मुंबई: भारताच्या प्रीती पालने पॅराऑलिम्पिक २०२४मध्ये कांस्यपदक जिंकत इतिहास रचला आहे. तिने महिलांच्या १०० मीटर टी-३५ कॅटेगरी रेसमध्ये पदक जिंकले आहे. भारताचे हे या स्पर्धेतील तिसरे पदक आहे. प्रीतिने इतिहासही रचला आहे. कारण पॅराऑलिम्पिक स्पर्धेक ट्रॅक इव्हेंटमध्ये मेडल जिंकणारी प्रीती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
टी३५ कॅटेगरीच्या महिला १०० मीटर शर्यतीच्या फायनलमध्ये भारताच्या प्रीती पालने १४.२१ सेकंदात स्पर्धा पूर्ण करत तिसरे स्थान मिळवले. पहिले आणि दुसरे स्थान चीनच्या धावपटूंनी मिळवले. चीनच्या जिया(१३.३५ सेकंद) आणि गुओने (१३.७४ सेकंद)मध्ये पूर्ण करत रौप्य पदक मिळवले.
यावर्षी प्रीतीपालने कोबीमध्ये झालेल्या वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२४मध्ये कांस्यपदक पटकावत पॅरिस पॅराऑलिम्पिकच्या फायनलमध्ये स्थान पक्के केले होते.
९० मिनिटांच्या आत तीन पदके
२९ ऑगस्टला भारताने पॅराऑलिम्पिकची जबरदस्त सुरूवात केली. मात्र पदकातालिकेत भारताले पहिले तीन पदके ३० ऑगस्टला मिळाली. प्रीतीच्या आधी नेमबाजीत अवनी लेखराने आणि मोना अग्रवालने अनुक्रमे सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकले.
महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत अवनी लेखराने टोकियो पॅराऑलिम्पिकमधील आपले सुवर्णपदक कायम राखत इतिहास रचला. दुसरीकडे मोना अग्रवालने कांस्यपदक जिंकत अवनीसोबत पोडियस शेअर केले.