हे बंदर देशाच्या व्यापार व औद्योगिक प्रगतीचे मोठे केंद्र बनणार आहे. वाढवण बंदरामुळे या परिसराचा चेहरामोहरा बदलणार असून एक नवी ओळख निर्माण होईल. तसेच हा परिसर वेस्टर्न फ्रेट कॉरिडॉर, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर यांना जोडला जाणार आहे. यामुळे वाढवण बंदरात वर्षभर कंटेनरची वाहतूक होणार आहे. या क्षेत्राची ओळख पूर्वी किल्ल्यांमुळे होत होती आता ही ओळख आधुनिक पोर्टमुळे होणार आहे.

वाढवण बंदरामुळे १२ लाख रोजगार निर्माण होणार

मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत या संकल्पनांचा लाभ महाराष्ट्राला होत असून यामध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे. वाढवण बंदरामुळे लाखो रुपयांची गुंतवणूक या परिसरात होणार असून सुमारे १२ लाख रोजगार निर्माण होणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने नेहमीच मोठे निर्णय घेतले. महाराष्ट्राचा विकास ही माझ्यासाठी सर्वात प्राधान्याची गोष्ट आहे. त्यामुळेच नुकतेच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यात दिघी येथे बंदर औद्योगिक क्षेत्राला मंजुरी दिली आहे. ही महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंद द्विगुणित करणारी गोष्ट आहे. दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्र हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नाचे प्रतिक बनेल. या पोर्टमुळे पर्यटन व इको रिसोर्टला चालना मिळेल, असेही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -