नाशिक : नाशिकरोड येथील देवळाली गाव परिसरातील राजवाडा भागात राहणाऱ्या एका पंधरा वर्षाच्या युवतीने परिसरात राहणाऱ्या युवकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. सदर घटनेप्रकरणी संबंधित युवक व त्याच्या नातेवाईकांना कठोर शासन करून त्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी परिसरात राहणाऱ्या संतप्त महिलांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. तसेच यासंबंधी नाशिकरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना निवेदन देण्यात आले.
देवळाली गाव राजवाडा परिसरात राहणाऱ्या एका युवतीला याच भागात राहणारा कलाम इजहार मन्सुरी हा युवक छेडछाड करून तिला त्रास देत होता. त्याचप्रमाणे सदरची युवती कॉलेजला जात असताना व येत असताना तिचा पाठलाग करून छळ करीत असे. या त्रासाला कंटाळून सदर युवतीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार चार ते पाच दिवसापूर्वी घडला होता. या घटनेनंतर नाशिकरोड पोलीस ठाण्यात कलाम इजहार मन्सुरी याच्याविरुद्ध तसेच इतर नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, यातील आरोपीवर पोलिसांनी अद्याप पाहिजे तशी कारवाई केली नसल्याने संतप्त झालेल्या देवळाली गाव राजवाडा येथील महिलांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून पोलिसांना जाब विचारला. तसेच संबंधित आरोपीला अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी या महिलांनी केली. या मोर्चात प्रज्ञा उघडे, ज्योती इंगळे, आशा खडसे, दीक्षा आढाव, वनिता उघडे, मीना भालेराव, छाया गौंड, वंदना अहिरे, ज्योती पंडित यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.