Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीअभ्यास करून व्यवसायात या - खा. नारायण राणे

अभ्यास करून व्यवसायात या – खा. नारायण राणे

‘मी आत्मनिर्भर’ खरेदी महोत्सवाचा खासदार राणेंच्या हस्ते शुभारंभ

तीन दिवस सुरु राहणार खरेदी महोत्सव

सिंधुदुर्ग : कोणताही व्यवसाय करण्यापूर्वी त्याचा पूर्ण अभ्यास करा आणि मग त्यात उतरा आणि यशस्वी व्हा, आत्मनिर्भर बना, असा महत्वाचा संदेश माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्योजकांना दिला. येथील तांदुळ आणि माशांचे बाय प्रोडक्ट करण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला राणे यांनी दिला. नर्मदाआई महिला औद्योजिक सहकारी संस्था आयोजित मी आत्मनिर्भर या गणेशोत्सवानिमित्त आयोजित विशेष प्रदर्शन आणि खरेदी महोत्सवात ते बोलत होते. खासदार नारायण राणे यांनी नर्मदाआई महिला औद्योगिक संस्थेचे कार्य महिलांना प्रेरणा देणारे आहे अशा शब्दात संस्थेच्या उपक्रमाचा त्यांनी गौरव केला.

येथील नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेने आयोजित केलेल्या महिलांच्या उत्पादनाचे प्रदर्शन व खरेदी उपक्रमाचे उद्घाटन श्री. राणे यांच्या हस्ते फित कापून व दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी कुडाळ मालवण विधानसभा भाजपाप्रमुख माजी खासदार निलेश राणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संस्थेच्या अध्यक्षा सौ. संध्या तेरसे, डॉ. आर.एस.कुलकर्णी, जिल्हा अग्रवी बँकेचे मॅनेजर मुकेश मिश्राम, प्रकल्प व्यवस्थापक आनंद तेंडोलकर, भाजपा कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, संचालिका जयश्री सावंत, महिला आघाडी प्रमुख आरती पाटील, विनायक राणे आदि उपस्थित होते.

अशा उपक्रमामुळे उद्योजक एकत्र येतात हे प्रगतीचे पहिले पाऊल आहे असे श्री. राणे यांनी सांगुन या उपक्रमाला काही मदत करता यावी या उद्येशाने आपण येथे आलो आहे. तांदुळ हे आपले मुख्य पिक आहे पण येथे तांदळाचे बाय प्रोडक्ट मिळत नाही. मासे, कोळंबी आपल्याकडे मिळतात. त्यांच्या पासून बाय प्रोडक्ट बनवून पिकनिकला जाण्यासाठी उत्पन्नाचा एक भाग बनावा या विचाराने अशी उत्पादने महिलांनी करावीत याकडे श्री. राणे यांनी लक्ष वेधले.

कुडाळ पोलीस स्टेशन समोरील १४ गुंठे जागा एक्सीबीशन सेंटरसाठी द्यावी अशी मागणी सौ. तेरसे यांनी केली आहे असे निलेश राणे यांनी सांगितले. तो धागा पकडून आपण जिल्हाधिकार्‍यांशी बोलून ती जागा देण्याचा प्रयत्न करतो. सेंटर आपण बांधून देतो. फक्त चालविणारी माणसे हवीत असे श्री. राणे म्हणाले.

पूर्वी वैद्य होते मात्र आता फक्त डॉक्टर. त्यामुळे वनऔषधीचा वापर होत नाही. त्यामुळे आपल्या जंगलात कोणत्या वनऔषधी आहेत याचा सर्व्हे करायला सांगितला आहे. दोडामार्ग तालुक्यात मेडिसीन कारखाने सुरू करायचे आहेत असे ते म्हणाले. येथील आमदार पळपुटा आहे. त्याने एक तरी प्रकल्प आणला का कधी? बोलला का असा सवाल करीत आपण मात्र आता नवीन प्रकल्प आणून रोजगार देण्याचा प्रयत्न करणार असे श्री. राणे म्हणाले.

निलेश राणे समाजाला काहीतरी दिले पाहिजे. या भावनेने सध्या तेरसे काम करतात. त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. मार्केट निर्माण करण्याचे काम केले आहे. त्या शायनिंगसाठी काही करीत नाहीत अशा शब्दात निलेश राणे यांनी नर्मदा संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. एक्सीबीशन सेंटर उभे राहावे यासाठी नारायण राणे यांच्याकडून अपेक्षा केली आहे. ती ते पुरी करतीलच असे श्री. राणे यांनी सांगितले.

प्रभाकर सावंत म्हणाले की, सिंधुदुर्गातील नवीन महिला उद्योजकांना संस्थेने दालन निर्माण करून दिले आहे. सौ. तेरसे व त्यांच्या सहकारी महिलांच्या बाबतीत चांगले उपक्रम राबवित आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे आत्मनिर्भर होण्याचा भाव निर्माण झाला आहे असे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगुन सौ. तेरसे महिला सशक्तीकरण चांगले काम करीत असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले.

आंदुर्ले येथील गृहलक्ष्मी बचत गटांच्या सौ. कांचन दिेपेश पाटील या उमेद अभियानांतर्गत लखपती दिदी म्हणुन पात्र ठरल्या असून त्यांचा खा. नारायण राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संध्या तेरसे यांनी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर बना असा संदेश कोविड काळात दिला. त्यावेळी मी आत्मनिर्भर असा उपक्रम आम्ही सुरू केला. महिलांनी आत्मनिर्भर स्वावलंबी बनावे यासाठी संस्थेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करीत आहोत असे सौ. तेरसे म्हणाल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -