Monday, May 12, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाढवण बंदर प्रकल्पाची पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाढवण बंदर प्रकल्पाची पायाभरणी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (३० ऑगस्ट) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पालघरमध्ये सुमारे ७६ हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी होणार आहे. तसेच पंतप्रधान मोदी सुमारे १ हजार ५६० कोटी रुपयांच्या २१८ मत्स्यपालन प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. याबरोबर मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२४ मध्ये त्यांचे संबोधन असेल.


पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी ११ वाजता, मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२४ ला संबोधित करतील. त्यानंतर दुपारी दीड वाजता पालघर येथील सिडको मैदानावर विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी होत असलेले, वाढवण हे भारतातील सर्वात मोठ्या खोल जल बंदरांपैकी एक आहे. हे बंदर भारताची समुद्र कनेक्टिव्हिटी वाढवेल आणि जागतिक व्यापार केंद्र म्हणून देशाचे स्थान आणखी मजबूत करेल. या बंदरामुळे रोजगाराच्या लक्षणीय संधी निर्माण होतील, स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल आणि प्रदेशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासात हातभार लागेल अशी अपेक्षा आहे.


वाढवण बंदर प्रकल्पामध्ये शाश्वत विकास पद्धतींचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये पर्यावरणीय प्रभाव कमी करणे आणि कठोर पर्यावरणीय मानकांचे पालन करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे.

Comments
Add Comment