Thursday, March 27, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरPM Modi : छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो-पंतप्रधान

PM Modi : छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो-पंतप्रधान

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी व्यक्त केला खेद
  • ७६ हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन
  • पाच लाख रोजगाराच्या संधी निर्माण होण्याचा आशावाद
  • मत्स्यव्यवसायसंबंधी पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी

पालघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते ७६ हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाचे सिडको ग्राउंड येथे भूमिपूजन करण्यात आले. वाढवण बंदर प्रकल्प हा जागतिक दर्जाचा प्रकल्प आहे. या वाढवण बंदर प्रकल्पाच्या माध्यमातून विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. वाढवण बंदर प्रकल्प हा पालघर जिल्ह्यातील डहाणू शहराजवळ आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल हे देखील उपस्थित होते.

या बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली. तसेच सुमारे १ हजार ५६० कोटी रूपयांच्या २१८ मत्स्यपालन प्रकल्पांचेही उद्धाटन आणि पायाभरणी करण्यात आली. या उपक्रमांमुळे मासेमारी क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि उत्पादकता वाढेल, तसेच पाच लाख रोजगार निर्माण होतील, असे सांगण्यात आले.

माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक नाव नाही, फक्त एक राजा नाही, तर शिवाजी महाराज आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत. आमचे संस्कार वेगळे आहेत. मी आज महाराष्ट्रात आल्यावर सर्वात पहिले छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागण्याचे काम करत आहे. या घटनेमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत, त्या शिवप्रेमींचीही मी माफी मागतो. माझे संस्कार वेगळे आहेत. आमच्यासाठी आमच्या आराध्य दैवताशिवाय काहीही मोठे नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

PM Modi : सावरकरप्रकरणी काँग्रेसने माफी मागितली का?

शिवरायांच्या चरणावर डोके ठेवून मी शिवराय आणि त्यांची पूजा करणाऱ्या शिवभक्तांची माफी मागतो. घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी होता. पश्चाताप न होणाऱ्यांपैकी आम्ही नाही. काही जण सावरकर यांना नावे ठेवतात, त्यांनी माफी मागितली का? असा सवाल नरेंद्र मोदी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी अकराला मुंबईतील बीकेसी येथील जीओ वर्ल्ड कन्व्हेशन सेंटर येथे सुरू असलेल्या ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’ला भेट दिली.

महाराष्ट्रात येऊ पाहणारी गुंतवणूक कोणी रोखली?

२०१४ आधी वाढवण बंदराचे काम रोखून धरण्यात आले होते. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही या प्रकल्पावर काम सुरू केले. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी मेहनत घेतली. मात्र २०१९ साली आमची सत्ता गेली, तेव्हा अडीच वर्ष पुन्हा प्रकल्पाचे काम रखडले. या एकाच प्रकल्पामुळे १२ लाख रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. एवढी मोठी गुंतवणूक कुणी रोखून धरली, हे महाराष्ट्राच्या जनतेने विसरू नये. काही लोक महाराष्ट्राचा विकास रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, केंद्रातील एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकारला महाराष्ट्राला देशात नंबर एकच राज्य बनवायचे आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

स्थानिकांना रोजगारात प्राधान्याने संधी

७६ हजार २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून उभारण्यात येणारे हे बंदर जगातील पहिल्या दहामध्ये स्थान मिळवेल. वर्षाला सुमारे ३०० दशलक्ष टन मालवाहतूक व २३.२० दशलक्ष कंटेनर हाताळणी करण्याची क्षमता असलेले हे बंदर दोन टप्प्यात उभारण्यात येणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय मार्गांची थेट जोडणी (कनेक्टिव्हिटी) शक्य असून त्यामुळे वेळ व खर्च बचत होण्यास मदत होईल. आधुनिक तंत्रज्ञान व पायाभूत सुविधांनी सुसज्ज असणाऱ्या बंदरात डीप बर्थ, कार्यक्षम कार्गो हाताळणी सुविधा व आधुनिक बंदर व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित असून स्थानिकांना रोजगारात प्राधान्याने संधी दिला जाईल, , असा विश्वास केंद्रीय जहाज वाहतूक व जलमार्गमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -