Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Ganeshotsav 2024 : गणेशमूर्ती दान करा, तीन किलो खत मिळवा

Ganeshotsav 2024 : गणेशमूर्ती दान करा, तीन किलो खत मिळवा

पुणे : सामाजिक एकात्मतेचे प्रतीक असलेला गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी महापालिकेने पुणेकरांना साद घातली आहे. गणेशोत्सवात जे भाविक महापालिकेकडे गणेशमूर्ती दान करतील, त्यांना प्रत्येकी तीन किलो सेंद्रीय खत दिले जाणार आहे. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांवर ही सुविधा उपलब्ध असेल. तसेच क्षेत्रीय कार्यालय स्तरावर प्रत्येकी एक हजार या प्रमाणे १५ हजार नागरिकांना ही खताची पिशवी भेट दिली जाणार आहे.


शहरातील उरुळी देवाची येथील प्रक्रिया प्रकल्पातील हे खत असेल. “भूमीग्रीन एनर्जी’ या कंपनीकडून हे खत भेट दिले जाणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., उपायुक्त संदीप कदम यांनी क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची, स्वच्छता कर्मचारी, आरोग्य निरीक्षकांची बैठक घेतली.


या बैठकीत गणेशोत्सवातील स्वच्छता तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. गणेशोत्सवात गर्दीमुळे कचरा वाढतो. हा कचरा उचलला न गेल्याने शहर अस्वच्छ होते. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने त्यांच्या हद्दीत तीन पाळ्यांमध्ये परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कर्मचारी नियुक्त करावेत. नागरिकांकडून उघड्यावर कचरा फेकला जातो, अशा “क्रोनिक्स स्पॉट’वर लक्ष ठेवून कचरा फेकण्यावर प्रतिबंध करावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment