मुंबई : मुंबई महापालिकेने गणेशोत्सवापूर्वी पालिकेसंदर्भातील (Mumbai Municipality) कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेने एच पश्चिम विभागातील जुने आणि जीर्ण झालेल्या मुख्य जलवाहिनींच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. यामुळे मुंबईत उद्या काही ठिकाणी पाणीपुरवठा खंडित राहणार असून नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे आणि त्याचा जपून वापर करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील पाली हिल जलाशय-१ मधील मुख्य जलवाहिनीची दुरूस्ती आणि वांद्रे पश्चिम येथील आर. के. पाटकर मार्गावर रामदास नाईक मार्ग ते मार्ग क्रमांक ३२ दरम्यान नव्याने टाकलेल्या ७५० मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या वांद्रे आणि खार परिसरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर नियमित वेळेनुसार पाणीपुरवठा पूर्ववत केला जाणार आहे.
कोणत्या भागात असणार पाणीपुरवठा बंद?
- पेरी परिक्षेत्र – वांद्रे पश्चिमचा काही भाग, वरोडा मार्ग, हिल रोड, मॅन्युअल गोन्सालविस मार्ग, पाली गावठाण, कांतवाडी, शेरली राजन मार्ग
- खार दांडा परिक्षेत्र – खार दांडा कोळीवाडा, दांडपाडा, चुइम गावठाण, खार पश्चिमेचा काही भाग, गझदरबांध झोपडपट्टीलगतचा काही भाग
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग परिक्षेत्र – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग लगतचा परिसर, पेस पाली गावठाण, पाली पठार, खार पश्चिममधील काही भाग.