देशभरात दरवर्षीप्रमाणे दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहाने जल्लोषात साजरा झाला. मुंबई-ठाण्यातील सात, आठ आणि नऊ थरांच्या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकात असलेली स्पर्धा ही देशवासीयांच्या दृष्टीने यंदाही आकर्षणाचा विषय बनला. यंदा मात्र, राजकीय पाठबळामुळे मुख्य रस्त्यांपासून गल्लीबोळात दहीहंडी आयोजकांची संख्या लक्षणीय दिसली. साहजिकच मुंबई-ठाण्यातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात झालेल्या बॅनरबाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण झाले होते, हा दुसरा चर्चेचा विषय ठरू शकतो; परंतु महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका तीन महिन्यांनंतर होण्याची शक्यता असल्याने, स्थानिक पातळीवरील इच्छुक उमेदवारांकडून अनेक गोविंदा पथकांना आर्थिक रसद पुरविल्याने जागोजागी हंडीचे चित्र दिसले. मुंबई-ठाण्यात सुमारे तीन हजारांपेक्षा जास्त गोविंदा पथक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. जास्तीत जास्त उंच हंडी फोडून बक्षिसे आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न होत असताना, गोविंदा पथकातील मंडळांनी मुंबईसह ठाणेकरांनी ‘थरांचा थरार’ अनुभवला. या गोविंदा ṇउत्सवाला नेहमीप्रमाणे अपघाताचे गोलबोट लागले. त्यात मुंबईसह ठाण्यात आतापर्यंत सुमारे अडीचशे गोविंदा जखमी झाले.
गेल्या अनेक वर्षांचा अनुभव पाहता, हंडी फोडताना मनोरा कोसळून अनेक गोविंदांना अपंगत्व आले आहे. या गोविंदांच्या कुटुंबीयांवर आघात तर होतोच मात्र त्यानंतरच्या काळात येणाऱ्या आर्थिक आणि अन्य संकटाला कुटुंबालाच सामोरे जावे लागते. त्यामुळे, नियम धाब्यावर बसवून साजरे केले जाणारे गोविंदा उत्सव टाळता येतील का याचा विचार करण्याची गरज आहे. त्याचे कारण, दहीहंडी उत्सव बालगोपाळांच्या गमती जमतींची आठवण करून देणारा सण असला तरी आता मात्र, मुंबई, ठाण्यात हा दहीकाला उत्सव नव्हे तर एक इव्हेंट म्हणून पुढे आला आहे. विजेत्या गोविंदा पथकांना एक कोटी रुपयांपर्यंतच्या रकमा बक्षीस रूपाने देण्यात आल्याने उत्सवाच्या नावाखाली व्यावसायिकरण झाल्याचे दिसून आले. बोरिवली पूर्वेकडील मागाठाणे येथील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात कोणत्या गोविंदा पथकाकडून हंडी फोडण्यात आली यापेक्षा गौतमी पाटीलच्या नाचगाण्याची जास्त चर्चा होती.
उंच थराच्या हंडी फोडण्यावर निर्बंध आणावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली होती. २०१६ साली यावर निकाल देताना न्यायालयाने संपूर्ण महाराष्ट्रात २० फूट उंचीचा कोणताही मानवी पिरॅमिड ओलांडू शकत नाही, असे स्पष्ट केले होते. तसेच हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून कायम देखील ठेवला गेला होता. मात्र न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे गोविंदा उत्सव तसा साजरा होईल अशी अपेक्षा मंडळाकडून केली जात होती; परंतु गोविंदाचा जणू काही इव्हेंटच पाहायला मिळाला. मंगळवारी रात्री १० वाजेपर्यत मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतुकींची अनेक ठिकाणी कोंडी झाली होती. गोविंदा पथके आणि दहीहंडी आयोजकांच्या धिंगाण्याचा फटका मुंबईतील वाहतुकीलाही बसला. भर वर्दळीच्या रस्त्यांवरच लटकलेल्या हंड्या आणि ती फोडण्यासाठी, पाहण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होती. त्याचप्रमाणे दारू पिऊन गाडी चालविणारे, हेल्मेट न घालता गाडी चालविणारे गोविंदा वाहतूक पोलिसांच्या कारवाईत सापडले. एकाच मोटारसायकलवर ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांवरही कारवाई झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत, शहरात अनेक गोविंदा उत्सव आयोजकांकडून आवाजाची मर्यादा धुडकावून जल्लोषात साजरा केला. कोर्ट आणि बालहक्क संरक्षण आयोगाचे आदेश धुडकावून मुंबई-ठाण्यात दहीहंडी उत्सवात गोविंदांनी नेहमीचाच धुडगूस घातला. नियम हायकोर्टाचे असोत किंवा सुप्रीम कोर्टाचे दहीहंडी आयोजकांनी आपल्या सोयीने ते पाळण्याची वृत्ती यावेळीही दाखवून दिली. त्याचप्रमाणे १२ वर्षांखालील गोविंदांना दहीहंडीच्या थरात सहभागी करायला सुप्रीम कोर्टाने मनाई केली असली तरी, दहीहंडी उत्सवामध्ये या निर्णयाचे सर्रास उल्लंघन होताना दिसते. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसमोर घडत असतो; परंतु आयोजकांवर किंवा गोविंदा पथकावर कारवाई करण्याचे हिम्मत ते दाखवत नाहीत. त्यात मुंबईत आवाजाची पातळी सरासरी ८० ते १०० डेसिबलपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले असले तरीही यावर कारवाई कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातून लोकप्रतिनिधींची मंडळे असल्याने ते नियम उल्लंघन करत असतील, तर जनतेने कोणाकडे जायचे, असा सवाल आता विचारला जात आहे.
खरं तर उत्सवातून आनंद साजरा करायला कोणाची हरकत नाही; परंतु गेल्या काही वर्षांत गोविंदा उत्सवाच्या महा इव्हेंटच्या नावाखाली नवे अर्थकारण जन्माला आले आहे; परंतु त्यात व्यक्तिगत पातळीवर या उत्साहात सहभागी झालेल्या किती गोविंदांना फायदा होतो, हा संशोधनाचा विषय आहे. असो. हाच उत्साह आर्थिक प्रगतीसाठी प्रत्येक मराठी मुलांनी कामी आणता येईल का याचा विचार करायला हवा. त्याचे कारण, मराठी माणसाबद्दल एक प्रचलित म्हण तयार झाली आहे की, तो पुढे जाणाऱ्या माणसाचे पाय खेचण्याचा प्रयत्न करतो. धंद्यात आणि उद्योग व्यवसाय मराठी माणूस हा तो संघटित नसल्याने मागे पडला आहे, असेही बोलले जाते. मात्र गोविंदा पथकात मराठी माणसाची एकी दिसते. लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याचा प्रयत्न करणारे गोविंदा हे एक सामूहिक एकतेचे प्रतीक मानायला हरकत नाही. उंच थर उभारताना प्रत्येक थरातील गोविंदा हा स्वत:ला सांभाळून दुसऱ्या सहकार्याचा तोल जाऊ नये, याची मनापासून काळजी घेत असतो. खालच्या थरापासून हंडी फोडणाऱ्या गोविंदापर्यंत सर्वांमध्ये एकच ध्यास असतो की, हंडी फोडण्याचा.तोच गुण मराठी मुलांनी उद्योग व्यवसाय आत्मसात केला तर, संघटित ताकद निर्माण करून आर्थिक उन्नतीची दारे खुली होऊ शकतात. जीवावर बेतणाऱ्या गोविंदा पथकातील साहस हा गुण आता मराठी तरुणांना उद्योग क्षेत्रात भरारी मारण्यासाठी लाभायला हवा. पुढच्या काळात एका दिवसाचा उत्सव साजरा करताना, न्यायालयाच्या निर्देशानुसार करावा, एवढी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.
गोविंदाची एकता दिसली; पण नियम धाब्यावर
