प्रकार समोर येताच नराधमाला ठोकल्या बेड्या!
भिवंडी : सध्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना बदलापूर घटने नंतर प्रकर्षाने समोर येत असताना भिवंडी शहरातूनही अशीच एक घटना समोर आली आहे. भिवंडीमध्ये न्यू आझाद नगर येथे राहणाऱ्या शेजाऱ्यानेच एका अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करण्याच्या बहाण्याने अत्याचाराचे थरारक कृत्य केले. दरम्यान हा प्रकार समोर येताच अत्याचार केल्याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रफिक शेख (२८) हा नराधम भिवंडी शहरातील न्यू आझाद नगर भागातील एका चाळीत राहतो. या आरोपीने शेजारील एका १३ वर्षीय मुलीसोबत मैत्री करण्याच्या प्रयत्नाने तिच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. तसेच तिच्या घरी कोणी नसताना तिच्यावर सहा महिन्यात वेळोवेळी शारिरीक अत्याचार केले. दरम्यान २५ ऑगस्ट रोजी अल्पवयीन पीडित मुलीने नकार दिल्यानंतर नराधमाने तिला मारहाण केली. यामुळे भयभीत पीडीत मुलीने आईकडे याबाबत सांगितल्यानंतर पालकांनी मुलीसह शांतीनगर पोलीस ठाण्यात नराधमा विरोधात तक्रार दाखल केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने नराधम रफिक शेख यास ताब्यात घेत त्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. आरोपीला भिवंडी न्यायालयात काल हजर केले असता त्याला २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.