जीवन संगीत- सद्गुरू वामनराव पै
सद्गुरूंनी दिलेली साधना म्हणजे नामस्मरण केलेच पाहिजे. नामस्मरणाचे अनेक प्रकार आहेत. “येईल तैसा बोल रामकृष्णहरी” हा पहिला प्रकार! हे playgroup झाले. जसे येईल तसे देवाचे नाम घे. हल्ली शाळेत KG च्या अगोदर playgroup असतो. मग Junior KG मग Senior KG असा प्रकार असतो. आमच्या वेळी असे काही नव्हते. “येईल तैसा बोल रामकृष्णहरी” ही सुरुवात झाली. कसेही बोल पण देवाचे नाम घे. देवाचे नाम घेता घेता तुझी हळूहळू प्रगती होईल. एक दिवस तुला सद्गुरू भेटतील व तुझे काम होईल. ८५ टक्के सद्गुरू श्रवण व १५ टक्के साधना हे एवढे केले की, काम झाले. देवाचे नाम कसेही घेतले तरी प्रगती होते हे कशावरून?
माझ्या अनुभवावरून सांगतो. मी ज्या वेळेला नामस्मरण करायला सुरुवात केली तेव्हा मी रामकृष्ण कामतांचे पुस्तक वाचले होते, “नामजपाचे महत्त्व”. ह्यांत त्यांनी नामस्मरणाचा महिमा सांगितलेला होता. मी विचार केला नामस्मरण करायला माझे काय जाते, पैसे खचे करायचे नाहीत किंवा काही कष्ट घ्यायचे नाहीत, सर्व काही सांभाळून हे नामस्मरण करायचे आहे. येता-जाता, उठता-बसता करूया.
अहो येता-जाता, उठता-बसता कार्यकरिता सदा देता घेता वदनी वदता ग्रास घेता घरी दारी शय्येवरी रतीसुखाच्या अवसरी
समस्तांची लज्जा त्यजूनी भगवत चिंतन करी मी म्हटले तसेच करू लागलो. येता-जाता. उठता-बसता म्हणजे लोकांना असे वाटते की, उठताना नाम घ्यायचे बसताना नाम घ्यायचे. प्रत्यक्षात असे नामस्मरण करायचे नाही. येता-जाता, उठता-बसता नामस्मरण करायचे म्हणजे आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नामस्मरण करायचे. रिकामा वेळ नामस्मरणाने भरायचा. “देवाचिये द्वारी उभा क्षणभरी” म्हणजे प्रत्येक क्षण देवाच्या नामाने भर. प्रत्येक क्षण नामाने भरी म्हणजे क्षणभरी. तुम्ही म्हणाल हेही कशावरून?
ज्ञानेश्वर महाराज सांगतात, “सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी, रिकामा अर्धघडी राहू नको”. “तुझा रे विसर नको माझे जीवा क्षण एक केशवा मायबापा”. इथे जो क्षण आला ना, तोच अभिप्रेत असलेला आम्ही सांगत असलेला क्षण. क्षणभरीचा अर्थ आम्ही जो जसा सांगितला आहे तसाच घेतला की पुढचे समजणे अवघड होत नाही. हा अर्थ संदर्भासहीत व परिपूर्ण आहे. आता असे क्षणभरी नामस्मरण की न करायचे हे तू ठरव कारण, “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”.