ऋतुराज- ऋतुजा केळकर
परवा एका व्यक्तीच्या दहाव्याला आम्ही गेलो होतो. दोन अडीच तास झाले पण पिंडाला कावळा काही शिवेना. घरातली प्रत्येकाने पुढे येऊन आपापल्या परीने त्या मृतात्म्याला प्रार्थना केली पण ‘नाही’. अखेरीस त्या गृहस्थाच्या पत्नीला काय सुचलं कोण जाणे पण त्या पुढे होऊन म्हणाल्या की, “नव्याने बांधत असलेल्या घराला आम्ही तुमचं नाव देऊ” तेव्हा क्षणार्धात कावळ्याने पिंडाकडे झेप घेतली आणि सगळ्यांची सुटका झाली.
खरंतर शरीर मृत पावल्यानंतर आत्मा मृत्यू म्हणजे देवाच्या भेटीच्या म्हणजे मुक्तीच्या आणि पुनर्जन्माच्या सीमारेषेवर असतो पण तिथे देखील वासनांचे म्हणजे ईच्छांचे अडसर असतात, हे या प्रसंगावरून कित्येकदा आपल्याला दिसून येतात. जिथे वासनांचा डोह संपतो त्या पल्याड ॐकार स्वरूप परमानंदमय,सद्गुणमय आनंदाचा प्रांत म्हणजे मुक्तीचे कवाड उघडून परलोकाच्या सुंदर विश्वात पदार्पण होते. तत्त्वज्ञानाच्या या प्रवासात म्हणजे जीवनाच्या मरूद्यानातून ब्रह्मांडाच्या म्हणजे जगदीश्वराच्या दिशेने झेप घेणे होय पण, आपणच आपल्या प्रवासात उत्कट इच्छांच्या गर्तेत अडकून या झेपेत अडथळे निर्माण करतो. त्यात अनेकानेक षङरिपु आहेत. त्यातीलच एक म्हणजे ‘वित्तेषणा’. वित्तेषणा म्हणजे वित्त… पैसा… पैशाची तृष्णा. ही एक अशी तृष्णा की जिची तृप्ती कधीच होत नाही.
‘राजासजी महाली
सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली
या झोपडीत माझ्या’
इतकं सहज आणि सोप असलेले आपले आयुष्य आपणच या तृष्णेपायी कस्तुरी मृगासमान सैरभैर करून सोडलं आहे. या पैशाच्या लोभाकरिता कित्येकदा माणसाने माणसांच्या रक्ताचे पाट वाहिले आहेत. ज्यामुळे त्यांनी स्वतःच्या पायावर कोयता मारून घेऊन आपल्या कर्माच्या पोतडीत धोंडे भरून घेतले आहेत. इथे मात्र एक नक्कीच सांगावसं वाटतंय की पक्षांसारखं उद्याची चिंता देवावर सोडण्याइतका माणूस सुखी- समाधानी कधीच नसतो.
या पैशासाठी धावताना माणूस साध्या साध्या आनंदांना मुकतो आणि व्यवहारात पाहिले. तर ज्यांच्याकडे अमाप पैसा असतो. त्यांच्यामध्ये दातृत्वाचा अभावच असतो. श्रीमंती आणि दुसऱ्याच्या भल्याचा विचार करण्याची वृत्ती एकाच व्यक्तीच्या ठायी असणे हे अगदी अभावानेच पाहावयास मिळते. जीवनाचे पाश तुटतं असताना ईच्छांचे बंध अधिकाधिक घट्ट धरून ठेवण्याचा अट्टहास हा आत्म्याचा असतोच असतो. पण मृत्यू अटळ आहे आणि विझणाऱ्या दीपज्योतीची फडफड आणि प्राणज्योतीची विझताना होणारी तडफड ही एकाच प्रकारची असते. त्यातील सकारात्मकतेचा स्वीकार हा जर त्या देहत्याग होत असताना आत्म्याने समजून घेतला तरच आत्म्याचा पुढील प्रवास सुकर होईल.
आत्मा हा नेहमीच अमर आहे. त्याचा कधीच नाश होत नाही. तो शाश्वत आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरीही आत्म्याचा नाश होऊ शकत नाही. ‘जीर्ण’ जुन्या तसेच कधी कधी रोगाने जराजर्जर झालेल्या देहाचा त्याग करून नवीन तेजस्वी देहाचा स्वीकार करणे या प्रवासामधील मृत्यू हे विश्राम स्थान आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक जन्मातील आपली कार्यसिद्धी झाल्यानंतर म्हणजे आपल्याला नेमुन दिलेले काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला देहत्याग हा करावाच लागतो कारण मृत्यू हा मर्त्य शरीराला येतो. त्यामुळे संपूर्ण जीवनाच्या वाटेवर सात्त्विकतेने, आनंद स्वरूप मार्गक्रमण केले तर आपला मृत्यू देखील सहज सोपा होईल हे सत्य जाणणे अत्यंत आवश्यक आहे.
सृष्टीतील पसारा हा आनंदविभोर आहे. जीवनाच्या या जत्रेत मरणाच्या छायेने त्रस्त होऊन दुःख तसेच निराशेने जड पावलांनी आपण चालत राहिलो, तर या आनंदमयी जीवनदायी चांदण्यात न्हाऊन निघूच शकणार नाही. अहंकाराच्या काटेरी कुंपणात अडकलेला आपला आत्मा हा रेशमाहूनही तलम आणि वाऱ्याच्या झुळूकेहूनही शीतल… त्या जगद्जेत्याच्या मऊशार मायेच्या दुलयीपासून वंचितच राहील. जसा पेरणीपासून ते पीक डौलाने झुलायला लागल्यानंतर ही कापणी होईपर्यंतचा काळ शेतकऱ्यांकरिता महत्त्वाचा असतो. तसाच आत्म्याच्या जन्मापासून ते त्याच्या मुक्तीपर्यंतचा प्रवास खडतर असतो. तो प्रवास कर्मकुसुमांच्या ओंजळींची जपणूक करून कोमल, वत्सलतेने सुसंगतीत कसा करायचा हा ज्याचा त्याने ठरवायचा असतो. नाही तर आपल्या आत्म्याच्या अवस्थेचे वर्णन माझ्याच शब्दांत सांगायचं झालं तर…
कर्मांची निरांजने…
मंद तेवताना…
संध्याछायेच्या भयाने…
बावरून माझ्या आत्म्याला…
कान्हाच्या मुक्तीच्या बासरीची…
परतीची धून ऐकूच
आली नाही…